Water Saving Shivaji University : पाण्याबाबतची स्वयंपूर्णता वाढविण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने सध्या काही ठोस पावले उचलली आहेत. विद्यापीठ अखत्यारित तीन तळ्यांमधील गाळ काढून त्यांची पावसाचे पाणी साठवण करण्याची क्षमता वाढविली आहे. त्याने या परिसरातील पाणीसाठा एक कोटी लिटरने वाढणार आहे.
विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत राबविलेल्या जलव्यवस्थापन अभियानामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्र पाणी वापराच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. दर मोसमात विद्यापीठ साधारणतः ३३ कोटी लिटर पाण्याचे संवर्धन करते. त्यासह रोज ४ लाख लिटर सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते उद्यानांसाठी वापरले जाते.
विद्यापीठातील शंभर फुटी विहिरी शेजारील शेततळे, वि. स. खांडेकर भाषाभवनमागील आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागा शेजारील तलावाच्या माध्यमातून पावसाचे पाणी साठवले जाते. कार्यक्षेत्रामधील विद्यार्थी संख्या वाढल्याने साहजिकच पाण्याचा वापरही वाढत आहे. अशा स्थितीत पाणीसाठाही वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने या तीन तळ्यांमधील गाळ काढून त्यांची पावसाचे पाणी धारण करण्याची क्षमता वाढविण्याचे काम मे महिन्याच्या प्रारंभी सुरू केले.
त्यातील शेततळे आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या परिसरातील तलावाचे काम झाले असून, वि. स. खांडेकर भाषाभवन परिसरातील तलावाजवळील रस्त्याचा मुरुम काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या तलावांची क्षमता वाढल्याने विद्यापीठाच्या पाणी साठ्यात यंदा आणखी एक कोटी लिटरची भर पडणार आहे.
बायो प्युरिफायर'ने घटविले पाण्याचे प्रदूषण मोरेवाडीच्या हद्दीतून विद्यापीठ कॅम्पसमधून पुढे पंचगंगा नदीत जाणाऱ्या ओढ्याचे पाणी प्रदूषित झाले आहे. या पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यापीठाने किर्लोस्कर उद्योग समूहाच्या मदतीने बायो प्युरिफायरची संकल्पना राबविली आहे. त्यामध्ये कर्दळ, रानकेळी, अळू आदी कंदवर्गीय वनस्पतींचा वापर केला आहे.
फेब्रुवारीपासून बायो प्युरिफायरचा वापर केला. त्याचे चांगले परिणाम दिसले आहेत. त्यामुळे विद्यापीठ कॅम्पसमधून पुढे जाणाऱ्या या ओढ्यातील पाण्याचे प्रदूषण कमी झाले आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीला या माध्यमातून विद्यापीठ हातभार लावत असल्याचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले.
कोट विद्यापीठ पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. पावसाळ्यात विद्यापीठातील सध्याचे पाणीसाठे ओव्हर फ्लो होतात. ते टाळण्यासह पाणीसाठा वाढविण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने काही उपक्रम, संकल्पना राबविल्या आहेत. त्याने पाणी साठवण क्षमता निश्चितपणे वाढणार आहे. दरवर्षी किमान पाच ते दहा टक्क्यांनी पाणीसाठा वाढविण्याचे ध्येय आहे. साठवलेले पाणी आणि त्याच्या पुनर्वापराबाबत विद्यापीठ सजग आहे. - डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.