Nashik News : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार २.० योजनेत निवड झालेल्या नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांमध्ये जलसंधारणाची २९४३ कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यासाठी २०६.४७ कोटींच्या खर्चास व या आराखड्यास जलयुक्त शिवार २.० योजनेच्या जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली.
राज्य सरकारने २०१५ ते २०१९ या काळात जलयुक्त शिवार योजनेतून २२ हजार ५९३ गावांमध्ये मृद व जलसंधारणाची ६ लाख ३२ हजार ८९६ कामे करून २० हजार ५४४ गावे जलपरिपूर्ण केली. या योजनेतून २७ लाख टीसीएम (सघमी) पाणीसाठा क्षमता निर्माण करण्यात आल्या.
सरकारने पुन्हा जलयुक्त शिवाय अभियान २.० ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यात गावातील पाण्याचा ताळेबंद करून त्यानुसार मृद व जलसंधारण, पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध करणे, पाण्याचा अतिवापर झालेल्या भागात भूजल पातळी वाढवणे ही कामे केली जाणार आहेत. यासाठी भूजल पातळी व अवर्षणग्रस्त भाग या निकषांवर गावांची निवड केली जाणार आहे.
नवीन योजनेनुसार प्रत्येक गावाचा जलआराखडा तयार करून त्यानुसार गावात पाणलोट विकास करणे, जलसंधारण करणे, अपधाव रोखणे आदी कामे केली जाणार आहेत.
तसेच पाणी साठवण्यासाठी शेततळे उभारणे, प्लॅस्टिक अस्तरीकरण करून पाणी साठवणे, सूक्ष्मसिंचन, मूलस्थानी जलसंधारण, सामूहिक पद्धतीने समन्याय तत्त्वाने सिंचन व्यवस्था करणे, पाणी साठवलेल्या प्रकल्पांवर शेतकऱ्यांच्या सहभागातून सिंचन व्यवस्थापन करणे आदी कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.
नव्या योजनेतून जलसाक्षरतेला प्राधान्य दिले जाणार आहे. या योजनेत प्रामुख्याने पंतप्रधान कृषी सिंचन योजना व अटल भूजल योजनांमध्ये निवड झालेल्या गावांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जलसंधारण विभागाने जिल्ह्यातील २३१ गावांची निवड केली आहे.
यंत्रणानिहाय कामे व निधी
विभाग - कामांची संख्या - निधी (कोटी रुपये)
मृद व जलसंधारण- १८३ - ६३
जिल्हा परिषद जलसंधारण- ३२५- ६९
उपवनसंरक्षक- ७३६ - ३७
भूजल सर्वेक्षण- ३०० - १२
कृषी- १,३९९- २३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.