Beed News : गेल्यावर्षी मॉन्सूनवर झालेल्या ‘एल निनो’च्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने एकही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नाही. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या १४३ प्रकल्पांपैकी २४ प्रकल्प कोरडे पडले असून, उर्वरित प्रकल्पांतही केवळ १३ टक्के म्हणजे ९९ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. आणखी उन्हाळा सुरूही झाला नसताना जिल्ह्यातील आटत चाललेल्या पाणीसाठ्यामुळे यंदा जिल्हावासीयांच्या डोळ्यात पाणी येणार आहे.
गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे नदीनाल्यांना पूर पहायलाच मिळाला नाही. यामुळे जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या प्रकल्पांपैकी गतवर्षीच्या पावसाळ्यात एकही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नाही. कमी पाऊस आणि प्रकल्पांत नसलेल्या पाणीसाठ्यामुळे खरिपाची पिके हातची गेली होती.
ऑगस्ट महिन्यात पावसाने जवळपास एक महिन्याचा खंड दिल्याने शेतकऱ्यांची कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर यांसारख्या माळरानावरील पिकांनी माना टाकल्या होत्या. ज्यांच्याकडे पाण्याचे साधन आहे, त्यांनी कसेबसे उगवलेले पीक जोपासले; परंतु वरील पिकाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
विशेष म्हणजे परतीच्या पावसाचेही आवश्यक त्या प्रमाणात आगमन झाले नसल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही हातचा गेला. हरभरा, करडई, ज्वारी, गहू यांसारख्या पिकांवर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले आहे. शेतातील विहिरी, विंधनविहिरींनीही तळ गाठला असून, दुसरीकडे प्रकल्पांतील पाणीसाठा बाष्पीभवनामुळे कमालीचा घटत चालला आहे.
जिल्ह्यात गोदावरी, कृष्णा खोऱ्याअंतर्गत एकूण छोटे-मोठे १४३ प्रकल्प आहेत. यापैकी माजलगाव येथील एकमेव मोठा प्रकल्प आहे. जिल्ह्यात १६ मध्यम आणि १२६ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. यातील माजलगाव येथील एकमेव मोठ्या प्रकल्पात २.९० टक्के म्हणजे केवळ ९.१०० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. इतर १६ मध्यम प्रकल्पांमध्ये २७ टक्के, तर लघू प्रकल्पांमध्ये १२६ टक्के पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांतील पाण्याची सरासरी एकूण टक्केवारी केवळ १३.२ टक्के एवढीच राहिली आहे.खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला आणखी सुरवातही झाली नसताना जिल्ह्यातील पाणीसाठ्याची आकडेवारी लक्षात घेता अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे प्रशासनही सतर्क झाले असून, दुष्काळजन्य परिस्थितीचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. दुष्काळाच्या पाऊलखुणा ओळखून नागरिकांनीही पाण्याची बचत करणे अपेक्षित असून, याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
टंचाईसाठी १३५ कोटींची मागणी
उन्हाळ्याच्या सुरवातीलाच जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी १३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
पातळीही खालावली
शेतातील विहीर, विंधन विहिरींसह शहरातील, ग्रामीण भागातील घरातल्या बोअरवेलची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. अनेकांचे बोअर अर्ध्या ते एक तासावर आल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.