Chhatrapati Sambhajinagar News : राज्यात रिजनरेटिव्ह फार्मिंग अर्थात पुनरुज्जीवीत (संवर्धित) शेती पद्धतीचा स्वीकार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. सातत्याने अशा पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीमधील मातीतील सूक्ष्म जीवाची संख्या जवळपास सव्वा ते दीड पटीने जास्त आढळून आल्याचे निष्कर्ष पुढे आल्याची माहिती विभागीय कृषी संशोधन सल्लागार समितीच्या बैठकीतून पुढे आली आहे.
जमिनीची कमीत कमी हलवा हलवा करून त्यामधील पिकाच्या मुळाभोवती सूक्ष्मजीवांची संख्या वाढविण्यासोबतच मातीचे आरोग्य जपण्याचे तत्त्व ज्या पद्धतीमध्ये जपले जाते, तिला रिजनरेटिव्ह अर्थात पुनरुज्जीवीत शेती म्हटले जाते.
शुक्रवारी (ता. १४) विभागीय कृषी संशोधन व सल्लागार समितीच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे ‘सगुना रिजेंटेटिव्ह टेक्निक’ या चंद्रशेखर भडसावळे यांच्या तंत्राकडे लक्ष वेधले.
या तंत्रज्ञानामुळे शेतीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, मातीतील सूक्ष्म जीवांची संख्या वाढते, उत्पादन खर्चावर नियंत्रण मिळविणे शक्य होते, जमिनीची जैविक व भौतिक सुधारणा होते, जलधारण क्षमता वाढते, जमिनीची अवास्तव होणारी धूप थांबते, मजुरांचा प्रश्न यासह इतर बाबींमधून सुटका होत असल्याची बाब त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध उदाहरणासह स्पष्ट केली.
रिजनरेटिव्ह फार्मिंगमुळे पाच वर्षात शेतकऱ्यांचा ३ ते १५ हजारापर्यंत एकरी खर्च वाचण्याची बाब त्यांनी शेतकऱ्यांच्या उदाहरणासह शास्त्रज्ञांसमोर मांडली. ‘‘शेतकरी प्रयोगशील आहेत ते आपल्या शेतावर प्रयोग करत आहेत. प्रयोगांची संख्या मोठी आहे. त्यातील यशही प्रकर्षाने दिसते आहे, मग आपण त्या विषयाकडे कानाडोळा करून कसे चालेल,’’ असा प्रश्नही डॉ. मोटे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या संदर्भात सखोल अभ्यास करणाऱ्या ‘पोकरा’चे शास्त्रज्ञ विजय कोळेकर यांनी देखील या विषयाला दुजोरा दिला. श्री. कोळेकर म्हणाले, ‘‘‘पोकरा’तून खेतीबाडी स्टार्टअपला पुनरुज्जीवीत शेतीचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्याचे काम देण्यात आले होते. त्यामधून ३७ गावांतील जवळपास ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या मातीतील सूक्ष्म जीवांची तपासणी त्यांच्या प्रयोगशाळेत केली असता ‘रिजनरेटिव्ह फार्मिंग’ करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील मातीत पारंपरिक शेती पद्धतीपेक्षा सूक्ष्म जीवांची संख्या सव्वा ते दीड पटीने अधिक आढळून आली.
मातीतील सूक्ष्म जीवांची संख्या अभ्यासण्याची नियमित व रीतसर पद्धत आहे, परंतु माती परीक्षणावेळी ती अवलंबली जात नाही. त्यामुळे आपल्याकडे जमीन आरोग्य पत्रिका ही केवळ रासायनिक गुणधर्माचे संदर्भ देते. जैविक, भौतिक गुणधर्माचे विश्लेषण जमीन आरोग्य पत्रिकेत दिसत नाही.’’
‘‘सातत्याने ‘रिजनरेटिव्ह फार्मिंग’ करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील रासायनिक खत वापराचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी घटल्याची बाबही विश्लेषणातून समोर आली आहे. पिकांच्या सक्षमतेसाठी त्यांच्या मुळाभोवती आवश्यक वातावरण निर्मितीत रिजनरेटिव्ह फार्मिंग लाभदायक ठरल्याचे समोर आले आहे,’’ असे श्री. कोळेकर म्हणाले. त्यामुळे आता विद्यापीठ आणि शास्त्रज्ञ या विषयात येणाऱ्या काळात कशा पद्धतीने अभ्यास करून बाबी अधोरेखित करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
१९ जिल्ह्यांत साडेतीन हजार एकरांत विस्तार
जगभरात पुनरुज्जीवीत शेती पद्धती मोठ्या प्रमाणात केली जाते. भात शेतीत चंद्रशेखर भडसावळे यांनी एसआरटी तंत्र म्हणून तर उसात प्रताप चिपळूणकर यांनी विनानांगरणी शेती म्हणून पहिल्यांदा या शेती पद्धतीचा स्वीकार सुरू केला. त्याच पद्धतीनुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्यांदा भात पीक सोडून इतर पिकांत हे तंत्र अवलंबले गेले. त्याचा विस्तार आता राज्यातील १९ जिल्ह्यांतील साडेतीन हजार एकरांवर झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.