Rainwater farming : माझ्या गावाच्या शिवारात तेव्हा नदीचं पाणी खेळत नव्हतं. जिरायती शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. वैशाख वणव्याची काहिली सोसण्याचं बळ पाठोपाठ येणाऱ्या पावसाच्या आशेतून मिळायचं. पाऊस म्हणजे शेतकऱ्यांचा प्राणसखा जणू. त्यांच्या जगण्याची आशा एकमेव. त्यांच्या डोळ्यांतलं स्वप्न आणि जीवनदाताही. म्हणूनच सारे आभाळाकडं डोळे लावून बसायचे.
चातकासारखी पावसाची वाट बघायचे. काही संकेत मिळू लागायचे, पावसाचा सांगावा यायचा. ‘पेर्ते व्हा’, म्हणत पावशा निसर्गाचा निरोप घेऊन यायचा. रोहिणी-मृग नक्षत्रात एखादे-दोन वळीव हमखास रिचायचे. उन्हानं भाजून निघालेल्या धरणी मातेवर जेव्हा पाऊसधारा बरसत तसं निसर्गाचं विलोभनीय रूप तरारू लागायचं. शेतकरी आणि पाऊस यांच्या अपूर्व अद्वैताचा प्रत्यय येऊ लागायचा.
पावसाची रूपं किती वेगवेगळी. त्याच्या रूपांचं वर्णन करायला निरनिराळी विशेषणं. एकदम बारीक फवाऱ्यासारखे तुषार आले की ‘भुरभूर’ किंवा 'बुरंगाट' म्हणत. पावसाचे जरा टपोरे थेंब आले की त्याला थेंबाट म्हणत. चिखल पायाला लडबडला की पेंडकवणी, नांगरलेल्या शेतात तासांमध्ये पाणी साचलं की ‘चांदण्या साचल्या’, पावसाच्या रूपांना दिलेल्या उपमा किती चपखल होत्या. केवळ रूपकं नव्हतीच ती. अनुभवातून आलेली परिमाणं होती!
पेरणीची लगबग सुरू व्हायची. सालभर अडगळीत पडलेली औजारं बाहेर काढली जायची. गावातल्या सूतारनेटावर गर्दी उसळायची. कोणी नवी जू-जाडी करून घेई. कोणाला कुळव, पाभार, मोघड सांधून घ्यायचे असत. कोणाचं काय तर कोणाचं काय. महिना-पंधरा दिवस सुताराला घडीची उसंत मिळायची नाही. घिसाड्याच्या पालावर केवढी झुंबड उडायची. कुऱ्हाड शेवटून घेणं, कुळवाची फास लावण्यापासून, खुरपी-विळ्यांना पाणी पाजून घ्यायची सगळ्यांना घाई झालेली असायची.
ज्यांचं काम त्यांनी कोळसे आणायचे. शिवाय काम करताना त्याची दोरी खेचताना ढम्मण बी हाकायची. सुतार असो की घिसाडी यांचं कारागिरीतलं कौशल्य अफलातून असायचं. विशेषतः आगीशी खेळ असल्यानं घिसाड्याचं काम जास्त जोखमीचं होतं. वापसा झाला रे झाला की लागलीच औतफाट्याची जुपी सुरू होई. ‘सर्जा ये रे... माझ्या राजा ये रे...’च्या घुमणाऱ्या आवाजांनी अवघा शिवार दुमदुमून जाई. एकामागून एक मुडानं वळायची. नांगरट आधीच केलेली असायची. दुणणी, पाळी पाठोपाठ पेरणी... औतकऱ्यांच्या इर्जिकी, सावडी सुरु होत.
तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेला माझ्या गावचा शिवार उन्हाळ्यात उदास, भगभगीत भासायचा. पावसाळा आला की पावसाचं सृष्टीशी गुज सुरू होई. चित्तवृत्ती प्रसन्न करणारी चैतन्याची हिरवी सळसळ सगळीकडे जाणवायची. रान आबादानी होई. माती न्हातीधुती व्हायची. भिजलेल्या ढेकळांवरून कुळव फिरू लागायचा. काळी माती पुरणासारखी मऊ भुसभुशीत व्हायची. कुळवामागं बाया वेचणी करायच्या.
कचऱ्याचे ढिग पेटवणं, दगड-गोटे बांधावर टाकणं ही कामं हमखास आम्हा पोराटोरांवर सोपवलेली असत. शाळेला दांडी मारायला भारी निमित्त मिळायचं. कचऱ्याच्या ढिगांमध्ये आंब्याच्या कोया भाजून खाणं आमच्या आवडीचा उपक्रम असे. भरून आलेलं आभाळ थेंबाथेंबानं गळत असताना अशा सर्द वातावरणात मनमुराद हुंदडताना खरपूस भाजलेल्या कोयांची चव न्यारी लागायची.
मशागतीची कामं उरकली की पेरणीआधी शिवारातल्या देव-देवतांना बी-भराण वाहिलं जायचं. नारळ फोडला जायचा. म्हसोबा, मावलाई, बहिरोबा, गवळीबाबा, मोठ्याबाबा ही ती दैवतं. डोंगर-टेकडीवर, बांधावर, कपारीत, दरीत कुठं कुठं स्थानापन्न झालेले! नारळ फोडला की कंजूषपणात कोणतीही कसर न ठेवता बारीक बारीक पाच कुटके करून ते देवासमोर ठेवून उरलेल्या खोबऱ्यावर आमची मालकी असायची. म्हणून तर सारा शिवार अनवाणी पायांनी तुडवत राजीखुशीनं हे काम पोरांनी स्वीकारलेलं असायचं. नारळ नासका निघाला की हिरमोड होत असे.
देवदेवतांना प्रसन्न करवून घेऊन पेरणी सुरू होई. भल्या पहाटे उठून आवरासावर सुरू होई. गडी माणसं लवकरच बैलगाडी घेऊन उंबऱ्याबाहेर पडायची. कामाचा निरापिरा झाला की घरधनीण न्याहारी घेऊन निघायची. डोईवरच्या पाटीत भाकरी-कोरड्यास, कळशी-चरवी असं पाण्याचं भांडं. एका कडेवर एखादं पोर आणि दुसऱ्या हातात दाव्याला बांधलेली शेळी. मागं मागं मोकळी सोडलेली करडं... असा मोठा लवाजमा बांधाच्या, पांदीच्या अरुंद वाटेनं चालायचा. डोईवरच्या पाटीला हात लावायची गरज भासत नसे, असे कौशल्य सवयीनं अवगत झालेलं असायचं.
शेतातच औतामागं बसून, औतकरी न्याहारी करत. गाडग्या-मडक्यात वर्षभर जपलेलं बी-भराण, सुपडून-पाखडून तिनं आठवणीनं सोबत आणलेलं असायचं. एरवी चूल आणि मूल असा मर्यादित असलेली तिची भूमिका आता विस्तार पावायची. काळ्या मातीच्या रंगमंचावर बळीराजाच्या साथीनं ती नायिकेची भूमिका वठवायची. शेतीचा शोध लावणाऱ्या स्रियांचं आणि शेतीचं नातं पुरुषांपेक्षा जुनं आहे.
पेरणी सुरू करण्याआधी शेतकरी काळ्या आईपुढं मोठ्या भक्तीभावानं माथा टेकवत. पेरणीचं काम म्हणजे वर्षातलं सर्वात महत्त्वाचं काम. शेतात भूईमुग पेरला तर कडामेराला हावरी(तीळ), मुग, चवळीचा पाटा घालायची आठवण घरधनीण करून द्यायची. भाजीपाल्याचं बी ती शेतात जागोजागी टोबायची. पोटाला बांधलेल्या ओटीतून दोन्ही हातांनी पाभारीच्या चाढ्यात बी सोडणं अत्यंत कौशल्याचं काम.
पायांत काटा रुतला तरी पेरणी बिघडेल म्हणून पाभरीचं औत मध्येच थांबवता येत नसे. एकेक मूठ चाढ्यावर मोकळी करताना बैलांचा वेग आणि बी किती दाट पेरायचंय याचं भान ठेवायला लागायचं. सगळ्यांना हातोटी नसायची. तास सोडलं रे सोडलं की आसुडाचे वळ बैलांच्या पाठीवर उमटायचे.
बघून वाईट वाटायचं. हिवत, पाळी, पेरणी ही मशागतीची बरीच कामं इर्जिकीनं केली जायची. सहजीवनाचं उत्तम उदाहरण होतं ते. सकाळच्या पारगात उडदाची आमटी-भाकरी, लोणचं, कांदा असा मेनू असायचा. चुरूनमुरून औतकारी वरपू वरपू जेवायचे. रातच्याला कोंबडी किंवा बरबाटाचा रसरशीत बेत. श्रमपरिहार म्हणून काहीजण झिंगून यायचे! गप्पागोष्टी रंगायच्या. पेरणीच्या काळात शेतमालकांना आजारी पडायला सवड नसायची. घरातलं कोणाचं दुखलं-खुपलं तर सोडाच; मडं झाकून ठेवायचं इतकं वेळेत पेरणीचं महत्त्व. मढे झाकुनिया करिती पेरणी। कुणबियाची वाणी लवलाहे।।मरण पावलेल्या माणसाच्या क्रियाकर्माअगोदर पेरणी करणं कुणब्याच्या लेखी किती महत्त्वाचं आहे, याचं नेमकं वर्णन संत तुकारामांनी वरील अभंगात केलंय. वाफ दवडली की उत्पन्नात घट होणार हे ठरलेलं. इथं वेळेचं महत्त्व अधोरेखित होतं.
महाराष्ट्रातल्या कृषी संस्कृतीचं पंढरीच्या आषाढ वारीशी विशेष नातं आहे. वारीची रचना शेती आणि शेतकऱ्यांची सोय बघून करण्यात आलीय. पहिला पाऊस पडून गेला, पेरण्यांची कामं झाली की तुलनेनं शेतकरी मोकळे असत. शेतीची विशेष कामं नसत. याच काळात पायी चालत चालत वारकरी पंढरपूरात पोहोचत. मध्येच पावसाचा धिंगाणा सुरू असायचा. एकदा तो बिलगला की आठाठ दिवस उघडायचं नाव घ्यायचा नाही.
शेतकऱ्यांना विश्रांती मिळायची. चावडीवरच्या देवळात मोडक्या घराच्या पडवीत थाटलेल्या चहा-भज्यांच्या हॉटेलात पत्त्याचे डाव रंगायचे. खेळणारे कमी बघणारे जास्त. तिरट, रम्मी, जोडपत्ते, मेंडीकोट डाव मांडले जायचे. पैशांवर तसेच चहा-भज्यांवरच्या डावाला गावराण बाजाच्या इरसाल किस्से, गप्पांची फोडणी असायची. टिव्ही पोचले नसायच्या काळात ही जागा म्हणजे गावातलं मनोरंजनाचं केंद्र असायचं. ‘आखाडपांजी’ या दरम्यान असायची. शिवारातल्या बरबाट पाटर्यांची मजा काही औरच.
पेरणीनंतर कोळपणी यायची. पाऊस मध्येच डोळे वटारायचा. साऱ्यांचा जीव टांगणीला लागायचा. काळजीच्या काजळीनं चेहरे काळवंडून जायचे. ‘पड रे पाण्या...’, 'धोंडी धोंडी पाणी दे, साय माय पिकू दे...,' 'ये रे पावसा, तुला देतो पैसा...' म्हणत पावसाच्या विनवण्या सुरू होत. पाऊस पडावा म्हणून कोणी गणपती तर कोणी महादेवाला कोनाड्यात कोंडून ठेवायचं. पाचपन्नास पाणकाळे पाहिलेलं कुणीतरी वृद्ध माणूस तरुणांची समजूत घालायचं. “आरं जळू पण पिकू, सीतामाईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी हाय. तुमी कशापायी इचार करतासा?” यातून उभारी यायची. पुन्हा आभाळ भरून यायचं. धो-धो बरसायचं. सारं रान-शिवार आबादानी व्हायचं. माना टाकलेली बाजरीची ताटं उभी राहायची. शेतीमालकांच्या डोईवरचे उदासीचे ढग विरून जायचे. “यंदा आमदानी चांगली व्हनार” म्हणत कोणाच्या शेतात किती धान्य होणार याच्या पैजा लागायच्या.
हवा-पाणी पिऊन पिकं डौलानं डोलू लागत. त्यातलं मुख्य पीक बाजरी. ती पोटऱ्यात आली, चिकारली की धन्याला राखणाचे वेध लागत. मचानावर उभं राहून गोफणगुंडा फिरवला जायचा. पाखरं मोठी हुशार, भुर्रकन अशी गेली की अशी यायची. टपोरे, चंदेरी दाणे लगडलेल्या कणसांकडं धनी केवढ्या कृतार्थ भावनेनं बघत असत. वेटाळणीची कामं सावडी-वावडी उरकली जायची.
वाईच उशीर झाला, खालच्या-वरच्या वावरातली वेटाळणी झाली की थव्यानं पाखरं यायची. गोफण चालवतानाही वात आणायची. म्हणून हे काम वेळत होणं महत्त्वाचं. वेटाळणी सुरू असताना पाथा पुढं सरकायच्या तसा भलरीचा नादमय सूर शिवारभर गुंजत राहायचा. पंधरा दिवसांची वल्ली बाळांतीण असू की लेकुरवाळी बाई, ही कामं कोणाला चुकत नसत. कामात व्यत्यय नको म्हणून तीन काठ्यांना बांधलेल्या झोळीत बाळाला निजवले जाई.
मध्येच उठू नये म्हणून लेकुरवाळ्या बाया बाळाला अफूचा मजबूत ढोस द्यायच्या. अफूचा अंमल आहे तोपर्यंत पाथ कडेला जायची. मग जराशी विश्रांती घेऊन बाळाला दूध पाजलं जायचं. बाया बाजरी वेटाळायच्या, बापे आळाशीमागं पेंड्या बांधायचे. अवचित पाऊस यायचा. धांदल उडायची. कुदबा वाढायचा. चार-सहा पेंड्यांचे घोडे उभे करायला लागायचे. बाजरीची कणसं आणि ताटं वाळल्यावर शेताच्या कडेला विशिष्ट आकाराचं कोचुळं रचून ठेवलं जायचं.
कठानं(रब्बीतले गहू-हरबरे) टाकून झाल्यानंतर सवडीत वाहणी सुरू होई.(वाहणी म्हणजे बाजरीच्या पेंड्या बैलगाडीत रचून वाहून आणणे.) शिवारातल्या चढ-उताराच्या अवघड गाडीवाटांवरून बाजरीची वाहतूक करणं अत्यंत दिव्य काम. एकेकाची गाडीवाहणी करत एकमेकांना मदत केली जाई. बैलगाडीच्या साठीत हेल रचणं अत्यंत कौशल्याचं काम. चार कोचुळ्यांची भलीमोठी सुडी लागायची. बैलांनी तुडवून, शेणानं सारवलेल्या खळ्यावर मोडणी सुरू व्हायची. गडी माणसं पाचुंदा पाचुंदा पेंड्या समोर ठेवत. गोलाकार बसलेल्या बाया कणसं मोडायच्या. मध्यभागी कणसांचा ढिग लागायचा. सुख-दु:खाच्या गुजगोष्टी करत तर कधी लोकगीतांची ली पकडत मोडणीचं काम चालायचं.
उन्हाची तीव्रता जास्त असल्यास बसल्या जागी चार पेंड्या उभ्या करून सावली केली जाई. ठोसर ठोसर दाण्याची कणसं घरधनीण बाजूला ठेवायची. पुढच्या वर्षीच्या बियाणांची ही तयारी. गाडग्या-मडक्यांची बियाणे बँक घरोघरी असायची. बियाणं विकत घ्यायची परंपरा नव्हती. दाताळानं खळंभर पसरवलेल्या कणसांवरुन बैलांच्या पाथा फिरायच्या. मळणीचा फेर हाकणे, निराळा अनुभव असायचा. बैलांच्या टाचेखालून बाजूला गेलेली कणसं ओढून घ्यायचं काम बायामाणसांचं.
पाय उचल रे बैलाकर बापा आता घाईचालू दे रे रगडनंतुझ्या पायाची पुण्याई संत कवयित्री बहिणाबाईंप्रमाणं प्रत्येकीच्या मनातल्या भावना असायच्या. कणसांवरून बैलांनी वेगानं चालावं म्हणून चाबकानं मारून हाकलताना ‘बळं बळं पेर मळ...’ अशी लोकसंगीताशी नातं सांगणारी गाणी ओठांवर असत. मळणी करताना बैलांचं शेण कणसांवर पडू नये, म्हणून त्यांच्या ढुंगणाकडं सारखं लक्ष द्यायला लागायचं. शेण वरच्या वर हातात झेलायचं. मळणीच्या पुढचा टप्पा उफणणी. खळं लावताना उमाठाला वारा वाहता राहील, अशा जागी लावलं जायचं. तीन पायाच्या वावडीवरून उफणताना सारा कारभार वाऱ्याच्या हाती असायचा. वारा पडला की काम खोळंबायचं. वारा घोटाळला की नाकातोंडात घूस जायची. बणग्यांमुळं उभ्या अंगाला खाज सुटायची.
धान्याची मोठी रास लागायची. काळ्या मातीत मातीत पेरलेलं हिरवं स्वप्न साकार झाल्याचा आनंद शब्दातीत असे. बायामाणसं मोठी जितासू. बणग्यांच्या खांद्यातून काढलेले ज्वाड मोगरीनं बडवून, पालापाचोळ्यातल्या मातेऱ्यामधून धान्य हातणीनं मेळवून घेत. वर्षानुवर्षांच्या अनुभवातून हे शहाणपण त्यांना आलेलं असावं. माझी आई लेकीसुनांना नेहमी म्हणायची “दाणा म्हणतो मला दाण्यात घाल. मी तुला माणसांत बसवीन.” दाण्यात दाणा घालून केलेल्या संचयामुळं माणसाची समाजात पत वाढते, हे केवढं मोठं तत्त्वज्ञान आई चिमटीत पकडून सहज सांगायची! धान्यानं भरलेल्या पोत्यांच्या थप्प्या लागायच्या.
आठ-दहा एकरवाल्यांचं घर भरून जायचं. बाजारात या धान्याला किती किंमत आहे, याला शेतकऱ्यांच्या लेखी विशेष महत्त्व नसायचं. पैसा आजच्या इतका मोठा झाला नव्हता. 'खाऊन पिऊन सुखी' ही काहीशी अल्पसंतुष्ट वृत्ती जगण्याचा जणू स्थायीभाव होता. आमदनी चांगली झाल्याचा आनंद मोठा. नवं धान्य तयार होईपर्यंत जुनं लावून धरलं जायचं. खंड पडू द्यायचा नाही. शिवारातल्या देव-देवतांना गोडभात आणि मलिद्याचा निवद दाखवल्याशिवाय दळण केलं जात नसे. शेती हेच शेतकऱ्यांचं भावविश्व असायचं.
हंगामामागून येणाऱ्या हंगामाला एखाद्या सांस्कृतिक उत्सवाचं परिमाण लाभायचं. सण, उत्सव, यात्रा-जत्रा, लग्नकार्य सारं लोकसंस्कृतीशी नातं सांगणारं. निवांतपणा, मोकळा वेळ लोकांजवळ असायचा. दावणीची जनावरं आणि धान्याची पोती यावर ‘श्रीमंती’ मोजली जायचा काळ होता तो. पैसा इतका मोठा नव्हता झालेला. सहजीवन अबाधित होतं. गावगाडा सुरू होता. शेती हा भारतीय अर्थ आणि समाज व्यवस्थेचा कणा होता. त्यामुळं बाकीचे बलुतेदारी व्यवसाय किंवा गाववाडा हे शेतीभोवतीच फिरत होते. समाजातील बलुतेदार हे शेतीशी संबंधित उद्योग करत. शेतीची अवजारं तयार करणारे सुतार-लोहार, नाडा-कासरा-चऱ्हाट तयार करणारे मातंग यांचे उद्योग शेतीभोवती केंद्रित होते. ही शेती अशाप्रकारे इतर व्यवसायांचा आधार बनली होती. हीच शेती पावसावर अवलंबून होती.
हा पाऊसही अनिश्चित असल्याने शेतीचं स्वरूपही काहीसं अनिश्चित राहिलं.परवा शिवारातून फिरताना हे सारं आठवलं. मन पाखरू झालं. भूतकाळातलं विस्तीर्ण आकाश त्यानं कवेत घेतलं. एकेक गोष्ट आठवत राहिली. एखाद्या चलचित्रपटासारखी! १९८०च्या दशकात आधुनिक शेती सुरू झाली. उद्योगधंदा बनण्याआधी शेती भारतीयांची जीवनशैली होती. हळूहळू शेतीत मोठे बदल होत गेले. साहजिकच कृषी संस्कृतीवर भलेबुरे परिणाम झाले. वीज आली. विहिरींवर मोटारी बसल्या. पाइपलाइनी झाल्या. पाणी शेतांत खेळू लागलं. मोटांवरचं गाणं हरवलं. ट्रॅक्टर आला. शेतजमिनींबरोबर कृषी संस्कृतीचंदेखील गतीनं सपाटीकरण झालं. जर्सी-होस्टेनसारख्या संकरीत गायी आल्या.
डांगी जनावरांचे गोठे मोडून पडले. सेंद्रीय जिरायत शेतीची जागा बागायती शेतीनं घेतली. पीकपाण्यातलं वैविध्य नष्ट होत गेलं. नगदी पिकं आली. शेतकऱ्यांची जीवनशैली झपाट्यानं बदलली. पारंपारिक तोट्याच्या शेतीकडून नफ्याच्या कथित आधुनिक शेतीच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. उत्पादन खर्च भरमसाट वाढला. शेती भयानक भांडवली बनली. भूमिगत पाण्याचा उपसा आणि रासायनिक खतं-औषधांचा बेसुमार मारा सुरू झाला. वाहतूक, मशागतीसाठी स्वयंचलित यंत्रं आली, औजारं मोडीत निघाली. आधुनिकीकरणानं सारे संदर्भ बदलत गेले. मातीसोबत माणसांच्या जगण्यातलं सेंद्रीय तत्त्व हरपत गेलंय. अर्थात हे स्मरणरंजन आहे. 'बदल हीच एकमेव स्थिर गोष्ट आहे', असं म्हणतात हेच खरं. निसर्गापासून दूर नेणारी जीवनशैली आणणाऱ्या आणि आनंदी वृत्तीचा निर्देशांक कमी करणाऱ्या आधुनिक बदलांना प्रगती म्हणायची की अधोगती, हे व्यक्तीसापेक्ष आहे.
(लेखक अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वीरगाव येथील शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.