Pune News : पूर्वी मी हेलिकॉप्टरमधून पणदरे, ढाकाळे, तुकाईचा उजाड माळरान पाहायचो. आता हे माळराण ऊस, केळी यांसारख्या विविध पिकांनी फुलून गेले आहे. हे आशादायक चित्र मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी बनविले. शेतकऱ्यांची मुले उच्चशिक्षण घेत असून, ते वेगवेगळ्या वाटेवर वाटचाल करू पाहत आहेत.
पणदरेमधील उच्चशिक्षित तरुण संजय यशवंत जगताप हे शेतीत रमले आणि त्यांनी ऊस उत्पादनात इतिहास घडवला. त्यांनी संशोधनात्मक ज्ञानाच्या जोरावर एकरी १३७ टन उसाचे उत्पादन घेतले. हा यशस्वी प्रयोग पाहून आनंद झाला. निश्चित हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना आदर्श ठरेल, असा विश्वास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला.
पणदरे-सोनकसवाडी (ता. बारामती) हद्दीमध्ये अॅड. संजय यशवंत जगताप यांची विशेषतः ऊस व केळी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्याची परंपरा आहे. यंदा जगताप यांनी एकरी १३७ टन ऊस उत्पादन घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली. ही माहिती मिळताच शरद पवार यांनी बुधवारी (ता. १५) जगताप यांच्या शिवाराला भेट दिली. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
या वेळी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, कोल्हापूरचे ऊस उत्पादक श्री. पाटील, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, संचालक योगेश जगताप, अॅड. बी. डी. कोकरे, अमरसिंग जगताप, काकासाहेब जगताप, राजेंद्र जगताप, के. बी. कोकरे, ऊस विकास अधिकारी सुरेश काळे, अभय शहा आदी शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, कष्ट करण्याची तयारी, निसर्गाच्या संकटावर मात करण्याची हिंमत आणि संशोधनात्मक ज्ञान घेतल्यास शेतकरी विक्रमी शेतीमध्ये उत्पादन घेऊ शकतो, हे संजय जगताप यांनी को ८६०३२ जातीचा १३७ टन एकरी उत्पन्न घेऊन सिद्ध केले. त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे मी अभिनंदन करण्यासाठी आलो आहे, अशा शब्दांत पवार यांनी जगताप कुटुंबीयांचे कौतुक केले.
पवार म्हणाले, की यंदा दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊस पिकामधील होत असलेल्या संशोधनाचे प्रात्यक्षिक सर्वप्रथम व्हीएसआय या संस्थेत होते. त्या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने ऐवढच सांगू इच्छुतो, की शेतकऱ्यांनी उसाचे वाण, रोग किडींवर कीडनाशके आदी गोष्टींचे संशोधनात्मक ज्ञान शिवारामध्ये उपयोगात आणावे. निश्चित विक्रमी उत्पादन घेता येते, असे पवार यांनी सांगितले.
शिवारात अन्न द्रव्याचा साठा वाढविला. ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून खते व पाण्याचे व्यवस्थापन उत्तम केले. माळेगावचे ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन व व्हीएसआयच्या जैविक कीडनाशकांमुळे सुरुवातीपासून उसाचे संरक्षण चांगले झाले. सात फुटी पट्टापद्धत अवलंबल्यामुळे उसाच्या पिकामध्ये खेळती हवा व सूर्यप्रकाश राहिला. खतांबरोबर जमिनीची जैविक सुपीकता वाढविल्यामुळे संजय जगताप यांनी विक्रमी उत्पादन घेतले, अशी माहिती अधिकारी सुरेश काळे यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.