Kharif Season Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season : थोडं थोडं पाणी शिंपडून पिकाचा जीव वाचवायचा प्रयत्न करतोय!

गणेश कोरे

Pune News : ‘‘यंदा पेरणीनंतर पाऊसच नाही, सर्वत्र नापिकी आहे. मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. थोडं थोडं पाणी शिंपडून पिकाचा जीव वाचवायचा प्रयत्न करतोय,’’ अशा शब्दांना जिल्ह्यातील शेतकरी आपली व्यथा मांडत असताना, त्यांच्या चेहऱ्यावर हतबलता आणि चिंतेचे सावट स्पष्ट जाणवत होते...!

जिल्ह्यात खरीप हंगामात २३ ऑगस्ट अखेर ८८ टक्के पेरणी झाली, गेल्या वर्षी ती ९९ टक्के एवढी होती. यंदा खरीप हंगाम सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने धोक्यात आला आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये पिके सुकली आहेत. सुकलेल्या पिकांवर शेतकरी नांगर फिरवत आहेत. भात, सोयाबीन, ऊस, बटाटा आदी पिके पाण्याअभावी होरपळत आहेत.

काही भागांत चारा आणि पाणी टंचाईला सुरुवात झाली असून, पशुपालकांवर तो विकत घेण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी ऐन पावसाळ्यात विहिरी, कूपनलिका खोदण्याची कामे सुरू केली आहेत. जिल्ह्यात सध्या ४० टँकर सुरू आहेत. पाऊस न पडल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात यंदा ऑगस्ट महिना संपत आला, तरी (२३ ऑगस्ट अखेर) प्रत्यक्षात ६४ मिलिमीटर झाला असला, तरी सरासरीच्या अवघा ३९ टक्केच पाऊस झाला आहे. याच काळात गेल्या वर्षी १४२ टक्के पावसाची नोंद होती. यंदा १३ पैकी आठ तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे.

यातील जुन्नर ४८ टक्के, मुळशी ३७ टक्के, शिरूर २२ टक्के, बारामती १७ टक्के, हवेली १६ टक्के, पुरंदर १५ टक्के, दौंड १५ टक्के, आणि इंदापूर १४ टक्के पाऊस आहे. चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पशुपालक आणि शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात १ ते २३ ऑगस्टदरम्यानचा पाऊस

सरासरी ----- प्रत्यक्ष ----- टक्के

१७० ----- ६५.२ ----- ३८.४

‘‘आखाडातील एका पावसावर वावर भिजलं. त्यात एक गोण सोयाबीन पेरलं. पण त्यानंतर पाऊस झाला नाही. पाण्याविना पीक सुकून गेलं. अखेर त्यावर नांगर फिरवला. यात ८ हजारांचा खर्च वाया गेलं. हंगामाचंही आर्थिक नुकसान झालंय, उत्पन्न नाही. रब्बीकरिता पावसाची वाट पाहतोय, ज्वारी लावायची, नाहीतर सगळी नापिकी हाय. पाच गाया आहेत, पण खायला आता चारा नाही.
- संजय जाधव, रा. पाबळ, ता. शिरूर
‘‘मी आरधलीने ३ एकर बटाटा आणि १ एकर वाटाणा एका पावसाच्या वलीवर केलाय. आता पीक फुलावर आलंय, पण पाऊसच नाही. मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. पीक टिकवायला दोन विहिरींचं थोडं थोडं पाणी गोळा करून स्‍प्रिंकलरने फवारतोय. ते पण पाणी पुरत नाही. पाणी कधी संपलं माहीत नाही. थोडं थोडं पाणी शिंपडून पिकाचा जीव वाचवायचा प्रयत्न करतोय.
- कैलास पारधी, वाफगाव, ता. खेड
‘‘पावसाचे जवळपास तीन महिने होत आले आहे. जिल्ह्यातील २० धरणे अजूनही भरलेली नाही. सध्या जिल्ह्यातील भात पिकांची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली असली तरी पूर्व भागात पाऊस कमी असल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे उत्पादनात घटीचा अंदाज आहे.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

SCROLL FOR NEXT