
Solapur News : उजनी धरणाची वाटचाल सध्या १०० टक्क्यांकडे सुरू आहे. धरणात दौंडवरून १७ हजारांहून अधिक क्युसेकची आवक असून उद्या (शनिवारी) धरण ८३ टक्के होईल. धरणातील साठा आणि दौंडवरून येणारा विसर्ग पाहता आषाढी वारीचा सोहळा पार पडल्यावर रविवारी (ता. ६) रात्री उजनीचे १६ दरवाजे २० सेंटीमीटरने उघडले जाणार आहेत. सुरवातीला १० हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडला जाणार आहे.
उजनीची एकूण साठवण क्षमता ११९ टीएमसी असून सध्या धरणात १०५ टीएमसी पाणी आहे. दरवर्षी जूनअखेर धरण उणे पातळीत राहिल्याने जुलैमध्ये धरण १० ते २० टक्केच भरलेले असायचे. मात्र, यंदा मे महिन्यातच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने मेअखेर धरणाने ५० टक्क्यांची पातळी ओलांडली होती.
जूनमध्ये सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली, तरीदेखील पुणे जिल्ह्यातील पावसामुळे दौंडवरून येणाऱ्या विसर्गातून उजनी सध्या ७७ टक्क्यांवर पोचली आहे. दुसरीकडे, जूनमध्ये धरणात अपेक्षेपेक्षा जास्त येणारे पाणी भीमा नदीतून सोडून देण्यात आले.
आता आषाढी वारीमुळे भीमा नदीत सोडलेला उजनीचा विसर्ग पूर्णत: थांबविल्याने धरणातील साठा सोमवारी (ता. ८) ९० टक्क्यांवर पोचणार आहे. परंतु, जुलैमध्ये धरणात ८५ टक्केच पाणी राखून ठेवणे अपेक्षित असल्याने उर्वरित सर्व पाणी भीमा नदीतून सोडणे सुरूच राहील, असे उजनी धरण व्यवस्थापनाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.
कॅनॉलचे पाणी थेट नदीत
उजनीतून भीमेत सोडलेला विसर्ग आषाढी वारीमुळे रविवारपर्यंत (ता. ६) थांबविण्यात आला. पण, कॅनॉल, बोगदा व सीना-माढा आणि दहिगाव उपसा सिंचन योजनांमधून २७८० क्युसेक पाणी सोडले जात आहे.
कालव्यातून १७०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे, पण पाऊस चांगला झाल्याने शेतकरी ते पाणी घेत नाहीत. त्यामुळे कालव्यातून सोडलेले पाणी थेट नदीला मिळत असल्याचे चित्र आहे. कॅनॉलमधून सोडलेला विसर्ग शुक्रवारी सायंकाळी १५०० वरून १७०० क्युसेक करण्यात आला होता.
उजनी धरणाची सद्य:स्थिती
एकूण पाणीसाठा १०५.१८ टीएमसी
पाण्याची टक्केवारी ७७.४५ टक्के
दौंडवरून पाण्याची आवक १७,३०० क्युसेक
बोगदा, ‘सिंचन’द्वारे सोडलेले पाणी १०८० क्युसेक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.