Buldana News : येत्या खरीप हंगामात सोयाबीन, कापूस आणि तूर पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते मुबलक उपलब्ध होण्याबरोबर पीककर्ज सहज मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील,’’ अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार धीरज लिंगाडे, संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे, श्वेता महाले, कृषी सचिव एकनाथ डवले, प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्याला सुमारे १५०० कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्यात येईल. जिल्हा बँक पीक कर्ज देऊ शकत नसल्याने ही जबाबदारी राष्ट्रीय बँकांवर राहील. त्यामुळे एक लाख ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सीबिलची अट राहणार नाही. शेतकऱ्यांना पेरणी पूर्वी कर्जपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.’’
‘‘जिल्ह्यात ४० टक्के क्षेत्रावर सोयाबीन, कापूस आणि तूर पिकाची पेरणी होईल. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. पावसाअभावी उगवण झाली नसल्यास बियाणे टंचाईची शक्यता निर्माण होते.
टंचाईमुळे बोगस बियाणे, खते बाजारात दाखल होतात. तसेच इतर उत्पादन खरेदी करण्याची सक्ती होत असल्यास तक्रारीची दखल घ्यावी. भरारी पथक नेमून नियमित कार्यवाही करावी,’’ असे निर्देश पाटील यांनी दिले.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपयुक्त सूचना आणि मार्गदर्शन करावे. कृषी विकासासाठी योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या करावी. शेततळे, शेडनेट यासारख्या योजनांचा लाभ द्यावा. शेतकऱ्यांनी हवामान पद्धतीनुसार शेती करण्यावर भर देऊन पीक पद्धतीत बदल करावा.
पीक विम्याचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नुकसान भरपाईची मदत वेगवेगळ्या टप्प्यावर असून लवकरच याचा लाभ देण्यात येईल,’’ असे श्री. पाटील यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.