Chhatrapti Sambhaji Nagar : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 6 लाख 75 हजार हेक्टर आहे. 2022-23 खरीप हंगामात सरासरीच्या 99.40 टक्के म्हणजे 6 लाख 71 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.
2023- 24 च्या आगामी खरीप हंगामासाठी सरासरीच्या 101 टक्के म्हणजे 6 लाख 78 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरुवारी ता. 11 जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाचा लेखाजोखा सादर केला.
श्री. देशमुख म्हणाले, की प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्रात कपाशीची जवळपास 3 लाख 82 हजार हेक्टरवर त्याची लागवड होईल, असा अंदाज आहे.
मका पिकाची 1 लाख 74 हजार हेक्टरवर तर बाजरी पिकाची 22 हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. येत्या हंगामात कडधान्य पिकाखालील क्षेत्र वाढविण्यावर भर राहणार आहे.
त्यामुळे गतवर्षी 47 हजार हेक्टरवर झालेल्या मूग, उडीद, तूर या पिकांची 59 हजार पेरणी प्रस्तावित केली आहे.
उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करण्याबरोबरच कोरडवाहू शेती तंत्रज्ञान (मूलस्थानी मृद व जलसंधारण) वापरण्यावर भर देण्यात येणार आहे.
रुंद सरीवरंबा अर्थात बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब मोठ्या प्रमाणावर व्हावा यासाठी प्रचार प्रसिद्धी केली जाते आहे.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून ज्वारी, बाजरी या पिकाबरोबरच राजगिरा, नाचणी, भगर, राळा या अपारंपारिक पौष्टिक तृणधान्यखालील क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न राहील. यासाठी महाबीज च्या माध्यमातून या पिकांचे बियाणे मिनीकिट शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सोयाबीन पीक वाढविण्यासाठी वाव असून हद्दपार झालेली तीळ, जवस, करडई या पिकाचे क्षेत्र जिल्ह्यात वाढेल या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
बियाण्याची अपेक्षित उपलब्धता
जिल्ह्यात बियाण्याचा सरासरी वापर 34,482 क्विंटल इतका आहे. 2023- 24 खरिपासाठी विविध खरीप पिकांच्या 39 हजार 103 क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. 15 मे पासून प्रत्यक्ष विक्रेत्यांकडे बियाणे उपलब्ध होईल, असे नियोजन आहे.
बीटी कापूस बियाण्याच्या 19 लाख 8 हजार पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. 3 लाख 8938 टन खताची मागणी नोंदविण्यात आली असून शासनाकडून 2 लाख 73 हजार 620 टन रासायनिक खताचे आवंटन प्राप्त झाले आहे.
नियोजनात महत्त्वाचे
जिल्हास्तरावर 1 व तालुका स्तरावर 9 भरारी पथक
शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी नियंत्रण कक्ष
30 गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांमार्फत योग्य नियंत्रण
नॅनो युरिया व डीएपी दळवरूप खताचा वापर वाढविण्यावर भर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.