Pune News : गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यातील अनेक भागात पूर्वमोसमी पाऊस पडला आहे. त्यातच शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यात पूर्व मशागतीच्या कामांना काही ठिकाणी सुरूवात झाली आहे.
पश्चिम पट्यातील तालुक्यात भात रोपवाटिकेची कामे पुढील महिन्यात सुरू होतील. यंदा वेळेवर पाऊस झाल्यास दोन लाख ७ हजार २५० हेक्टरवर पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार कृषी विभागाने खते, बियाण्यांचे नियोजन सुरू केले आहे.
सध्या जिल्ह्यातील बहुतांश भागात रब्बी हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. कांद्याची काढणी सुरू आहे. तर उन्हाळी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिके घेतलेली नाहीत, अशा शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शेतकरी पूर्व मशागतीवर भर देत आहेत. ठिकठिकाणी नांगरट सुरू आहे.
पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत प्रामुख्याने भाताची लागवड केली जाते. पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशी पिके घेतली जातात.
गेल्या वर्षी जिल्ह्यात खरिपाची एक लाख ९३ हजार ९३९ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात एक लाख ९२ हजार २२० हेक्टरवर पेरणी झाली. यंदा हवामान विभागाने ‘अल निनो’चा अंदाज असल्याने जून, जुलैमध्ये कमी पावसाची शक्यता वर्तविली आहे.
तरीही शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन सुरू केले आहे. निविष्ठा पुरवठ्याचे नियोजन कृषी विभागाने सुरू केले आहे. तशी मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात येईल.
रोपवाटिकांच्या प्रशिक्षणाचा घ्या लाभ
पश्चिम पट्यात भात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर राहील. त्यासाठी आत्मा व कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठी लागणारी रोपवाटिकांचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी भात रोपवाटिकेची कामे सुरू करावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
खरीप हंगामातील अंदाजे पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक ---पेरणी क्षेत्र
भात ---६०२००
बाजरी--- ३६५६०
रागी --- ३३००
मका--- २९०००
तूर--- १६००
मूग--- १५०३०
उडीद --- १५६०
इतर कडधान्ये ---८,५००
भुईमूग ---१४,०००
सोयाबीन---३७५००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.