Maharashtra Assembly Budget Session 2023 मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तरतुदी आणि नियमांवर बोट ठेवत विधानसभा अध्यक्षांना (Rahul Narvekar) खडे बोल सुनावले.
आमदारांनी विचारलेले प्रश्न स्वीकारले की नाही याची माहिती मिळत नाही, कामकाजात प्रश्न लागले की नाही हेही कळत नाही, अधिवेशनात बैठका घेऊ, असे आश्वासन दिले जाते मात्र; त्या घेतल्या जात नाहीत, असे अनेक मुद्दे उपस्थित करत विधीमंडळ सचिवालयाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि भाजपमध्ये चकमक झाली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावर अनुमोदन देण्यासाठी सत्ताधारी गटात गोंधळ उडाला.
यानंतर कामकाजाच्या मुद्द्यावरून बोलण्यास उभे राहिलेल्या भास्कर जाधव यांनी अध्यक्षांना धमकावल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यानंतर भाजपच्या सर्व सदस्यांनी आक्रमक होत जाधव यांच्यावर कारवाईची मागणी केली.
यात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत संवैधानिक पदावरील व्यक्तींबाबत अवमानकारक बोलू नये, असे सांगत पडदा टाकला.
दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळ सचिवालयाच्या कामकाजाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले. ‘विधीमंडळ सभागृहांचे कामकाज भारतीय संविधान, नियम, प्रथा आणि परंपरेनुसार चालते. अलीकडच्या काळात बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना आपण बगल देत आहोत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
विविध आयुधांचा वापर करून सदस्यांनी सादर केलेल्या सूचना मान्य किंवा अमान्य याची माहिती सदस्यांना मिळत नाही, कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना दिली जात नाही, तसेच ही यादी कार्यवाहीसाठी मंत्रालयीन विभागांना पाठवली की नाही याची माहिती देण्यात यावी तसेच कामकाजाचा क्रम रात्री बारानंतर संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतो. कामकाजाची माहिती सदस्यांसह मंत्र्यांनासुद्धा मिळत नाही, तरी यामध्ये तत्काळ सुधारणा करून सभागृहाच्या नियम, प्रथा-परंपरांचे योग्य प्रकारे पालन करण्याची मागणीही त्यांनी केली.
आमदार आपल्या मतदारसंघातील विषय तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना इत्यादी आयुधांच्या माध्यमातून अध्यक्षांच्या मान्यतेसाठी दाखल करीत असतात. या सूचना मान्य झाल्या की नाही हे कळविण्याचा अधिकार घटनेनुसार सदस्यांना आहे.
परंतु गेल्या काही काळापासून ही परंपरा पाळली जात नाही. विधानसभा सदस्यांनी दाखल केलेला तारांकित प्रश्न स्वीकृत झाला किंवा अस्वीकृत झाला याची माहिती दिली जात नाही. यात सुधारणा केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
पवार यांनी उपस्थित केलेले मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहमती दर्शवित अधिवेशनामध्ये बैठका घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यांची पूर्तता या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळातच केली जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अविश्वास ठरावाचे काय झाले
काँग्रेसच्या नाना पटोले यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हिवाळी अधिवेशनात आणलेल्या अविश्वास ठरावाचे काय झाले, हा मुद्दा उपस्थित केला. हिवाळी अधिवेशनात आपल्याविरोधात अविश्वास ठराव दिला होता.
त्याबाबत काहीच कळविलेले नाही, या प्रस्तावाचे पुढे काय झाले, असा प्रश्न विचारला. यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी प्रस्ताव दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्याला कळविले आहे, आवश्यकता भासल्यास पुन्हा कळवू, असे सांगितले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी, ‘नाना, नाना आपल्या पीएला विचारा’ असा टोला लगावला.
मराठी भाषेसाठी शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार
मराठी राजभाषा गौरव दिनाचा संदर्भ देत राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार टाळाटाळ करत असल्याची टीका करत यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, असा मुद्दा उपस्थित केला.
मराठी ही अन्य अभिजात भाषांपेक्षाही जुनी आणि श्रेष्ठ भाषा असूनही तिला अभिजात दर्जा मिळत नाही. हा दर्जा मिळाला तर ती पाचशेहून अधिक विद्यापीठांत शिकविली जाईल, यासाठी सर्व सभागृहाचे एकमत आहे.
त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मागणी करू, असे आश्वासन दिले. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना या विषयावर बोलू न दिल्याने ते आक्रमक झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.