Tomato Rate : सरकारने प्रयत्न करूनही टोमॅटोचे भाव तेजीतच आहेत. आजही काही शहरांमध्ये टोमॅटोने २०० रुपयांचा टप्पा पार केला होता. तर घाऊक बाजारातील भावही काही ठिकाणी १०० रुपयांच्या पुढे पोचला. सरकारने काही भागांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटो विक्री सुरु केली. पण त्यामुळे दरवाढीला आधारच मिळाला. पण सध्याच्या स्थितीला सरकारचं धोरणही जबाबदार असल्याचं शेतकरी आणि व्यापारी सांगतात.
सरकारच्या नोंदीनुसार टोमॅटो खरिप आणि रब्बी हंगामात घेतला जातो. पण शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता बाराही महीने टोमॅटोची लागवड केली जाते. सरकारच्या मते देशात २०२२-२३ मध्ये जवळपास ९ लाख हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली. तर उत्पादन २०६ लाख टनांवर पोचले. टोमॅटो तर पाहीलं तर द्राक्षापेक्षाही संवेदनशील आणि नाशवंत पीक. टोमॅटोच्या खरिपलागवडी आता पूर्ण झाल्या. ७० ते ८० दिवसांमध्ये माल सुरु होतो.
सध्या एप्रिल आणि मे महिन्यातील लागवडीचा माल बाजारात सुरु आहे. या काळातील लागवडी खूपच खर्चिक असतात. एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटा येतात. तर जूनमध्ये ऊन आणि पावसाचा तडाखा बसतो. यामुळे या काळातील टोमॅटो उत्पादन खर्च खूपच वाढतो. त्यामुळे बहुतेक शेतकरी या काळातील लागवडी टाळतात. यंदा पिकाला बसलेला फटका जास्त होता. यामुळे उत्पादनात घट होऊन बाजारात आवक घटली.
देशभरात आज टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ८ हजार रुपये भाव मिळाला. गुणवत्तापूर्ण टोमॅटोला १० हजारांच्या पुढेही भाव मिळतो. पण हा माल बाजारात खूपच कमी आहे. तसचे कमी गुणवत्ता असलेला माल जास्त प्रमाणात बाजारात येतो. यामुळे देशातील काही बाजारांमध्ये २०० रुपयांपेक्षाही अधिकचा भाव मिळत आहे. तर अनेक बाजारांमधील भाव १५० ते २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर घाऊक बाजारातील सरासरी दर ७० ते ८० रुपये प्रतिकिलो आहेत. टोमॅटोची बाजारातील आवक ऑगस्टच्या शेवटी वाढण्याचा अंदाज आहे. या काळात टोमॅटोचे भावही कमी होतील. पण प्रत्यक्ष बाजारातील आवक किती होते यावरून दर ठरेल, असे व्यापारी सांगतात.
एप्रिल आणि मे महिन्यात शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावा लागला. क्रेटला अगदी ५० रुपयांपासून भाव मिळाले होते. पण सध्या सरासरी भाव प्रतिक्रेट २ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटोचे किरकोळ दर वाढल्यामुळे सरकारने दिल्ली सारख्या शहरात ग्रहकांना सवलतीच्या दरात विक्री सुरु केली. बाजारातून १३० ते १४० रुपये किलोने टोमॅटो खरेदी करून ग्राहकांना ७० रुपयांंमध्ये विकण्यात येत आहे. यासाठी सरकारच्या एनसीसीएफ आणि नाफेड या संस्था कामाला लागल्या. ओएनडीसी अर्थात ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्सच्या माध्यमातून ऑनलाईन विक्रीही केली जात आहे. ओएनडिसीने आठवडाभरात १० हजार किलो टोमॅटो विकल्याची माहिती आहे.
टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर सरकार सवलतीच्या दरात ग्राहकांना टोमॅटो उपलब्ध करून देत आहे. पण एप्रिल आणि मे महिन्यात शेतकरी टोमॅटो फेकून देत होते. पण त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांना अनुदान दिले नाही किंवा शेतकऱ्यांचा माल खरेदी केला नाही. तसेच अतिरिक्त उत्पादन असताना निर्यातीसाठी पुढाकारही घेतला नाही. शेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांची मागणी असते. पण सरकारचं धोरणं निर्यातीच्या आड येतं, असे शेतकरी आणि व्यापारी सांगतात
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.