soybean Production
soybean Production Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Production: सांगलीत सोयाबीन उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटण्याची शक्यता

टीम ॲग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात यंदा अतिपाऊस (Heavy rain) झाला. त्यामुळे पिकाची मुळी अकार्यक्षम झाली. त्याचबरोबर सोयाबीन पिकावर येलो मोझॅक, (Yellow Mosaic) खोडमाशी या रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी, सोयाबीनचे नुकसान (Crop Damage) झाले. सध्या सोयाबीनची काढणी (Soybean Harvesting) सुरू झाली असून, या साऱ्यामुळे सोयाबीनचे उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.

सोयाबीनला मिळणारा दर आणि घातलेला पैसा शेतकऱ्यांच्या हाती येतच नाही. सगळा खर्च अंगावर पडला असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीन आणि बियाण्याला चांगले दर मिळत असल्याने जिल्ह्यात सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन उत्पादनदेखील घेतले होते.

त्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे ४२ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी एप्रिलपासूनच सोयाबीनच्या पेरणीचे नियोजन केले. त्यानंतर जूनच्या पंधरा तारखेपर्यंत सोयाबीनची पेरणी उरकली होती. परंतु काही शेतकऱ्यांनी पंधरा जूननंतर सोयाबीन पेरणीस पसंती दिली. शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत सोयाबीनचे पीक चांगले साधले.

दरम्यान, उन्हाळी सोयाबीन पिकाची काढणी झाल्यानंतर त्याच पिकात सोयाबीन पिकाची पेरणी केली. मुळात, आगाप पेरणी अर्थात एप्रिलमध्ये पेरणी केलेल्या सोयाबीनवर यलो मोझॅकचा प्रादुर्भाव असल्याने शंभर टक्के पिकाचे नुकसान झाले. तर जूनपर्यंत पेरणी केलेले पीक २५ ते ५० टक्क्यांपर्यंत बाधित झाले. त्यामुळे शेतकरी रोग नियंत्रित आणण्यासाठी धडपड सुरू केली. परंतु रोग नियंत्रणात आला नाही.

त्यातच अतिपाऊस झाला. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिले. परिणामी मुळांची कार्यक्षमता कमी झाली. खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊ लागला. सोयाबीनवर येलो मोझॅकचाही प्रादुर्भाव येण्यास प्रारंभ झाला. या साऱ्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीनचे सुमारे २५ ते ३० टक्के नुकसान झाले.

जिल्ह्यात सोयाबीनच्या विविध वाणांची लागवड केली जाते. प्रत्येक वाणाची एकरी उत्पादकता वेगळी राहते. सोयाबीनचे सर्वसाधारपणे एकरी आठ क्विंटलपासून ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येते. परंतु या वर्षी अतिपाऊस, सोयाबीन पिकावर येलो मोझॅक, खोडमाशी या रोगाचा प्रादुर्भावामुळे एकरी घटली असल्याचे चित्र आहे.

सध्या जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी आणि मळणी सुरू केली आहे. मळणीनंतर शेतकऱ्यांच्या हाती एकरी ३ ते ४ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन हाती येत आहे. अर्थात, सोयाबीनची एकरी उत्पादकता पन्नास टक्क्यांवर आली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

केलेला खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर

एक एकर सोयाबीन पेरणीपासून ते काढणीपर्यंत सुमारे ३५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. सध्या बाजारात ओलावा असलेल्या सोयाबीनला साडेचार हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. सध्या शिवारात सोयाबीन काढणीची लगबग सुरू असून, एकरी काढणीसाठी चार हजार, तर मळणीसाठी तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च येतो.

अगोदर उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटले आहे. एकरी पाच क्विंटल उत्पादन मिळते आहे. सध्याचा सोयाबीनचा दर ग्राह्य धरला, तर शेतकऱ्याच्या हाती २२ ते २३ हजार रुपये येतात. त्यामुळे पिकाला केलेला खर्चही मिळणे मुश्कील झाले असून, हा सगळा खर्च अंगावर पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

कोट

तीन एकरांवर सोयाबीन पेरले होते. परंतु फुलकळीच्या वेळी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. पावणेदोन एकरांत दोन क्विंटल सोयाबीन मिळाले. सोयाबीनला मिळणार दर आणि घातलेला पैसा निघणार नाहीच. सगळा खर्च अंगावर पडला आहे.

- अशोक कर्नाळे, सोयाबीन उत्पादक शेतकरी, खटाव, जि. सांगली

जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादनात घट आहे. परंतु पीक कापणी प्रयोग पूर्ण झाल्यानंतर त्याचे संकलन केले जाईल. त्या संकलनावरून सोयाबीनचे उत्पादकता किती कमी झाली याचा अंदाज येऊ शकतो.

- प्रकाश सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT