Soybean Harvest : धरलं तर चावतंय... सोडलं तर पळतंय!

आज ताडपत्री उघडायचं नाव काढू नका. लई बेजारी केलीय या सोयाबीनने! आणि आता पावसाचा एक सटकारा पडून गेला...परत जोरदार पाऊस सुरू झालाय.
Soybean Harvest
Soybean HarvestAgrowon
Published on
Updated on

धरलं तर चावतंय...सोडलं तर पळतंय! किती बोलकी आहे ही म्हणं! शेतीत या म्हणीचा वारंवार प्रत्यय येतोच. रात्री उशीरापर्यंत टीपटीप चालू होती. सकाळी उठलो तेव्हा थेंब चालू नव्हते पण आभाळ भरलेलं. काळा चहा पिऊन शेततळ्यावर फिरणं सुरू केलं.

दहा मिनीटातचं पूर्वेकडील ढगांमधून बाहेर येऊन सुर्यानं दर्शन दिलं. अंगावर पडलेल्या किरणांमुळे मुड फ्रेश बनला. गुगलवर पाऊस दाखवत होतचं...पण दुपारपर्यंत पाऊस येणार नाही,असं उगीच वाटत होतं.

काल काढलेल्या सोयाबीनवरील ताडपत्री काढणं गरजेचं होतं. त्यात बरचसं ओलं आहे. त्याला किमान हवा खाऊ देणं गरजेचं होतं. लगेच नरेश आणि वामनला घेऊन ताडपत्री काढली. ती पसरवली. वामन म्हणाला, बाहेरच्या ढिगावरही वरच्या बाजुने एक थर ओला आहे.

ती ही उघडावी लागेल. ती ही उघडली....खरं तर,या ताडपत्र्या उघडताना द्विधा मन:स्थिती होती.उघडली तर काहीवेळातच ती झाकावी लागणार,हे स्पष्ट दिसत होतं. नाही उघडलं तर,सोयाबीन जाळ्या धरण्याची,त्याला कोंब फुटण्याची भीती होती....

शेवटी दोन्ही बनीम उघडल्या. दूर्लक्ष नको म्हणून परत तळ्यावर फिरत राहिलो. दहा मिनीटातच दक्षिणेकडून काळेकुट्ट ढग भरून आले. मी नरेशला फोन करून बाहेरच्या ढिगाऱ्यावर आलो.ताडपत्री ढिगावर ओढली. दोऱ्या बांधून दगड ठेवले.

तेवढ्यात बारीक थेंब सुरू झाले. दोघेही पळतच मळ्यात आलो आणि पाच मिनीटात ताडपत्री झाकून दगड ठेवले. बारीक पावसातच दोऱ्या आवळल्या आणि घरी परतलो की,पाऊस थांबला. तेव्हापासून आभाळ येतयं,जातयं. मधेच ऊन पडल्याचा भास होतोय..

दहा मिनीटापूर्वी नरेशला म्हटलं,थोडा वेळ मळ्यातली ताडपत्री काढायची का? नरेशनं आकाशाकडं बोट करीत म्हटलं, मामा हे मोठ मोठे ढग दिसत नाहीत का?...गुगलवर पण फार भरोसा ठेवता येत नाही..

आज ताडपत्री उघडायचं नाव काढू नका. लई बेजारी केलीय या सोयाबीनने! आणि आता पावसाचा एक सटकारा पडून गेला...परत जोरदार पाऊस सुरू झालाय. पत्र्यावर त्याचा मारल्यासारखा बद बद बद बद..असा आवाज येतोय...

तो ऐकण्याशिवाय पर्याय नाही..पावसाचं मी नेहमीच स्वागत करतो. अगदी अवकाळी पावसातही भिजण्याचा आनंद घेतो...पण या पावसाकडं बघायची सुद्धा इच्छा होत नाहीय. आता दिवसभर कोंडून घ्यायचं स्वत:ला.कालच्या पावसामुळं सगळीकडं चिखलच चिखलच झालाय.आमच्या शेताच्या रस्त्यावर कुठलंच वाहन चालत नाही... फक्त पायी चालता येत!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com