पुणे ः राज्यातील ३०५ बाजार समित्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन (APMC Ranking) ‘स्मार्ट’ अंतर्गत (SMART Project) पणन संचालनालयाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. मात्र क्रमवारीत पहिल्या दहा बाजार समित्यांमध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांना (APMC) स्थान मिळविता आलेले नाही. पहिल्या क्रमांकावर लासलगाव (जि. नाशिक) या बाजार समितीने बाजी मारली आहे. २०० पैकी १६३ गुण या बाजार समितीला मिळाले आहेत.
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत २०२१-२२ च्या कामगिरीच्या आधारावर ही वार्षिक क्रमवारी जाहीर केल्याची माहिती राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांनी दिली. बाजार समित्यांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीतील पायाभूत व इतर सुविधांनुसार ३५ निकष आणि २०० गुणांच्या आधारे ही निवड करण्यात आली. यामध्ये पायाभूत सुविधा व इतर सेवासुविधा अंतर्गत १४ निकष आहेत. त्यासाठी एकूण ८० गुण, आर्थिक कामकाजाबाबत ७ निकष आणि ३५ गुण, वैधानिक कामकाजाबाबत ११ निकष, ५५ गुण तर योजना उपक्रमातील सहभाग व इतरविषयी ३ निकष आहेत. त्यासाठी ३० गुण अशा एकूण २०० गुणांवर आधारित ही क्रमवारी आहे.
पुणे विभागात बारामती, संगमनेर, अकलूजची बाजी
राज्यातील सहकार विभागाच्या रचनेनुसार आठ विभागांत प्रथम तीन बाजार समित्यांची नावेही जाहीर करण्यात आलेली आहेत. पुणे विभागात बारामती बाजार समितीने पहिला, नगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समितीने दुसरा, तर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज बाजार समितीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
‘निकष बदलण्याची गरज’
‘‘पणन संचालनालयाने शेतीमाल तारण कर्ज, गोदाम, शीतगृहे आदी शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचे निकष लावले आहेत. पुणे बाजार समितीच्या आवारातच आणि जागेवर वखार महामंडळांची गोदामे आहेत. तर अनेक अडत्यांची स्वतःची शीतगृहे आहेत. यामुळे आमची स्वमालिकीची गोदामे आणि शीतगृहे नाहीत. त्यामुळे आम्ही या निकषांमध्ये बसत नाहीत. मात्र आम्ही सर्वाधिक व्यवसाय करत पणन मंडळाला ३ कोटींचे अंशदान आणि शासनाला ३ कोटींचा देखभाल शुल्क देत आहोत. आर्थिक निकषांवर बाजार समित्यांचे मूल्यांकन व्हावे. यामध्ये सर्वाधिक सेस, वाढावा, वार्षिक उत्पन्न यास सर्वाधिक गुण आणि महत्त्व द्यावे,’’ अशी मागणी पुणे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी केली.
क्रमवारीनुसार १० बाजार समित्या अशा...
१) लासलगाव (जि. नाशिक)
२) हिंगणघाट (जि. वर्धा)
३) कारंजा लाड (जि. वाशीम)
४) संगमनेर, मंगरूळपीर,
चांदूरबाजार, वाशीम (विभागून)
५) काटोल (जि. नागपूर)
६) अकोला (जि. अकोला)
७) उमरेड (जि. नागपूर)
८) लातूर (जि. लातूर)
९) बारामती (जि. पुणे)
१०) पिंपळगाव बसवंत
(जि. नाशिक)
आत्मपरीक्षणाची गरज
राज्यातील शेकडो कोटींची उलाढाल असलेल्या पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर बाजार समित्यांनी राज्याला आमदार खासदार, मंत्री दिले. मात्र या बाजार समित्यांचा समावेश पहिल्या १० मध्ये न झाल्याने या बाजार समित्यांच्या आजी-माजी संचालक मंडळ, कर्मचारी, अधिकारी, प्रशासक आणि अडत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
जागतिक बॅंकेच्या मदतीने ‘स्मार्ट’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामुळे शेतीमाल विक्रीस नेताना बाजार समितीचे स्थान शेतकऱ्यांना समजेल. पणन संचालनालयाकडून दरवर्षी बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर करण्यात येईल.-सुनील पवार, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.