Nashik Agriculture News : मक्याची कुक्कुटखाद्यासाठी तसेच प्रक्रिया उद्योगात (Processing Industry) मागणी वाढती आहे. गेल्या वर्षापासून दर (Maize Rate) टिकून राहिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप मका लागवडीच्या पाठोपाठ रब्बी हंगामात लागवडीला पसंती दिली आहे.
यंदा १ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. प्रामुख्याने दरातील स्थिरतेमुळे रब्बी हंगामातील मक्याचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, नाशिक विभागातील मक्याचे सरासरी लागवड क्षेत्र ८६ हजार ८०९ हेक्टर इतके आहे. मात्र यंदा १,३९,८५२.२० हेक्टर क्षेत्रावर लागवडी झाल्या आहेत. सरासरीच्या तुलनेत ५३ हजार ४३ हेक्टरने वाढ झाली आहे.
१६१ टक्के यंदा पेरा झाला आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बी मका उत्पादनात सातत्य कायम राखले आहे. गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. यंदा जवळपास दीडपट क्षेत्र गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत वाढल्याची स्थिती आहे.
धुळे जिल्ह्यात १० हजार हेक्टरवर लागवडी होत्या मात्र मागील वर्षी त्यात काहीशी घट झाली होती. मात्र यंदा या लागवडी अडीचपट वाढल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मका लागवडीकडे पसंती दिली आहे. मागील वर्षी या भागात लागवडी कमी होत्या. मात्र यंदा सुधारणा झाली असून १३ हजार हेक्टर वरचे क्षेत्र विस्तारले आहे.
कांदा दरातील अस्थिरतेमुळे व इतर पिकात जोखीम तर मक्याचे दर टिकून राहिल्याने मक्याला पसंती दिल्याचे अभ्यासक सांगत आहेत. मध्य प्रदेश, बिहार व आंध्र प्रदेशात सर्वाधिक क्षेत्रावर रब्बी मका लागवड होते. मात्र महाराष्ट्र राज्यात खरीप व रब्बी मका उत्पादनात आघाडी असून शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
मका पिकासाठी जमेच्या बाजू :
- इतर भरड धरणाच्या तुलनेत मिळणारी उत्पादकता व दर -जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्धता
- इतर बागायती पिकांच्या तुलनेत खर्च व नुकसानीची जोखीम कमी
- पाण्याची गरजही कमी
- किमान आधारभूत किंमतसह खाजगी बाजारातही मिळणारा सध्या समाधानकारक भाव
कुक्कटपालन उद्योगात मागणी; विक्रीचे अनेक पर्याय
गेल्या वर्षापासून किमान आधारभूत किमतींवर दर व कांद्याची दरातील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांचा मका पिकाकडे कल आहे. तसेच खरीप मक्याच्या तुलनेत रब्बी हंगामात सिंचन व खत व्यवस्थापन होत असल्याने उत्पादकता वाढ शक्य होते.
देशाच्या एकूण मका उत्पादनाच्या ५५ टक्के मक्याची मागणी ही कुक्कुटपालन उद्योगात आहे. तर कुक्कुटखाद्यामध्ये एकूण ६५ टक्के वाटा हा मक्याचा असल्याने मागणी सध्या आहेच. त्यामुळे मक्याला तेजी कायम असल्याचे दिसून आले आहे.
तसेच मका काढणीनंतर ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर खरेदी-विक्री केंद्र, छोटे-मोठे व्यापारी असल्याने शेतकऱ्यांना विक्रीचे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे ही सकारात्मक बाब दिसून येत असल्याची माहिती महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रिडर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष उद्धव आहिरे यांनी दिली.
गेल्या तीन वर्षातील नाशिक विभागातील पेरणी स्थिती :
(हेक्टर)
जिल्हा...२०२०-२१...२०२१-२२...२०२२-२३
नाशिक...८,८३५.५०...७,३९१.९२...१३,३६१.४०
धुळे...१०,८२०...१०,३२०...२८,८२५
नंदुरबार...५,८०७...५,१०८.४३...११,२५३.८०
जळगाव...६०,०७०...९१,१६३...९४,४१२
विभागातील एकूण स्थिती :
वर्ष...सरासरी क्षेत्र (हेक्टर)...प्रत्यक्ष पेरणी (हेक्टर)...टक्केवारी
२०२०-२१...७४,२९८...८५,५३२.६६...११५.१२
२०२१-२२...१,१०,३५२...१,३८,२९०.९३...१२५.३२
२०२२-२३...८६,८०९.१२...१,३९,८५२.२०...१६१.१०
कांद्याच्या रोपांची अडचण व दरातील अस्थिरता यामुळे लागवडीचा निर्णय घेतला. कमी खर्चात हमखास उत्पन्न देणारे हे पीक आहे. त्यामुळे हा पर्याय मागणीमुळे योग्य वाटला.- निवृत्ती न्याहारकर, मका उत्पादक, वाहेगाव साळ, ता. चांदवड.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.