Milk Rate Agrowon
ताज्या बातम्या

Milk Rate : शेतकऱ्यांची दूध दर कोंडी

Milk Rate Maharashtra : शासनाने गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये खरेदी दर जाहीर करूनही प्रत्यक्षात गुणप्रतीच्या नावाखाली रिव्हर्स पॅाइंटमुळे दूध उत्पादकांना प्रतिलिटर आठ ते नऊ रुपयांची तूट सोसावी लागत आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : शासनाने गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये खरेदी दर जाहीर करूनही प्रत्यक्षात गुणप्रतीच्या नावाखाली रिव्हर्स पॅाइंटमुळे दूध उत्पादकांना प्रतिलिटर आठ ते नऊ रुपयांची तूट सोसावी लागत आहे. परिणामी, राज्यातील बहुतांश भागात गाईच्या दुधाला प्रत्यक्षात प्रतिलिटर ३० रुपयांपर्यंतच दर मिळत आहेत.

पशुखाद्याचे वाढलेले दर आणि दुसरीकडे दुधाला मिळणारा कमी दर यामुळे राज्यातील दूध उत्पादकांची कोंडी झाली आहे. केवळ कोल्हापूर विभागातच दुधाला इतर विभागांपेक्षा एक ते दोन रुपये अधिक दर मिळत आहे.

राज्यात साधारण ७० सहकारी व ३०० पेक्षा खासगी दूध संघांच्या माध्यमातून दोन ते सव्वादोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. त्यात बहुतांश दूध हे गाईंचे आहे. ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाला शासनाने गाईच्या दुधाला ३४ रुपये प्रतिलिटर दर देण्याच्या आदेशानंतर खासगी दूध संघानी गाईच्या दुधाचे दर लगेचच वाढविले.

मात्र त्यासोबत बहुतांश दूध संघानी रिटर्नचे दरही वाढले. त्याचे थेट परिणाम आता गाईच्या दूधदरात दिसत आहे. प्रत्यक्षात दुधाला प्रतिलिटर २५ ते ३० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ ला ३४ रुपये हा निर्धारित दर जाहीर करुन २१ जुलैपासून अंमलबजावणी सुरु केली.

मात्र ‘एसएनएफ’च्या प्रत्येक पॉइंटला पूर्वी तीस पैसे कमी व्हायचे, आता थेट एक रुपया कमी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे परिणाम आता दिसत आहेत. त्यामुळे २७ ते ३१ रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

दूधदर वाढविण्यासोबत पशुखाद्याचे दर २५ टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले होते. मात्र हे दर कमी करण्याऐवजी १ ऑगस्टपासून पाच टक्क्यांनी वाढले आहेत. पावसाळ्याचे दिवस, हिरवा चारा, वातावरणातील बदलामुळे दुधाला ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ मिळत नाही.

त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षाही कमी दर मिळत आहेत, असे सांगत शेतकऱ्यांनी ‘ॲग्रोवन’ला मिळालेल्या दराच्या पावत्याच दाखविल्या. रिटर्न दराबाबत तातडीने बैठक घेणार असल्याचे सांगितले होते, मात्र त्याबाबत पंधरा दिवसानंतरही अजून काहीही दखल घेतलेली नाही.

कोल्हापूर विभागातील दुध दरकपात कायम आहे. नामवंत दूध संस्थांनी एक महिन्‍यापूर्वी गायीच्या दूध दरामध्‍ये ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २ रुपये कपात केली. मात्र या भागात आधीच चांगला दर असल्याने राज्यातील इतर भागाच्या तुलनेत या भागात चांगला दर मिळत आहे. मात्र चारा टंचाईसह ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भावही पुन्हा सुरू झाल्याने दुग्धोत्पादक मेटाकुटीला आला आहे.

मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात रिटर्न दरवाढीमुळे २७ ते ३१ रुपयांपर्यंत प्रतिलिटरला दर मिळत आहे. परभणी, हिंगोलीत राज्यातील दरापेक्षा आंध्र प्रदेशातील हेरिटेज डेअरीचे दर अधिक आहेत. नवीन दर लागू करू नयेत, अशी मागणी दुग्ध उत्पादकांनी केली आहे.

सोलापूर भागात रिव्हर्स पॉइंटमुळे प्रतिलिटर आठ ते नऊ रुपयांची तूट सोसावी लागत आहे. दुधाला प्रतिलिटर २५ ते २६ रुपये दर मिळत आहे. जळगाव भागातही फॅट व एसएनएफ कमी लागला की दरात फटका सोसावा लागत आहे. बुलडाणा भागात रिटर्न दरवाढीमुळे लिटरला तीन रुपयांपर्यंत नुकसान सोसावे लागत आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- रिटर्नचे दर वाढविल्याचा थेट फटका दूध उत्पादकांना

- पशुखाद्याचे दर ५ टक्के वाढल्याचा फटका

- दरवाढीसोबत रिटर्नच्या प्रतिपाईंटचे दर वाढविल्याचा परिणाम

- पशुखाद्याचे दरही कमी होण्याऐवजी पाच टक्क्यांनी वाढले

- राज्यातील बहुतांश भागात प्रतिलिटर ३० ते ३१ रुपयांपर्यंत दर

- कोल्हापूर, मराठवाडा, खानदेशात दुधदर शेतकरी त्रस्त

पावसाळ्याचे दिवस, सध्याचे वातावरण पाहता गायीच्या दुधात ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ होत नाही. त्यामुळे दुधाचे रिटर्न दर हे जुनेच ठेवायला हवे होते.
- रामनाथ वडक, निमगाव जाळी, ता. संगमनेर, जि. नगर
दावणीला आठ गायी आहेत. पण उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे जनावरांचे पालनपोषण कसे करायचे, असा प्रश्न आहे. सध्या मिळणारा दूध दर परवडत नाही.
- अनिल माने, दिघंची, ता. आटपाडी.
मागील तीन महिन्यांपासून दुधाचे दर ३६ ते ३७ रूपये प्रतिलिटर होते. दर कमी झाल्यावर दूध संघांनी शासनाच्या आदेशाने ३४ रुपये दर जाहीर केला. मात्र सध्या सरासरी ३ रुपयांची दर घट बसते आहे.
- अमोल खर्चे, दूध उत्पादक, आडविहिर, मोताळा, जि. बुलडाणा
पशुखाद्य व अन्य खर्चाच्या तुलनेत दर मिळत नाही. आमच्याकडून दुधाची खरेदी ३३ ते ३५ रुपयांत केली जाते. फॅट, एसएनएफ कमी झाला तर दर खाली येतो.
- नंदू पाटील, दूध उत्पादक, जळगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT