Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Harvester : ऊसतोडणीसाठी ९०० हार्वेस्टरकरिता मदत करू

सध्या साखर कारखान्यांना ऊसतोडणीसाठी मजुरांची कमतरता भासते आहे. त्यामुळे ९०० हार्वेस्टरकरिता राज्य शासन मदत करेल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Team Agrowon

पुणे ः ‘‘ग्रामीण विकासात वस्त्रोद्योगानंतर दुसऱ्या स्थानावर साखर उद्योग (Sugar Industry) आहे. आता जगाच्या साखर उत्पादनात (Sugar Production) राज्याने तिसऱ्या क्रमाकांचे मिळवलेले स्थान अभिमानास्पद आहे. मात्र सध्या साखर कारखान्यांना ऊसतोडणीसाठी (Sugarcane Harvesting) मजुरांची कमतरता भासते आहे.

त्यामुळे ९०० हार्वेस्टरकरिता राज्य शासन मदत करेल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. मांजरी बुद्रुक येथे शनिवारी (ता.२१) आयोजित केलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व पुरस्कार वितरण सोहळ्यात शिंदे बोलत होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार, ‘व्हीएसआय’चे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी पणनमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी कृषी राज्यमंत्री, विश्‍वजित कदम, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री सतेज पाटील, साखर संघाचे पी. आर. पाटील, विशाल पाटील, दिलीपराव देशमुख, साखर आयुक्त शेखर गायकवाड, ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू-पाटील व सल्लागार शिवाजीराव देशमुख, राष्ट्रीय साखर कारखाने महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदी उपस्थित होते.

“व्हीएसआयच्या सभेत मला बोलावल्याबद्दल मी शरद पवार यांना धन्यवाद देतो. ऊस शेती व साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेली व शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेली व्हीएसआय ही जगातील एकमेव संस्था आहे.

उच्चांकी ऊस उत्पादन करणारे शेतकरी, कार्यक्षम साखर कारखाने व चांगल्या तंत्रज्ञांमुळेच राज्यात साखर उद्योगाचे विशाल साम्राज्य उभे राहिले आहे. सहकारातून ही प्रगती होत आहे.

सहकाराच्या मदतीसाठी केंद्राने राज्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनाही चर्चेत मी तसे सांगितले असून ते सकारात्मक आहेत,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

“शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे काम प्रत्येक सरकारने केले. आमचे सरकारदेखील करते आहे. कर्जमाफी, जलयुक्त शिवार, सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याचे काम आम्ही केले आहे.

कृषी संशोधनाला चालना मिळाली, तर राज्याच्या प्रगतीला हातभार लागेल. तसेच साखर उद्योगही टिकला, वाढला पाहिजे.

कारण, लाखो शेतकरी या उद्योगावर अवलंबून आहेत. आमचे सरकार केवळ ऊस नव्हे तर सर्व पिकांच्या शेतकऱ्यांसाठी काम करते आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

‘डिझेलचे ट्रॅक्टर रूपांतरित करा’

व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना रूपांतरित ट्रॅक्टर इंजिन वापरण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला अध्यक्षीय भाषणात दिला. “शेतकऱ्यांनी डिझेलऐवजी सीबीजीसह सुधारित इंधन इंजिनचा वापर ट्रॅक्टरमध्ये करावा. त्यामुळे इंधन खर्चात ५० टक्के बचत होईल.

तसेच डिझेलच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन ७० टक्क्यांनी कमी होईल. भविष्यात पेट्रोल, डिझेलपेक्षाही हायड्रोजन हेच प्रभावी इंधन ठरेल. हायड्रोजन आधारित वाहने तिप्पट मायलेज देतात. साखर कारखान्यांना देखील आपल्या बायोगॅस व सहवीज निर्मिती प्रकल्पांपासून हायड्रोजन तयार करता येईल,” असे पवार म्हणाले.

श्री. शरद पवार यांनी साखर उद्योगाविषयी भाष्य केले. “राज्यात १०१ सहकारी व ९७ खासगी अशा १९८ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. या हंगामात १४.८७ लाख हेक्टरवर ऊस आहे.

त्यातून १३२२ लाख टन उसाचे गाळप होईल व १३८ लाख टन साखर उत्पादन होईल. आधीच्या अंदाजानुसार १३ लाख टन साखर इथेनॉलकडे जाईल, असे वाटत होते. मात्र सध्याची स्थिती बघता साखर उत्पादन अजून १०-१५ लाख टनांनी घटण्याची शक्यता आहे,” असे ते म्हणाले.

देशात गेल्या हंगामात ३९ दशलक्ष टन साखर तयार झाली होती. यंदा ती ३८ दशलक्ष टनांपर्यंत होण्याचा अंदाज आहे, असे सांगून पवार म्हणाले, की गेल्या हंगामातील राज्यातील साखर कारखान्यांनी ३३ हजार २४४ कोटी रुपयांपैकी ३३ हजार ७७ कोटी रुपयांची एफआरपी अदा केली आहे. हे यश असून त्याकरिता मी सर्व घटकांचे अभिनंदन करतो.

या वेळी मुख्यमंत्री व श्री. पवार यांच्या हस्ते साखर उद्योगातील तंत्रज्ञ, शेतकरी, अधिकारी, उत्कृष्ट कामकाज करणारे कारखाने व उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.

शरद पवार यांच्या साखर उद्योगाला टिप्स

- साखर कारखान्यांनी तांत्रिक कार्यक्षमता वाढवावी.

- साखर उद्योगातील सर्व घटकांनी पुढील वर्षीच्या व्हीएसआयमधील आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत भाग घ्यावा.

- कारखान्यांनी सीबीजी तंत्रज्ञान वापरल्यास १७५० कोटी रुपयांचा फायदा होणे अशक्य

- हायड्रोजन हेच भविष्यातील पर्यायी इंधन. त्यामुळे साखर कारखान्यांनी हायड्रोजन इंधन निर्मितीकडे वळावे.

- साखर कारखान्यांनी साखर, इथेनॉल, सहवीजसह आता सीबीजी, ब्युटॅनॉल, लॅक्टिक अॅसिड, सक्सिनिक अॅसिड, ग्लुकोनिक अॅसिड तयार करावे.

- उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी शुद्ध बेण्याचा वापर करावा.

- व्हीएसआयने तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांचा वापर होण्याची गरज.

- वसंत ऊर्जा या जैवसंजीवकाचा वापर सर्व भागांतील शेतकऱ्यांनी केल्यास ऊस उत्पादन वाढेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT