पुणे : चालू वर्षी चांगल्या झालेल्या पावसाचा परिणाम ऊस लागवड (Sugarcane Cultivation) क्षेत्राच्या वाढीवर झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवडी केल्या आहेत. पुणे विभागात आडसाली, पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा उसाचे (Khodava Sugarcane सरासरी तीन लाख ६१ हजार ५३८ हेक्टर क्षेत्र आहे.
आतापर्यंत दोन लाख ८४ हजार ९३० हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. येत्या काळात शेतकऱ्यांनी खोडवा उसाचे क्षेत्र राखल्यास उसाच्या क्षेत्रात (Sugarcane Acreage) आणखी वाढ होणार असल्याचे चित्र आहे.
पावसाळ्यात झालेल्या मुबलक पावसामुळे विभागातील मुळा, भंडारदरा, कुकडी, उजनी, जायकवाडी, खडकवासला, पानशेत यांसह अनेक धरणांत पाण्याची चांगली उपलब्धता आहे. मात्र इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक हे शाश्वत उत्पन्न म्हणून शेतकरी ऊस पिकांकडे पाहतात.
त्यामुळे बहुतांशी शेतकरी दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी करतात. यंदा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीवर भर दिला.
परिणामी, ऊस लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू अशा तीन हंगामांत उसाच्या लागवडी करतात. जून, जुलै महिन्यांत आडसाली उसाच्या, तर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पूर्वहंगामी व ऑक्टोबरनंतर सुरू उसाच्या शेतकरी प्रामुख्याने लागवडी करतात.
आडसाली उसाच्या लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी, तर पूर्वहंगामी १२ ते १४, पूर्वहंगामी १० ते १२ महिन्यांनी ऊस साखर कारखान्यास तोडणीस देतात. गेल्या वर्षी १३ जानेवारीअखेरपर्यंत एक लाख ८६ हजार ५४० हेक्टरवर लागवडी झाल्या होत्या.
यंदा आडसाली उसाच्या एक लाख १५ हजार ९३६ हेक्टर, पूर्वहंगामी ६७ हजार ४३९ हेक्टर, सुरू २ हजार ८९७ हेक्टर आणि खोडवा उसाच्या ९८ हजार ६५८ हेक्टरवर लागवड झाली आहे.
विभागातील नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड, शिरूर, इंदापूर, जुन्नर, हवेली, बारामती या तालुक्यांतही लागवडी झाल्या आहेत.
मुळशी, मावळ, वेल्हे, खेड ही तालुके उसाच्या लागवडीपासून दूर आहेत. सोलापुरातील दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांत उसाच्या लागवडी झाल्या आहेत. तर बार्शी, सांगोला, उत्तर सोलापूर तालुक्यांत कमी लागवडी झाल्या आहेत.
आडसाली उसाच्या झालेल्या लागवडी (क्षेत्र, हेक्टरमध्ये)
जिल्हा ---- सरासरी क्षेत्र --- यंदा झालेल्या
नगर --- ९४,६९३ --- ७०,२६५
पुणे --- १,३५,२१७ ---८०,६२५
सोलापूर --- १,३१,६२८ --- १,३४,०३९
एकूण --- ३,६१,५३८ --- २,८४,९३०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.