सूर्यकांत नेटके ः अॅग्रोवन वृत्तसेवा
नगर ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून (रोहयो) (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) राज्यात आतापर्यंत ३४ हजार ८८० हेक्टरवर फळबाग लागवड (Orchards Plantation) झाली आहे.
यंदा (२०२२-२३) राज्यात ९ हजार १६९ कृषी सहायकांच्या माध्यमातून साठ हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केले आहे.
मात्र प्राप्त अर्जाचा विचार करता ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रशासकीय मान्यता दिली आहे. आतापर्यंत कृषी विभागाने (Department of Agriculture) निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार पाच जिल्ह्यांनी आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक लागवड केली आहे.
पाच एकरांच्या आतील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळावे आणि रोजगारही उपलब्ध व्हावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड केली जाते.
दोन वर्षांपूर्वी ३८ हजार, तर गतवर्षी राज्यात ४० हजार हेक्टरवर क्षेत्रावर लागवड झाल्यामुळे यंदा ६० हजार हेक्टरवर लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. राज्यात ९ हजार १६९ कृषी सहायक आहेत.
प्रत्येक कृषी सहायकाला उद्दिष्ट निश्चित करून दिल्याने मार्च अखेर कृषी विभागाने ठरलेल्या उद्दिष्टानुसार फळबाग लागवड होईल असा विश्वास कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
यंदा फळबाग लागवडीच्या सुधारित मापदंडानुसार अंदाजपत्रके तयार केली आणि पुन्हा जुन्या मापदंडानुसारच लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले गेले.
मात्र या प्रक्रियेत ऐन पावसाळ्यातील सुमारे तीन महिन्यांचा कालावधी गेला. त्यामुळे मात्र लागवडीला उशीर झाला. तरीही लागवडीने आता वेग घेतला आहे.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील ९४ हजार १०८ शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाकडे अर्ज दिले आहेत.
६५ हजार ५०१ हेक्टरवर तांत्रिक मंजुरी, ६३ हजार २३२ हेक्टरवर तांत्रिक मंजुरी, ३६ हजार ९२ हेक्टरवर खड्डे खोदले असून आतापर्यंत ३४ हजार ८८० हेक्टरवर फळबाग लागवड पूर्ण झाली आहे.
ठाणे, वाशीम, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांत उद्दिष्टापेक्षा अधिक फळबाग लागवड झाली आहे. ठाणे विभागात साठ टक्के, नाशिक विभागात पन्नास टक्के, पुणे विभागात ४४ टक्के, कोल्हापूर विभागात २४ टक्के,
औरंगाबाद विभागात ५० टक्के, लातूर विभागात ४३ टक्के, अमरावती विभागात ७४ टक्के व नागपूर विभागात १२३ टक्के फळबाग लागवड झाली आहे.
फळबाग लागवडीला शेतकऱ्यांचा यंदाही चांगला प्रतिसाद आहे. मार्चपर्यंत उद्दिष्टापेक्षा अधिक फळबाग लागवड करण्याचे आमचे नियोजन आहे.
रवींद्र माने, कृषी उपसंचालक, नगर
मार्च २०२३ पासून आतापर्यंत झालेली लागवड हेक्टरमध्ये (कंसात टक्केवारी)
ठाणे ः १०८० (१००), पालघर ः २१०२ (७८), रायगड ः १९९८ (७८), रत्नागिरी ः १७९९ (३७), सिंधुदुर्ग ः १६५० (५०), पुणे ः १९५१ (७८), सोलापूर ः ९९६ (२८), सातारा ः १९१ (११),
सांगली ः ६७९ (४२), कोल्हापूर ः ६९ (१२), नाशिक -ः १८८१ (४१), धुळे ः ६९३ (५५), नंदुरबार ः १५६९ (७१), जळगाव ः १०५६ (४२), औरंगाबाद ः ३४८ (२९), जालना ः १३११ (७२), बीड ः २०४ (२७), लातूर ः ८९६ (७२), उस्मानाबाद ः ३३५ (३०), नांदेड ः १८० (११),
परभणी ः ९०७(७४), हिंगोली ः १८१ (२६), बुलडाणा ः १०५७ (६९), अकोला ः ७४१ (५९),वाशीम ः ८१४ (१०७), अमरावती ः १०४२ (५३), यवतमाळ ः १७०० (९९), वर्धा ः १७०० (१८४), नागपूर ः ११२५ (९२), भंडारा ः ५५५ (८९), गोंदिया ः ११०३ (२१४), चंद्रपूर ः १०८९ (१०६) गडचिरोली ः ६१८ (८८).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.