Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : दुनियेचा खर्च करून बसलाव..अन्‌ पिकं सुकू लागलीत..!

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Dharashiv News : ‘काय सांगाव, पाणी बी नाव, जनावराला चारा बी नाव, लईन बी नाव. खूरपला-फवारणी केलाव, दुनियेचा खर्च करून बसलाव.. अन्‌ पिकं सुकू लागलीत,’ अशा शब्दात उस्मानाबाद तालुक्‍यातील दीपकनगर तांडा येथील छमाबाई मोतीराम राठोड यंदाच्या खरिपाची व्यथा मांडत होत्या.

धाराशिव जिल्ह्यातील खरिपावर संकटाचे ढग तुलनेने अधिक गडद आहेत. जिल्ह्यात सर्वसाधारण ५ लाख ४ हजार ७३६ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात ५ लाख ४९ हजार ९४९ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक ४ लाख ७३ हजार ८४१ हेक्‍टरवर सोयाबीन, ३२ हजार ६२७ हेक्‍टरवर तूर, २६ हजार ३७५ हेक्‍टरवर उडीद, ५३६६ हेक्‍टरवर मुग या प्रमुख पिकांची पेरणी झाली आहे. बावीचे भारत माने म्हणाले, ‘‘पाणीच नाय. दोन एकरात सोयाबीन, पण पाणीच नसल्यानं हाती काहीच लागणार नाही.’’

पीक फुलोऱ्यात अन्‌ खंड..

यंदा पावसाअभावी १५ जुलैनंतर जिल्ह्यात पेरण्या झाल्या. त्यावेळी पेरलेले सोयाबीन सध्या फुलोऱ्यात आहे. नेमका याच काळात पावसाचा मोठा खंड पडल्याने लागलेल्या फुलांची संख्या तर कमी आहेच, पण ती गळतही आहे. हलक्‍या, मध्यम जमिनीवरील सोयाबीनचे तर आताच ५० ते ७० टक्‍क्‍यांपुढे नुकसान झाल्याचे चित्र आहे.

२१ दिवसांपेक्षा जास्त खंड

जिल्ह्यातील ५७ पैकी ३३ महसूल मंडलांत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड आहे. त्यामुळे भरपाईच्या २५ टक्‍के अग्रीमसाठी ही मंडल पात्र झाली आहेत. उर्वरित २४ मंडल निकषानुसार २८ ऑगस्टपर्यंत पात्र झाली नव्हती. त्याला २.५ मिलिमीटर पाऊस पडल्यास तो दिवस पावसाचा मानला जाने हे कारण मानले जात आहे. काही ठिकाणी केवळ ५ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे त्या ठिकाणचा पावसाचा खंड खंडित झाला. वास्तविक २.५ मिलिमीटर पावसाने सोयाबीन पिकास कोणतेही संरक्षित सिंचन मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

५७ महसूल मंडल, ४२ हवामान केंद्रे

जिल्ह्यात ४२ हवामान केंद्रे असून यावर्षी नव्याने १५ महसूल मंडळे झाल्याने एकूण महसूल मंडळांची संख्या ५७ झाली आहे. महावेध अंतर्गत उभारण्यात आलेली स्वयंचलित हवामान केंद्रे एका महसूल मंडळाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे पर्जन्यमान व इतर बाबींच्या नोंदीसाठी गावनिहाय स्वयंचलित हवामान केंद्राची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

प्रशासनाच्या सर्वेक्षणात नुकसान आले निदर्शनास

जिल्हा प्रशासनाच्या सर्वेक्षणात सर्वच ५७ मंडळात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. परंतु २१ दिवसाचा पावसाचा खंड २.५ मिलिमीटर पावसाच्या निकषामुळे २४ मंडले पीक विमा व शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ५७ महसूल मंडळामध्ये संरक्षण करण्यासाठी आदेशित करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे.

'कळ' कळीचा मुद्‌दा

दुष्‍‌काळ घोषित करण्याच्या शासन निर्णयामध्ये अनिवार्य निर्देशांकानुसार जून व जुलै महिन्यात एकूण सरासरी पर्जन्यमानाच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाल्यास प्रथम कळ लागू होते. तसेच जून ते सप्टेंबर महिन्यातील सरासरी पर्जन्यमान ७५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास प्रथम कळ लागू होते. परंतु धाराशीव जिल्ह्यात जुलै मध्ये

सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्याने प्रथम कळ लागू होत नाही. परंतु ऑगस्टमध्ये मात्र फक्‍त १६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रथम कळ लागू होण्यासाठी १ ऑक्‍टोबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे वस्तुस्थितीचा विचार करता प्रत्यक्षात होत असलेल्या नुकसानीचा व शासन निर्णयातील तरतुदीचा फेरविचार होण्याची विनंतीही प्रशासनाने केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ऑगस्टमध्ये अवघा १६ टक्के पाऊस

जिल्ह्याचे जून ते सप्टेंबर दरम्यानचे सरासरी पर्जन्यमान ६०३ मिलिमीटर आहे. जून महिन्यात १२६.९ मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत केवळ ३३.६ मिलिमीटर, जुलैमध्ये सरासरी १३७ मिलिमीटरच्या तुलनेत २२७ मिलिमीटर पाऊस झाला. परंतु ऑगस्टमध्ये २८ ऑगस्ट अखेर १३५ मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत फक्‍त २२ मिलिमीटर म्हणजे केवळ १६ टक्‍के पाऊस झाला आहे. काही मंडळामध्ये ३० दिवसापर्यंत पावसाचा खंड असून ऑगस्ट महिन्यात गत २० वर्षात सर्वात कमी पावसाची नोंद यंदा झाली आहे.

ऐन फुलोऱ्यात पीक असताना पावसाचा खंड मोठा पडला आहे. हलक्‍या व मध्यम जमिनीत ५० ते ६० टक्‍के तर काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सर्वेक्षणात नुकसान समोर येते आहे. शासनाला त्याची माहिती देण्यात आली आहे.
- रवींद्र माने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, धाराशीव
थोडा बहुत पाऊस पडत असला तरी एकाच गावशिवारात तो दोन रकमेचा आहे. मुळात पाऊसच महिन्यापासून दांडी मारून बसलाय. पिकाची वाढच झाली नाही.
- विजयकुमार तांबे, शेतकरी, माळकारंजा, कळंब
ऑगस्ट महिन्यात पावसाचा पूर्ण खंड. पाच एकर सोयाबीन पीक पूर्ण वाळून गेलेत. काहीही हाताला लागलं असं नाही. जनावरांना चारा मिळलं असंही वाटत नाही. पंचनाम्याची दखल नाही, शासनाचं लक्ष नाही. पुढच पूर्ण वर्ष भागवायचं कस हा प्रश्न आहे.
- गोपाल पाटील, जागजी, ता. धाराशीव.
महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने हाता-तोंडाशी आलेले उडदाचे पीक सुकून गेलय. काय करावे सुचत नाही. आमची सर्व मदार खरीप पिकांवर, पिकच सुकून गेल्याने उत्पन्नात मोठी घट होणार आहे. एकरी जवळपास १० - १२ हजार रुपये खर्च झालाय. वर्षभराचा प्रपंचाचा गाढा कसा हाकावा, ही चिंता आहे. शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी.
- समाधान काटे, शेतकरी, अनाळा, ता. परांडा
गेल्या २८ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिलीय. सोयाबीन पीक सुकू लागल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. एकरी १० ते १५ हजार रुपये खर्च झाला आहे. शासन काय मदत करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
वसुदेव भुजे , शेतकरी, कारला, ता. परांडा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT