Crop Damage : ‘जमिनीत ओलच नाही, सारी कोरडफाक हाय’; लातूर जिल्ह्यात गंभीरस्थिती

Latur Rain Update : लातूर जिल्ह्यातील बोरफळ येथील शेतकरी वसंत हरिबा शिंदे व विलास शिंदे हे काका-पुतणे व बसंती भाट हे खरिपातील पिकाची दैना मांडत होते.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Latur News : ‘‘चार थेंब पडत्यात, इघिन पडल्यागत. जमिनीत ओलच नाही, सारी कोरडफाक हाय. खुरटलेल्या पिकाला काही फुलं लागली आणि सुकलीही. त्यांना काय शेंगा येणार आहेत का? अख्ख्या शिवारातील हीच परिस्थिती आहे,’’ लातूर जिल्ह्यातील बोरफळ येथील शेतकरी वसंत हरिबा शिंदे व विलास शिंदे हे काका-पुतणे व बसंती भाट हे खरिपातील पिकाची दैना मांडत होते.

वसंत आणि विकास शिंदे म्हणाले, ‘‘मागच्या वर्षी अधिकारी लोक आले, पाहून गेले, फोटो काढले, पण विमा मिळाला नाय. यंदा अजूनही कुणी पाहणीसाठी आलंच नाही. लेट पेरल्याने मूग, उडीद बारीक बसलाय. सोयाबीनची अवस्था बिकट झालीय. साठलेला चारा संपून गेलाय.’’

लातूर जिल्ह्यातील सर्वच मंडलांत काही अंतराने ७ ते २७ दिवसांपर्यंतचा पावसाचा खंड पडला. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, कपाशी या सर्वच पिकांच्या वाढीवर पावसाच्या खंडाचा थेट परिणाम झालाय. या पिकांच्या उत्पादनात मोठी घट येणार हे स्पष्ट आहे. याशिवाय सोयाबीनवर काही भागात येलो मोझाक, उंट अळीचे आक्रमण झाले आहे.

Crop Damage
Crop Damage : मोहोळ तालुक्यातील पिके पावसाअभावी कोमेजताहेत

पंचनाम्यांचे आदेश

पावसाच्या खंडामुळे बाधित झालेल्या क्षेत्राच्या पंचनाम्याचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे पावसाचा मोठा खंड असलेल्या भागातील शेतकऱ्यांना पीकविमा परताव्याच्या आधाराची आशा निर्माण झाली आहे.

लातूर जिल्हा पेरणीस्थिती (हेक्टर)

सर्वसाधारण क्षेत्र : ५ लाख ९९ हजार ४५५

यंदाची पेरणी : ५ लाख ८५ हजार ८७६ (९८ टक्के) सोयाबीनची : ४ लाख ९७ हजार २२३

ज्वारी : ५,०३६

मूग : ४३१८

उडीद : २९१८

तूर : ६४३६३

कपाशी : ७५२

Crop Damage
Crop Damage : गडहिंग्लजमध्ये माळरानावरील भात पिकाने टाकली मान

पावसाचा खंड :

२१ दिवसांपेक्षा अधिक खंड असलेली तालुकानिहाय मंडल

लातूर तालुका : २१ ते २७ दिवस

मंडल : लातूर, बाभळगाव, हरंगुळ, कासारखेडा, मुरुड, गातेगाव, तांदुळजा, चिंचोली, कन्हेरी.

औसा तालुका (२३ ते २७ दिवस)

मंडल : बेलकुंड, किनई, उजनी

निलंगा तालुका (२२ ते २७ दिवस)

मंडल : पानचिंचोली, कासारबालकुंदा, मदनसुरी, भातमुगळी

शिरूर अनंतपाळ तालुका (२७ दिवस)

मंडल : हिसामाबाद

उदगीर तालुका (२१ व २२ दिवस)

मंडल : उदगीर, तोंडार

चाकूर तालुका (२२ दिवस)

मंडल : चाकूर, नळेगाव, वडवळ, शेगाव, झरी, आष्टा

रेनापूर तालुका (२२ दिवस)

मंडल : कारेपूर

जळकोट तालुका (२१ दिवस)

मंडल : घोणसी

पेरणीला बारीकच पाऊस झाला. अंगावरचे कपडे भिजायचे नाही. आता तर महिना झाला पाऊस नाही, उगं सटकारे पडले. मोठ्या पावसाची गरज आहे.
- हनुमंत वांगे, बावची, ता. रेनापूर
हलक्या, मध्यम जमिनीतली पिकं वाळून गेली. भारी जमिनीत भळी पडल्यात. ज्यांच्याकडे थोडं बहुत पाणी ते पिकाला देऊन वाचविण्याचा प्रयत्न करतात. पण वातावरण पाहता जसं पिकांना रब्बीत पाणी मानवत, तसं खरिपातलं मानवत नाही.
- बाळासाहेब मद्दे, पाथरवाडी, ता. रेनापूर
हलक्या मध्यम जमिनीतील पीक वाळून गेलंय. लय दिवसांपासून पाऊस नाही. जनावरांच्या वैरणीचं कसंबसं धकवणे सुरू आहे. अनेक विहिरींना, बोअरला पाणी नाही.
- शिवराज भंडारे, पानगाव, ता. रेनापूर
जवळपास महिना झाला पाऊस नाही. त्यातच अलीकडे मुगावर मावा पडलाय. त्यासाठी फवारणी करतोय. सोयाबीनचे पीक गेल्यात जमा आहे.
- लक्ष्मण मदन, बोरफळ, ता. औसा
पिकामध्ये काही सुद्धा राहिलं नाय. समद कोलमडून गेलंय, व्याजाने पैसे काढून शेतीला लावली, ती पण वसूल व्हनार नाय. शेतीतून काहीच उत्पन्न मिळेना.
- बापू दत्तू कांबळे, बेलकुंड, ता औसा
दुपारी कडक ऊन तापतंय. हलक्या रानातल्या पिकांचं ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान आहे. मोठा पावसाचा खंड असलेल्या मंडळातील सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सर्वेक्षणाअंती अहवाल प्रशासनाला सादर केला जाईल.
- शिवसांब लाडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com