Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season : ‘गुदस्ताहून निम्मंबी हाती लागायचा वाण दिसत नाही’

माणिक रासवे

Parbhani News : ‘‘महिनाभरानंतर शिडकावा पडला. माना टाकलेल्या सोयाबीनला थोडी तरतरी आली. पण, आता कितीही पाऊस पडून उपयोग नाय. गुदस्ताहून निम्मंबी हाती लागायचा वाण दिसत नाही (गेल्या वर्षीपेक्षा निम्मेही पीक हाती लागण्याचे चिन्ह दिसत नाही). औंदा घरच्या, अन् बटईच्याबी शेतात केलेला खर्च कुठून निघणार हाय,’’ असा सवाल करत बाबुलतार (ता.पाथरी) येथील शेतकरी पंढरी पितळे यांनी बांधावर बैलजोडी चारत असताना आपली व्यथा मांडली.

पितळे यांच्याकडे यंदा घरचे ५ एकर व बटईचे ३ एकर शेत आहे. पितळे यांच्याप्रमाणेच परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यातील ५२ मंडलातील असंख्य शेतकऱ्यांवर यंदा अल्प पाऊस व दीर्घ खंडामुळे बिकट परिस्थिती ओढवली आहे.

खरिपावरील संकट दिवसागणिक गडद होत आहेत. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा यासह नानाविध समस्यांमुळे शेतकऱ्यांपुढे अडचणींचे डोंगर वाढत आहेत. वर्षभरात कुटुंबाची उपजीविका व जित्रांब सांभळण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तजवीज कशी करावी यांची चिंता शेतकरी पितळे यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.

यंदा जिल्ह्यातील पावसाचे आगमन मागे-पुढे झाले. त्यानुसार पेरणी करावी लागली, काही भागात पिकाची चांगली वाढ झाली आहे. परंतु उशिरा पेरणी केलेली पिकांची वाढ अतिशय संथ आहे. लवकर पेरणी केलेले सोयाबीन फुलोरा तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. तर, कपाशीचे पीक पाते, फुले बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे.

सोयाबीनवर येलो मोझॅक रोग तसेच पाने खाणाऱ्या अळीचा, तर कपाशीवर मावा, फुलकिडे, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. शेंगा लागलेल्या मुगावर मावा पडला आहे. तूर, ज्वारी, बाजरी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

मात्र, सर्वच पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली आहे. हलक्या, बरड, मध्यम तसेच जिंतूर,गंगाखेड, पालम तालुक्यांतील डोंगराळ भागातील दगडगोट्याच्या माळरानावरील जमिनीवरील पीक परिस्थिती गंभीर आहे.

ऑगस्ट महिन्यात अल्प पाऊस...

यंदा जून महिन्यात सरासरी १४५.३० मिलिमीटर अपेक्षित प्रत्यक्षात ५५.५ मिलिमीटर (३८.३ टक्के) पाऊस पडला. जुलै महिन्यात सरासरी २१०.२ मिलिमीटर अपेक्षित असताना प्रत्यक्षात २११.१ मिलिमीटर (९६.३ टक्के) पाऊस पडला. परंतु, २९ जुलै पासून ते १९ ऑगस्ट या कालावधीत सलग २० ते २२ पावसाचा खंड पडला.

ऑगस्ट महिन्यातील पाऊस स्थिती (मंगळवार, ता.२९ पर्यंत)

सरासरी पाऊस...पडलेला पाऊस...टक्के

२१३.१...७२.२...३३.९

५ लाख हेक्टर विमा संरक्षित

पीकविमा योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७ लाख ६१ हजार ८२३ पीकविमा अर्ज दाखल केले. सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद,ज्वारी, बाजरी ही ७ पिके मिळून एकूण ५ लाख १ हजार ६८ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित केली आहेत. त्यासाठी २ हजार ६१६ कोटी ४८ लाख ६४ हजार ६७ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे.

धरणे अजून रिकामीच...

यंदा जायकवाडी धरणात ३३.२५ टक्के, माजलगाव धरणात १३.२७ टक्के, येलदरी धरणात ५९.९१ टक्के, निम्न दुधना २६ टक्के पाणीसाठा आहे. करपरा तसेच मासोळी मध्यम प्रकल्प भरलेच नाहीत. पाणीसाठ्यात घट होत आहे. येत्या काळात सिंचनासाठी पाणी मिळण्याची शक्यता दिसत नाही.

पीक पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

सरासरी क्षेत्र : ५ लाख ३४ हजार ८९९

यंदाची पेरणी : ५ लाख ६ हजार १७७ (९४.६३ टक्के)

................................. पीक....सरासरी क्षेत्र...पेरणी क्षेत्र...टक्के

सोयाबीन...२४९७२७...२६५२४४...१०६.२१

कपाशी...१९२२१३.....१९०२४५...९८.९८

तूर...४५९५९...३६३८८....७९.७१

मूग...२७१७८...७३६५...२७.१०

उडीद...९०८०...२७२७....३०.०३

ज्वारी...७३३३...२२२८...३०.३८

बाजरी...११६७...५२८...४५.२१

मका...१००२...८४२...८३.९८

ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत खूप कमी आहे. जिल्ह्यातील ११ मंडलात सलग २१ दिवसाचा खंड पडल्यामुळे अग्रिम विमा रकमेसाठी अधिसूचना काढण्यात आली. इतर मंडळातील पीक परिस्थितीही जेमतेम आहे.सर्वच पिकांच्या उत्पादकतेत मोठी घट येणार आहे.
- विजयकुमार लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी.
आमच्या गावातील काही भागात यंदा नांगरटीमधील ढेकळं विरघळण्या एवढाही पाऊस झालेला नाही. कोरडवाहू जमिनी खाकस झाल्या आहेत. नुसता धुराळा उडायलाय. कडक उन्हात पीक सुकत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या कापसाला अजून पाते नाहीत, अन् फुलंही लागले नाहीत.
- बाबासाहेब रनेर, कृषिभूषण, बाभळगाव, ता.पाथरी.
यंदा पेरणीस उशिरा झाला, त्यानंतर तब्बल महिनाभर पावसाने दडी मारली. सोयाबीनमध्ये फूलगळ होत आहे. तुरीची वाढ खुंटली आहे. सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करावा.
- दत्तात्रय कच्छवे, दैठणा, ता.परभणी.
औंदा अजून कपाशी कुठं इतभर, कुठं गुडघाभर वाढलेत. महिनाभर पाऊस नव्हता. दोन दिवसात थोडा पाऊस पडल्याने हिरवं झालेत. सप्टेंबर महिन्याभर पाऊस पडत, तर दोन चार बोंड लागतील. सरकी, खतावरचा खर्च निघल, तर निघल. बाकी काही आशा नाही.
- मोतीराम ब्याळे, आडगाव, ता‌.पालम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT