Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : ऑगस्टमधील पावसाच्या खंडाने वाढली चिंता

Rain Update : प्रामुख्याने फुलोऱ्यात असलेल्या सोयाबीन पिकाला या अवस्थेत पावसाची नितांत गरज निर्माण झाली असून शेतकरी चिंतातूर झाला आहे.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात पावसाचा खंड वाढल्याने पीक उत्पादनाला मोठा फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रामुख्याने फुलोऱ्यात असलेल्या सोयाबीन पिकाला या अवस्थेत पावसाची नितांत गरज निर्माण झाली असून शेतकरी चिंतातूर झाला आहे. दुपारच्या वेळी पीक कोमेजलेले दिसून येत आहे.

अकोला जिल्ह्यात यंदाच्या हंगामात दोन लाख ३१ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. तर बुलडाण्यात ४ लाख १३ हजार आणि वाशीम जिल्ह्यात ३ लाख ९ हजार हेक्टरवर पेरणी झाली. पावसाने मोठी उघडीप दिल्याने चिंता वाढत चालली.

पावसाचे जवळपास तीन महिने पूर्ण होत आले आहेत. जिल्ह्यात पावसाची मोठी तूट कायम आहे. एकीकडे पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत तर दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा न झाल्याने भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे.

अकोला जिल्ह्यात सोमवारपर्यंत (ता. २८) सरासरी पावसाच्या तुलनेत ६४.८ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी याच काळात एकूण ९१.४ टक्के पाऊस झाला होता. सरासरी पावसाच्या तुलनेत अनेक मंडलांमध्ये तूट वाढल आहे.

आता पावसाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांपुढे उभे पीक जगवण्याचा प्रश्न तयार झाला आहे. शनिवारी (ता. २६) मूर्तीजापूर, बार्शीटाकळी तालुक्यांतील काही गावांत भेट दिली असता पावसाअभावी पिकांची स्थिती कठीण बनल्याचे दिसून आले.

कोरडवाहू शेतांमध्ये दुपारी सोयाबीनचे पीक कोमेजलेले बघायला मिळत होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, ते शेतकरी तुषार सिंचनासाठी धडपडत होते. गेल्या महिन्यात २७ जुलैला दमदार पाऊस झाल्यानंतर आजवर रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला.

तोही सार्वत्रिक स्वरूपाचा नव्हता. यामुळे पावसाच्या सरासरीत दररोज तूट वाढत चालली. आता येत्या तीन-चार दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांसमोर संकट वाढू शकते. या हंगामात लागवडीपासूनच पिके केवळ रिमझिम पावसावर तग धरून आहेत.

गेल्या आठवडयात या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. यामुळे पिकांना काही दिवसांसाठी दिलासा मिळाला. सध्या सोयाबीनचे पीक फुलोरावस्थेत आहे. काही ठिकाणी शेंगा धरण्याची प्रक्रियाही होत आहे. अशात पावसाच्या खंडाचा परिणाम सोयाबीन पिकावर सध्या अधिक होऊ शकतो. तसेच कपाशीच्या क्षेत्रातही उत्पादन घटीची शक्यता आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेला एकूण पाऊस

तालुका पाऊस (मिमी) टक्केवारी

अकोट २५७.४ ४७.६

तेल्हारा ४२६.९ ८१.९

बाळापूर ३५४.१ ७१.९

पातूर ३८२ ५७.८

अकोला ३६२.७ ६६.०

बार्शीटाकाळी ४४१ ७९.४

मूर्तीजापूर ३३४.६ ५९.४

सरासरी ३५९.४ ६४.८

गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने खंड दिला आहे. पिकांची स्थिती दररोज चिंताजनक बनत आहे. पिकाला सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पावसाअभावी पिके धोक्यात आल्याने सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता वाटत आहे. शासनाने शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई व आर्थिक स्वरूपात मदत देऊन दिलासा द्यावा.
- स्वप्नील गणेशपुरे, शेतकरी, अनभोरा, ता. मूर्तीजापूर, जि. अकोला.
यंदा २५ एकरात सोयाबीन पेरली आहे. आमच्याकडे सिंचनाची सोय आहे. मात्र, दिवसा वीज मिळत नसल्याने रात्री जागून पिकाला पाणी दिले. आता पीक कसेबसे तगलेले आहे. परंतु कोरडवाहू क्षेत्रात बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक हातातून जाण्यासाऱखी स्थिती बनली आहे. पाऊस न आल्यास ५० टक्के उत्पादन घटीची शक्यता आहे
- चेतन पंडागळे, कानशिवणी, जि. अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT