Palghar News : पालघर तालुक्यातील केळवे रोड, सफाळे परिसरातील बुलेट ट्रेनसाठी शेतकऱ्याकडून संपादित केलेल्या जमिनीच्या किमतीत दुजाभाव केल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला आहे.
भूसंपादनामध्ये १२८ शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. ही जमीन संपादित होताना शेतकऱ्याला अधिकारी तसेच दलालामार्फत मनस्ताप सहन करावा.
त्यामुळे या अन्यायाबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बुलेट ट्रेन शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.
पालघर तालुक्यातील वरखुंटी, कमारे, वाकसई, केळवा रोड, वीराथन खुर्द, मांडे, शिलट्टे, विराथन बुद्रुक, जलसार व टेंभी खोडावे या गावात भूसंपादन करताना एकाच गावात एकाच गटातील जमिनीमध्ये वेगवेगळे दर देण्याचा प्रकार झाला आहे.
कमरे गावातील गट क्रमांक १४७/१, व १६८ १६८/२ यामध्ये त्यांना ३ लाख ५९ हजार ४४० रुपये प्रतिगुंठा इतकी रक्कम दिली; तर त्याच गटाशेजारी गट क्रमांक १४५ व गट क्रमांक १४६ यांना अनुक्रमे सात लाख ६७ हजार रुपये देण्यात आले.
केळवा रोड येथील गट क्रमांक ११०७ अ यांना तीन लाख ५९ हजार ४४० रुपये प्रतिगुंठा दर दिला; तर त्याच्या शेजारील गट क्रमांक ११०५ यांना सात लाख ६७ हजार रुपये दर देण्यात आला. त्यामुळे भूसंपादनानंतर कोणत्या निकषानुसार ही रक्कम ठरविण्यात आली, असा सवाल शेतकरी करीत आहेत.
या जमीन संपादनानंतर शेतकऱ्याला त्याच्या शेतीत जाण्यासाठी पर्यायी व्यवस्थाही केलेली नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांना मोबदला न देता भूसंपादन केले आहे. १७.५ मीटरचे भूसंपादन असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे तीस मीटरचे भूसंपादन केले आहे.
याबाबत मोबदला देण्याबाबत शेतकऱ्याला कुठलीही स्पष्टता दिलेली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्या पुनर्वसनासाठीही कुठलीही प्रक्रिया शासनाकडून झालेली नाही.
पालघर तालुक्यातील केळवे रोड व सफाळे परिसरातील १२८ शेतकऱ्यांच्या जमिनी बुलेट ट्रेनसाठी संपादित केल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देताना दुजाभाव केला आहे. जमीन संपादित करताना जमिनीचे दोन तीन तुकडे झाले आहेत. यासाठी किसान काँग्रेसतर्फे आम्ही या शेतकऱ्यांची संघर्ष समिती स्थापन केली आहे.- पराग पष्टे, अध्यक्ष, किसान काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.