गेल्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळाला असला तरी अनेक शेतकऱ्यांना कापसाची उत्पादकता खूपच कमी मिळाली. त्यामुळे विक्रमी भाव असूनही त्यांना कापूस पीक आर्थिकदृष्ट्या परवडले नाही. त्यामुळे यंदा राज्यात कापसाचे लागवड (Cotton Sowing) क्षेत्र वाढणार असले तरी अनेक ठिकाणी शेतकरी कापसाऐवजी मक्याला पसंती देत आहेत.
मका हे राज्यातील एक महत्वाचे तृणधान्य पीक आहे. पोल्ट्रीसह Poultry जागतिक बाजारपेठेत मक्याला मोठी मागणी आहे. सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून मका पिकाचे व्यवस्थापन केल्यास भरघोस उत्पादन घेता येते.
मक्याचा वापर मुख्य:त्वे अन्नधान्य, पशुखाद्य, पोल्ट्रीखाद्यामध्ये केला जातो. मक्यापासून विविध मूल्यवर्धीत पदार्थ तयार केले जातात. राज्यात मका हे पीक प्रामुख्याने नाशिक, धुळे, कोल्हापूर, औरंगाबाद, नगर, उस्मानाबाद, जालना, बुलडाणा आणि सोलापूर या जिल्हयांत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मका हे मिश्र पिक म्हणून ऊस, हळद आणि काही प्रमाणात पेर भातामध्ये घेतले जाते. मिश्र पिकाचा मुख्य उद्देश जनावरांसाठी हिरवा चारा आणि खाण्यासाठी कोवळी कणसे मिळविणे हा असतो. परंतु मिश्र पिक पद्धतीमुळे मक्याची सरासरी प्रती हेक्टर उत्पादकता कमी आहे. त्याकडे लक्ष देऊन उत्पादकता वाढविली पहिजे.
हवामान
मका पिक हे उष्ण, समशीतोष्ण आणि शीत अशा वेगवेगळ्या हवामानाशी समरस होणारे पीक आहे. त्यामुळे ते तिन्ही हंगामात घेतले जाते. परंतु, उगवणीच्या काळात अधिक पाऊस, कमी तापमान व पीक वाढीच्या काळात धुके पिकावर प्रतिकूल परिणाम करतात. मक्याची योग्य वाढ आणि विकासासाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान चांगले परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ अंश सेल्सिअस) आहे. अशा ठिकाणी मका हे पिक वर्षभर घेता येते. तापमान १८ अंश सेल्सिअस पेक्षा कमी असल्यास त्याचा मका उगवणीवर परिणाम होतो. तसेच पीक फुलोऱ्यात असताना तापमान ३५ अंश सेल्सियस पेक्षा अधिक असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते.
जमिनीची निवड
मक्यासाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ Organic Matter आणि जलधारणा शक्ती Water Holding Capacity असलेली जमीन मानवते. विशेषत: नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पिक फार चांगले येते. अधिक आम्ल ( सामू ४.५ पेक्षा कमी) आणि चोपण किंवा क्षारयुक्त (८.५ पेक्षा अधिक सामू) जमिनीत मका घेऊ नये. दलदलीची जमीनसुद्धा टाळावी. जमिनीचा सामू Soil PH ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.
पूर्वमशागत
जमिनीची खोल (१५ ते २० सें. मी.) नांगरट Ploughing करावी. कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी १० ते १२ टन (२५ ते ३० गाडया) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. हिरवळीचे खत Green Manure जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता भासत नाही.
सुधारित वाण
बायो - ९६८१, एच क्यु पी एम-१, एच क्यु पी एम-५, राजर्षी, बायो-९६३७, पुसा संकर मका-१,आफ्रिकन टाॅल (हिरव्या चाऱ्यासाठी उत्तम), मांजरी नारंगी, फुले महर्षी इ.
मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती या स्थानिक वाणांपेक्षा ६० ते ८० टक्के अधिक उत्पादन देतात. विविध कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती उपलब्ध असून पाऊस आणि जमिनीच्या मगदूराप्रमाणे योग्य वाणाची निवड करावी. हेक्टरी १५-२० किलो बियाणे लागते.
बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे म्हणजे करपा रोगाचे नियंत्रण करता येते. अझोटोबक्टर जीवाणू संवर्धन २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी. पेरणी Sowing शक्यतो १५ जून ते १५ जुलै दरम्यान करावी. पेरणीस उशीर झाल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त असतो. पेरणी टोकण पद्धतीने जमिनीत ४ ते ५ सेमी खोलीवर करावी. उशिरा व मध्यम येणाऱ्या वाणांसाठी पेरणीचे अंतर ७५ बाय २० सेंमी तर लवकर पक्व होणाऱ्या वाणांसाठी ६० बाय २० सेंमी अंतर ठेवावे. जमीनीच्या प्रकारानुसार सरी-वरंबा अथवा सपाट जमिनीवर मक्याची पेरणी करावी. जमीन समपातळीत नसल्यास पाणी साचण्याचा धोका असतो. पाणी साचलेल्या जमिनीत मक्याची उगवण चांगली होत नाही. त्यामुळे जमिनीचा उतार व निचरा होण्याची क्षमता यावर विचार करून सरी-वरंबा अथवा सपाट जमिनीवर मक्याची पेरणी करावी.
खत व्यवस्थापन
मका पीक जमिनीतून मोठया प्रमाणात अन्नद्रव्ये शोषून घेते. त्यामुळे मक्याला ‘खादाड पीक’ असे संबोधले जाते. नत्राचा पुरवठा दाणे भरण्याच्या वेळेपर्यंत आवश्यक असल्याने व निचऱ्याद्वारे नत्राचा ऱ्हास होतो म्हणून नत्र खतमात्रा विभागून द्यावी. परंतु संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंकची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी २० ते २५ किलोग्रॅम झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे.
पाणी व्यवस्थापन
मका पीक पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील असते. पिकाच्या रोप अवस्थेत, तुरा बाहेर पडताना, पिक फुलोऱ्यात असताना आणि दाणे भरण्याच्यावेळी पाणी द्यावे.
पीक संरक्षण
मका पिकावर ढगाळ हवामानामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. अवस्थेनुसार मक्यावर पांढरी माशी, मावा, तुडतुडे, देठ कुरतडणारी अळी, फुलकिडे, खोडकिडा, नाकतोडे, लष्करीअळी, पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, केसाळ अळी, करडेसोंडे, कणसे पोखरणाऱ्या व स्त्रीकेसर खाणाऱ्या अळ्या चा प्रादुर्भाव होतो. रोगामध्ये मक्यावर खोड कुजव्या आणि करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. शिफारशीत कीडनाशके व रोगनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करुन एकात्मिक किड व रोग नियंत्रणाचे उपाय योजावेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.