मका लागवडीसाठी योग्य जातीची निवड

पेरणीसाठी जमिनीच्या प्रकारानुसार मक्याच्या योग्य जातीची निवड करावी. पेरणी १५ जून ते १५ जुलै दरम्यान पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर लगेच करावी. पेरणीसाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे पुरसे आहे.
Maize
MaizeAgrowon
Published on
Updated on

महाराष्ट्रात रब्बी हंगामापेक्षा खरिपात मका पिकाची मोठी लागवड होते. काही पिकांमध्ये मिश्र पीक म्हणूनही मक्याची लागवड होते. मिश्र पीक पद्धतीमुळे जनावरांना हिरवा चारा आणि खाण्यासाठी कोवळी कणसे उपलब्ध होतात. तसेच धान्य उत्पादनही मिळते.

जमीन आणि हवामान ः

- मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची आणि अधिक जलधारणाशक्ती असलेली जमीन लागवडीस योग्य असते.

- जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.

- मक्याची योग्य वाढ आणि विकासासाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास उत्पादनात घट येते.

पूर्वमशागत ः

- पूर्वमशागत उन्हाळ्यात जमिनीची खोल (१५ ते २० सें. मी.) नांगरट करावी. कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी. शेवटच्या पाळीच्या अगोदर २५ गाड्या शेणखत प्रति हेक्टरी पसरून द्यावे. जमिनीत चांगले मिसळावे

- जमिनीची १५ ते २० सेंमी खोल नांगरट करावी. खोल नांगरटीमुळे पिकाची धसकटे, अवशेष, काडीकचरा इत्यादी जमिनीत गाडले जातात.

- त्यानंतर कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर १० ते १२ टन (२५ ते ३० गाड्या) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रति हेक्टर प्रमाणे जमिनीत मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास, शेणखताची आवश्यकता भासत नाही.

सुधारित जाती ः

मका पिकाच्या संमिश्र व संकरित जाती या स्थानिक जातींच्या तुलनेत ६० ते ८० टक्के अधिक उत्पादन देतात. जमिनीचा मगदूर आणि पावसाचे प्रमाण आदी बाबी विचारात घेऊन लागवडीसाठी योग्य जातीची निवड करावी.

जातीचे नाव---सरासरी धान्य उत्पादन (क्वि./हे.)

संकरित जाती--००

अ) उशिरा पक्व होणारे जाती (१०० ते ११० दिवस)--००--००

१) बायो-९६८१---६० ते ७०

२) एच.क्यू.पी.एम-१---६० ते ६५

३) एच.क्यू.पी.एम-५---५५ ते ६०

४) संगम---७५ ते ८०

५) कुबेर---७५ ते ८०

ब) मध्यम कालावधीत पक्व होणारे ( ९० ते १०० दिवस)

१)राजर्षी---७० ते ७५

२)फुले महर्षी---७५ ते ८०

३) बायो-९६३७---७० ते ७५

क) लवकर पक्व होणारे (८० ते ९० दिवस) व अति लवकर पक्व होणारे जाती (७० ते ८० दिवस)

१) पुसा संकरित मका १----४० ते ५०

२) विवेक संकरित मका २१---४५ ते ५०

३) विवेक संकरित मका २७---५० ते ५५

४) महाराजा---६० ते ६५

ड) चाऱ्यासाठी

संमिश्र जाती ः आफ्रिकन टॉल---६० ते ७० टन हिरवा चारा, धान्य उत्पादन ४० ते ५० क्विंटल.

बीजप्रक्रिया ः (प्रतिकिलो बियाणे)

- सायॲन्ट्रानिलीप्रोल (१९.८ टक्के) अधिक थायमेथॉक्झाम (१९.८ टक्के एफएस) ६ मिलि.

या बीजप्रक्रियेमुळे पेरणीनंतर १५ ते २० दिवसापर्यंत पिकाचे अमेरिकन लष्करी अळीपासून संरक्षण होते.

- थायरम २ ते २.५ ग्रॅम (करपा नियंत्रण) तसेच ॲझेटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.

पेरणी ः

- पेरणीसाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे पुरसे आहे.

- पेरणी १५ जून ते १५ जुलै दरम्यान पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर लगेच करावी. पेरणीस उशीर झाल्यास, खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते.

- पेरणी टोकण पद्धतीने ४ ते ५ सेंमी खोलीवर करावी.

पेरणी अंतर ः

१) उशिरा व मध्यम कालावधी जातींसाठी ः ७५ बाय २० सेंमी

२) लवकर पक्व होणाऱ्या वाणांसाठी ः ६० बाय २० सेंमी

खत व्यवस्थापन ः

पेरणीवेळी स्फुरद आणि पालाश खताची संपूर्ण मात्रा आणि नत्राची मात्रा ३ समान हप्त्यात विभागून द्यावी. पेरणीवेळी रासायनिक खते ५ ते ६ सेंमी खोलीवर जमिनीत चांगली मिसळून द्यावीत. झिंकची कमतरता असल्यास, हेक्टरी २० ते २५ किलो झिंक सल्फेट पेरणीवेळी द्यावे.

द्यावयाची वेळ---अन्नद्रव्ये (किलो प्रति हेक्टर)

००---नत्र (युरिया)---स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट)---पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश)

१) पेरणीच्या वेळी---४० (८८)---६० (३७८)---४० (६८)

२) पेरणीनंतर ३० दिवस---४० (८८)---००---००

३) पेरणीनंतर ४०-४५ दिवसांनी---४० (८८)---००---००

एकूण---१२० (२६४)---६० (३७८)---४० (६८)

पाणी व्यवस्थापन ः

खरिपामध्ये पावसात खंड पडल्यास, पीक वाढीच्या अवस्थेत संरक्षित पाणी द्यावे.

वाढीच्या अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन ः

पाण्याच्या एकूण पाळ्या---आवश्यक पाणी (सेंमी)---महत्त्वाच्या अवस्था---पेरणी पासूनचा काळ(दिवस)

४---४० ते ४५---१) रोप अवस्था---२५-३०

००-----००---२) तुरा बाहेर पडताना---४५-५०

००-----००---३) फुलोऱ्यात असताना---६०-६५

००-----००---४) दाणे भरतेवेळी---७५-८०

आंतरमशागत ः

- पीक उगवत असताना, आलेले कोवळे कोंब पक्षी टिपून खातात. परिणामी, रोपांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते. त्यासाठी पेरणीनंतर सुरुवातीचे १० ते १२ दिवस शेताची राखण करावी.

- उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर एकच जोमदार रोप ठेऊन विरळणी करावी. आवश्यकतेनुसार नांग्या भरून घ्याव्यात.

- पेरणीनंतर सुरुवातीच्या २० दिवसांपर्यंत शेतात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

- वाढीच्या सुरुवातीच्या काळात १ ते ३ खुरपण्या करून शेत ताणविरहित ठेवावे. गरजेनुसार १ ते २ कोळपण्या कराव्यात.

- डॉ. अनिलकुमार भोईटे, मका पैदासकार

सुशांत महाडीक, (वरिष्ठ संशोधन सहाय्यक) ७५८८५७७१२१

डॉ. शैलेश कुंभार, वरिष्ठ संशोधन सहाय्यक

डॉ. सुहास भिंगारदेवे, सहाय्यक मका कृषिविद्यावेत्ता

शैलेंद्र वाळे, सहाय्यक मका कीटकशास्त्रज्ञ

(अखिल भारतीय मका संशोधन प्रकल्प, कसबा बावडा,जि. कोल्हापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com