चांगली वैरण ही उत्तम दूध उत्पादनाची गुरुकिल्ली आहे, कारण दुभत्या जनावरांवर होणाऱ्या एकूण खर्चापैकी ६५ टक्के खर्च हा आहारावर होतो. हा खर्च कमी करण्यासाठी पुरेसा हिरवा चारा उपयोगी ठरतो.
समतोल आहाराच्या दृष्टीने एकदल व द्विदल चाऱ्यांचे प्रमाण अर्धे-अर्धे असावे, म्हणजे एकूण २५ ते ३० किलो हिरव्या चाऱ्यात १३ ते १५ किलो एकदलीय वैरण उदा. ज्वारी, बाजरी, मका, ओट, संकरित नेपिअर, जयवंत, यशवंत, इ. आणि १३ ते १५ किलो चवळी, लसूणघास, बरसीम, स्टायलो, शेवरी इ. किमान ८ लिटर दूध देणाऱ्या गायीला लागणाऱ्या सर्व पोषकतत्त्वांचा पुरवठा कोणतीही पेंड/ढेप अथवा आंबवण न देता फक्त द्विदल हिरवा चारा जसे बरसीम, लसूणघास किंवा चवळी यापैकी एक देऊन होऊ शकतो. म्हणजेच हिरव्या चाऱ्यामुळे दूध उत्पादनाच्या खर्चात मोठी घट होऊन आर्थिक फायदा वाढतो.
ऊर्जेचा उत्तम स्रोत हिरवा चारा ः
साधारणपणे ६ ते ७ गुंठे क्षेत्रातून रोज एका जनावरास १२ ते १३ किलो हिरवा चारा मिळविण्यासाठी उन्हाळ्यात व पावसाळ्यात ज्वारी, बाजरी, मका, संकरित नेपिअर इ. तर हिवाळ्यात मला, ओट, ज्वारी यांची पेरणी करावी. उरलेला १२-१३ किलो हिरवा चारा मिळविण्यासाठी उन्हाळ्यात व पावसाळ्यात ज्वारी, बाजरी, मका, संकरित नेपिअर इ. तर हिवाळ्यात मका, ओट, ज्वारी यांची पेरणी करावी. उरलेल्या १२-१३ किलो द्विदल वैरणीसाठी साधारण ३ गुंठे क्षेत्रात लसूण घासासारखे चारापीक घेता येईल. म्हणजेच एका दुभत्या जनावरासाठी वर्षभर एकदल व द्विदल हिरवा चारा प्रतिदिन २५ किलो पुरविण्यासाठी एकूण ९ ते १० गुंठे क्षेत्र लागते. थोडक्यात एका हेक्टरमध्ये १० दुभत्या जनावरांच्या हिरव्या चाऱ्यांची वर्षभराची गरज भागू शकते. एकदल चाऱ्यात प्रथिने कमी असतात. परंतु शर्करा व तंतुमय (फायबर) पदार्थांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याच्या सेवनाने जनावरांना जास्त प्रमाणात ऊर्जा उपलब्ध होते. त्याच वेळी द्विदलीय वैरणीत प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कॅल्शिअम व इतर खनिजे जास्त प्रमाणात असतात, म्हणजे एकंदरीत उत्तम पोषणासाठी लागणारे सर्व पोषकतत्त्वे/ अन्नघटक या मिश्रणातून मिळतात. हिरव्या चाऱ्यासाठी वर्षभराचे नियोजन एका जनावरास २० किलो प्रतिदिन या प्रमाणे आपल्याकडे १० जनावरे असल्यास त्यांची दैनंदिन गरज २० x १०= २०० किलो प्रतिदिन म्हणजे वर्षभरासाठी २०० x ३६५ = ७३००० किलो म्हणजेच ७३० क्विंटल किंवा ७३ टन.
मुरघास म्हणजे हिरव्या चाऱ्याची हवाबंद पद्धतीने साठवून मुरवलेली/ आंबवलेली कुट्टी. मुरघास बनविण्यासाठी एक खड्डा किंवा टाकीमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेला हिरवा चारा कुट्टी करून २ ते ३ महिन्यांसाठी हवाबंद पद्धतीने साठवून ठेवतात. ज्या पिकांमध्ये शर्करायुक्त पदार्थाचे प्रमाणात जास्त असते ती पिके उदा. ज्वारी, मका, बाजरी, ओट, गजराज, यशवंत इ. (मुरघास तयार करण्याकरिता उत्तम असतात.) जमिनीत ६ फूट खोल तळाला ६ फूट रुंद व वरती ८ फूट रुंद असा आयाताकृती खड्डा/ चर करावा किंवा १५ ते २० फूट उंचीचे गोलाकार मोठे सिमेंट पाइप उभे करून त्यात हिरव्या चाऱ्याची कुट्टी घट्ट बसेल अशा पद्धतीने भरावी. खड्डा पूर्ण भरल्यावर त्याच्या पृष्ठभागावर ३ ते ४ फूट उंचीचा निमुळता ढीग तयार करावा आणि त्यावर पॉलिथिन टाकून निरुपयोगी गवत किंवा कडब्याच्या पेंढ्याचा थर देऊन लिंपावे. काही दिवसांनी लिंपणाला भेगा पडल्यावर पुन्हा लिंपून खड्यातील कुट्टी हवाबंद राहील याची काळजी घ्यावी. साधारणतः दोन महिन्यांत मुरघास तयार होतो. दोन महिन्यानंतर लहानसे छिद्र पाडून त्यातून मुरघास काढून घेण्याची व्यवस्था करावी, असा तयार मुरघास जनावरांना १५ ते २० किलोपर्यंत देता येतो. संपर्क ः डॉ. रूपेश कोल्हे, ७५०७९९१९८९ (स्नातकोतर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)