
Jalgaon News: यंदा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासंबंधीचा माहोल ग्रामीण भागात तयार झाला आहे. इच्छुक मंडळी आपापल्या क्षेत्रात मतदार नोंदणी, जनजागृती, लहान कार्यक्रम घेऊन संपर्क अभियान राबवित आहेत. अनेक इच्छुक उमेदवारीसाठी आपापल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावत आहेत.
जळगाव जिल्हा परिषदेत सुमारे तीन वर्षे प्रशासकराज आहे. विविध कारणांनी निवडणूक प्रक्रिया लांबली. सदस्य, पदाधिकारी जिल्हा परिषदेत नसल्याने सरपंच, ग्रामीण भागातील कार्यकर्ते, पुढाऱ्यांना अडचणी आल्या. आपापली कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे खेटे घालावे लागले.
प्रशासनानेच अंदाजपत्रक, कामे, मंजुऱ्या, निधी याचे काम केले. परंतु पुढील काही महिन्यांत किंवा दसरा, दिवाळीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी इच्छुक मंडळी वातावरण तयार करीत आहे. अनेक जण संपर्क अभियान राबवू लागले आहेत.
शासनाच्या योजना किती व कशा आहेत, त्यासाठी काय प्रक्रिया पार पाडावी, यासंबंधीचे मार्गदर्शन, कागदपत्र गोळा करण्याचे उपक्रम अनेकांनी सुरू केले आहेत. आपापल्या गावांसह मोठ्या गावांत संपर्क अभियान राबवून कार्यकर्ते तयार करीत आहेत. संबंधित भागातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत आहेत. यामुळे भर पावसाळ्यात निवडणुकीचा माहोल तयार होताना दिसत आहे.
पारावरही निवडणुकीची चर्चा सुरू झाली असून, जो संपर्कात होता, जो सुखदुखःखात आला, त्यालाच संधी द्यायची, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यात काही संधीसाधूदेखील जातीय कार्ड खेळून आपली उमेदवारी भक्कम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आयाराम गयाराम
जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तयार होताच आयाराम गयाराम असा कार्यक्रमही सुरू आहे. इकडून तिकडे उड्या मारणारी मंडळी दिसू लागली आहेत. यात कुणीही बुडत्या नावेत बसायचे नाही, अशा भूमिकेत आहेत. यामुळे निष्ठा व प्रामाणिकपणा हे मुद्देही चर्चेत येऊ लागले आहेत.
मतदार संख्या वाढवा
आपापले मतदार वाढावेत यासाठीदेखील अनेक इच्छुक प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी अभियान सुरू आहे. यामुळे जिल्ह्यात मतदार संख्याही वाढली आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत ११ मतदार संघात ३६ लाख ७८ हजार मतदार होते. ही मतदार संख्या वाढली असून, आता ३७ लाख २१ हजार ७०० पेक्षा अधिक मतदार आहेत. सुमारे ४३ हजार ६०० पेक्षा अधिकचे मतदार वाढले आहेत. नवमतदारांत युवक, युवतींची संख्या अधिक आहे. मतदार वाढवा व आपले गणित पक्के करा, असा अजेंडा अनेक इच्छुक राबवित आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.