Zero Tillage Technology : शून्य मशागत तंत्राचा प्रसार व्हावा झपाट्याने

Farming Technique : शून्य मशागत तंत्राचा अवलंब मी माझ्या शेतात पाच वर्षांपासून करतो. मराठवाडा, विदर्भातील कोरडवाहू शेतकरी मित्रांना माझे नम्र आव्हान आहे, की आपणही अनेक अंगांनी उपयुक्त अशा या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करायला हवा.
Zero Tillage Farming
Zero Tillage FarmingAgrowon
Published on
Updated on

Agriculture Technology : मागील दोन दशकांचा अनुभव पाहता पाऊस कमी होवो किंवा जास्त होवो, कोरडवाहू शेतीच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. कोरडवाहू शेतीचे आत्मचिंतन होऊन त्यावर ठोस उपाय गरजेचे आहेत. नुसत्या योजनेची घोषणा करून चालणार नाही. मराठवाडा आणि विदर्भ या विभागांतील जमिनीची उत्पादकता आणि उत्पादनावर होणारा खर्च याचा ताळमेळ बसविताना शेतकरी त्रस्त होत आहेत.

मराठवाडा आणि विदर्भातील सेंद्रिय कर्ब हा ०.५ च्या खाली म्हणजे धोक्याच्या पातळीच्या खाली गेला आहे, ही चिंतेची बाब आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही प्रयोगशील शेतकरी वेगवेगळ्या तंत्रज्ञाचा वापर करून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात प्रामुख्याने विना नांगरणी तंत्रज्ञानाचे जनक शेतकरी शास्त्रज्ञ प्रतापकाका चिपळूणकर हे वेगवेगळ्या पिकांत विनानांगरणी शून्य मशागत, फक्त तण व्यवस्थापन असे प्रयोग इतर शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरत आहेत.

Zero Tillage Farming
Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्र ठरतेय फायद्याचे!

संभाजीनगर जिल्ह्यात अतुल मोहिते, शिवाजी धुमाळ, बलांडे, गव्हाणे, बीड जिल्ह्यात शानदार घोडके, भागवत धांडे, जालना जिल्ह्यात मोसंबी पिकात प्रा. आसाराम घुगरे, विठ्ठल वैद्य, बुलढाणा जिल्ह्यात पी आर. पाटील, यवतमाळ जिल्ह्यात नौशाद पठाण, अमरावती जिल्ह्यात नरेंद्र नल्हे, वर्धा जिल्ह्यात प्रवीण देशमुख हे सर्व शेतकरी विनानांगरणी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. परंतु त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे शासन, कृषी विद्यापीठे या यंत्रणांनी झोकून देऊन काम करणे गरजेचे आहे तरच संकटात पाडलेल्या मराठवाडा तसेच विदर्भातील कोरडवाहू शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

मशागतीने होते जमिनीची धूप

निसर्गाच्या लहरीपणामुळे आज जमिनीची धूप ही जागतिक समस्या झाली आहे. जमिनीची धूप थांबविण्यासाठी तिची हालचाल कमीत कमी करणे गरजेचे आहे. याबरोबरच त्या पिकात तण व्यवस्थापन करणेही गरजेचे आहे. जेणेकरून वाहून जाणारी माती जागेवरच थांबेल. जमिनीचा एक इंच थर तयार करण्यासाठी निसर्गाला शेकडो वर्षे लागतात. जमीन वाचली तरच जग वाचणार! त्यामुळे विनानांगरणी शून्य मशागत आणि फक्त तण व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

सहज उपलब्ध होणाऱ्या यंत्रांमुळे वर्षात अनेक शेतांत दोन दोन वेळेला नांगरणी केली जाते, शेकडो टन वजन आपण आपल्या शेतात फिरवतो. जमिनीच्या जास्त हालचालींमुळे जमिनीची कणरचना बदलत चालली आहे. याचा परिणाम जमिनीची जलधारण क्षमता कमी होत आहे. त्यामुळे पाऊस कमी झाला तरी जमिनीतून पाणी बाहेर निघत आहे. जास्त पाऊस झाल्यावरही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात टँकर फिरत आहेत, ही शोकांतिका आहे.

Zero Tillage Farming
Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्राने माती करूया समृद्ध

कोरडवाहू पिकांच्या दोन ओळींमध्ये तण व्यवस्थापन केल्यामुळे पिकावर येणाऱ्या किडींचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. किडींना त्यांच्या आवडीचे खाद्य मिळत असल्यामुळे कीड ही तणावरच राहते व आपले पीक कीडमुक्त राहते. तसेच पिकांना मिळणाऱ्या नत्राचे तण आणि मुख्य पिकात विभागणी होते. त्यामुळे पिकाचे अवास्तव कायिक वाढ होत नाही, परिणामी पिकाची उत्पादकता वाढते.

शून्य मशागत तंत्राने वाढतो सेंद्रिय कर्ब

पिकात तण व्यवस्थापन केल्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊन सुद्धा जमिनीतील पाण्याचा निचरा होतो, हे आम्ही या वर्षी प्रत्यक्ष अनुभवले आहे. सरासरीच्या दुप्पट पाऊस होऊन सुद्धा पीक कुठेही बाधित झाले नाही. तणाच्या जमिनीतील अवशेषांमुळे जमीन सच्छिद्र होते. त्यामुळे जमिनीत निचऱ्याचे प्रमाण वाढते. विनानांगरणी शून्य मशागत या तंत्रज्ञानाचा उपयोग जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी होतो. जमिनीखालील मुख्य पिकांचे अवशेष तसेच तणाचे अवशेष राहिल्यामुळे आपल्या नजरेला न दिसणाऱ्या जमिनीतील लाखो जिवाणूंना त्यांचे खाद्य जागेवर मिळते आणि ते पिकाला त्यांचे अन्नद्रव्य देण्याचे काम

जोमाने करतात. ज्याला आपण जमिनीचा ‘अपटेक’ वाढला असे म्हणतो त्यामुळे पिके सुदृढ येतात. पिकांचे अवशेष आणि तणाचे अवशेष जेव्हा जमिनीत जिरवले जातात त्यावेळेला त्यातून एक डिंकासारखा पदार्थ बाहेर पडतो आणि यातून जमिनीची कणरचना गोळीसारखी होते, जमिनीतील पाण्याचा निचरा सहजपणे होतो. अशा बहुउपयोगी विनानांगरणी शून्य मशागत या तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनी करावा आणि आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवावा.

आम्ही मागील पाच वर्षांपासून या तंत्रज्ञानाचा वापर करून जमीन समृद्ध करीत आहोत. पाच वर्षांनंतर माझ्या पिकातील रासायनिक खतांचा वापर बंद झाला आहे. मराठवाडा, विदर्भातील कोरडवाहू शेतकरी मित्रांना माझे नम्र आव्हान आहे, की आपणही अनेक अंगांनी उपयुक्त अशा या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करायला हवा.

- दीपक जोशी,

जय जवान जय किसान शेतकरी मंडळ, देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर ९८५०५०९६९२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com