
Former Chief Minister of Maharashtra Vasantrao Naik : सृष्टीला नवचैतन्य देणारा ऋतू म्हणजे वसंत. चैत्रपालवीतून बहरणारा आनंदघन म्हणजे हळव्या मनाचा वसंत. अगदी तसाच माणसा- माणसात नवसृजन ऊर्जा निर्माण करणारे विवेकशील पुरुष म्हणजे वसंतराव नाईक. शांत, संयमी, विचारवंत, द्रष्टा नेता म्हणून महाराष्ट्राला वसंतराव नाईक यांची ओळख आहे. तब्बल एक तपापर्यंत महाराष्ट्राचे भले करणारा मुख्यमंत्री म्हणून भटक्या जमातीतील वसंतराव नाईक यांच्या वाट्याला वेगळा सन्मान आहे. समाजभान असलेला त्यांचा पिंड त्यांच्या लहानपणाच्या संस्कारात घडला. छोट्या छोट्या गोष्टीतून वसंतरावांचे डोंगरा एवढे व्यक्तिमत्त्व तयार झाले.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात डोंगरमाळात वसलेल्या गहुलीत वसंतरावांचा जन्म झाला. वडील फुलसिंग बापू तांड्याचे नायक. त्यांचा मोठा रुबाब. लोककल्याणाचा वसा त्यांच्या रक्तातच. वसंतरावांचे नाव हाजू सिंग, त्यांचे मोठे बंधू राजू सिंग. फुलसिंग बापूंना शिक्षणाची चांगली जाण. त्यांनी हाजू राजू यांना सात मैल अंतरावरील विठोली गावातील प्राथमिक शाळेत टाकले. तेव्हा रस्ते नव्हते. चिखलातून ते घोडीने ये-जा करत. कधी कधी घोडी चिमुकल्यांना खाली पाडून तांड्याकडे पळून जाई. अशा पायपिटीतही हाजू यांना शाळेचे कायम वेड. एकदा त्यांना विठोलीच्या रस्त्यात शिकाऱ्याने लावलेल्या सापळ्यात अडकलेला पक्षी दिसला. त्याची जगण्याची धडपड पाहून हाजू यांचे मन गलबलून गेले. त्यांनी क्षणभर विचार केला आणि पक्षाची धाग्यातून मान सोडवली. मुक्त होताच भोवरी पक्षी भूर्रर्र उडून गेला. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर उगीचच बाधा आणू नये, हा संस्कार वसंतरावांनी आयुष्यभर जोपासला.
वसंतरावांनी पुढे नागपूर येथील मॉरिशस कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली आणि अंगावर वकिलीचा काळा कोट चढवला. वाड्या-तांड्यातील, गाव- खेड्यातील लोकांच्या निकडीचे खटले सोडवताना त्यांनी वकिलीचा पैका घेतला नाही. लोककल्याणकारी भाव त्यांच्या रक्तातच भिनलेला होता. त्यांचे शेती आणि शिक्षणावर मोठे प्रेम. गहुली या त्यांच्या गावी शेती सांभाळणारे दिवाणजी राठोड अंगठा बहाद्दर होते. मग मजुरी व शेतीचा हिशेब कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झालेला. गंमत अशी की सुट्टीमध्ये शेतावर वसंतराव आल्यावर त्या दिवाणजी कडून भाऱ्हाटीच्या पानावर काट्याने अंक-अक्षर गिरवून घेतले. पुढे मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आदिवासी, भटक्या विमुक्त समाजातील मुलांसाठी वसंतरावांनी आश्रम शाळा काढून त्यांनी शिक्षणाची गंगा वाड्यातांड्यांपर्यंत पोचविली.
शेती पिकली तर लोकशाही टिकेल, हे त्यांचे मूलतत्त्वज्ञान. शेतीत घाम गाळल्याशिवाय पीक हाती येणार नाही. सिंचनाने जमीन भिजली तरच उत्पादन वाढेल, हा त्यांचा अनुभव. वसंतरावांनी म्हणूनच शेतीच्या सिंचनावर भर दिला. मोठमोठ्या धरणांची पायाभरणी, उभारणी त्यांनी केली. पाणी अडवून जमिनीत मुरवण्याचे प्रयोग केले. ते मुंबईवरून पुसदला आले की, मुद्दाम गावाकडील गहुली, सेलूच्या शेतावर जात. दुष्काळात अन्नधान्य टंचाईने महाराष्ट्राला ग्रासले होते. त्यावर अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी संकरीत वाण कष्टपूर्वक आणले.
स्वतःच्या शेतावर आधी प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ते जाणीवपूर्वक सांगत ‘बघा एका दाण्याचे हजार दाणे बनविण्याची ताकद काळ्या मातीत आहे.’ त्यांचा ग्रामीण भागात दौरा असला की रस्त्यालगतच्या शेतातील संकरीत ज्वारीची मोठी कणसे पाहताच त्यांचा ताफा ते अचानक थांबवत. शेतकऱ्याची चौकशी करून त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देत. शेतकऱ्यांच्या दुःखाची-कष्टाची त्यांना जाणीव होती. वाशिम मार्गावरून पुसदला येताना बैलपोळ्याच्या दिवशी एक शेतकरी पोळ्याचे साहित्य पिशवीत घेऊन रस्ताने चालताना दिसला.
पोळा सणाला वेळ होऊ नये म्हणून त्या शेतकऱ्याला वसंतरावांनी आपल्या गाडीत बसवून गावी पोहोचून दिले. शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांवर वसंतरावांचे मोठे प्रेम. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे याची त्यांना जाणीव होती. एकदा पुसद येथील पैलवान असलेले कास्तकार लक्ष्मणराव जाधव वसंतरावांना भेटायला वर्षा बंगल्यावर गेले. भेटणाऱ्यांची रांग मोठी होती. वसंतराव बंगल्यातून बाहेर पडताना त्यांचे लक्ष रांगेतील जाधव यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी आवाज दिला व पैलवानांना मिठी मारली.
पैलवान थोडे मागे सरकले. माझ्या कपड्यांवर केळीचे डाग आहेत. तुमचा कोट खराब होईल. त्यावर वसंतरावांनी पांढऱ्या शुभ्र कपड्यांपेक्षा शेतकऱ्यांच्या केळीचे डाग असलेले कपडे चालतील, असे बोलत पैलवानांना ‘कुस्तीतील ईर्षा मातीत लावा आणि भरघोस पीक काढा’, असा मैत्रीचा सल्ला दिला. एका शेतकऱ्याच्या भेटीत त्याच्या घरी खुर्ची नसल्याने वसंतराव चक्क ज्वारीच्या पोत्यावर विसावले. वसंतराव नाईक शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात ओळखले जातात.
स्वाभिमानी भाव
वसंतरावांचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार. धीरोदात्त. अंगावर बंद गळ्याचा कोट आणि हाती चिरूट. पाहता क्षणी ‘’साहेब’’ वाटत असले तरी त्यांच्या अंतःकरणात कष्टकरी शेतकरी रुजलेला. एकदा भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्यांच्याकडे आले. हापूस रसाचा पाहुणचार नेहरूंना भावला. बंगल्याच्या हिरवळीवर खुर्च्या टाकून गप्पा चालू असताना वसंतरावांनी हळूच चिरूट (पाईप) काढला. पंडितजी तेव्हा सहज म्हणाले - ‘‘हे सोडून का देत नाही.’’ त्यावर वसंतराव उत्तरले - ‘‘मी जाणीवपूर्वक धरलेली कोणतीही गोष्ट कधीही सोडत नाही.’’ वसंतरावातील स्वाभिमानी भाव नेहरूजी पाहत राहिले. साधेपणा जपताना त्यांनी माणुसकीचा धर्म कधी सोडला नाही.
हरितक्रांतीचा रचला पाया
वसंतरावांचे शेती, उद्योग, सिंचन, शिक्षण, पंचायत राज, रोजगार हमी योजना अशा अनेक क्षेत्रात मोठे काम आहे. अन्नधान्याच्या स्वयंपूर्णतेसाठी त्यांनी महाराष्ट्रात हरितक्रांतीचा पाया रचला. चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली. त्याद्वारे आधुनिक शेती तंत्राला चालना दिली. १९७२ च्या दुष्काळात त्यांच्या धीर गंभीर नेतृत्वाची कसोटी लागली. दुष्काळी पट्ट्यातील प्रत्येक गावात त्यांनी भेट दिली. शेतमजुरांची दैना होती. हातांना काम नव्हते. त्यांनी दौऱ्यात हे प्रत्यक्ष अनुभवले. लगेच रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली.
असेच एका मराठवाड्यातील दुष्काळी गावात वसंतराव गेले. भूम परंडा नजीकच्या ईट गावातील हा प्रसंग. तिथे पाण्याचाही दुष्काळ होता. म्हणून आयोजकांनी कृत्रिम शीतपेय आणली. वसंतरावांनी ती नाकारली. त्याऐवजी तळ गाठलेल्या विहिरीतून काढलेले गढूळ पाणी घेतले व पेल्याला स्वतःच्या खिशातील शुभ्र रुमाल लावून तहान भागवली. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली कसरत त्यांनी पाहताच महाराष्ट्रभर पाणीपुरवठा योजनांचा श्रीगणेशा केला. शहरातील वाढती गर्दी लक्षात घेऊन दूरदृष्टीने नवी मुंबई वसवली. औद्योगिक क्रांतीतून महाराष्ट्राच्या विकासाला चालना दिली. संस्काराच्या छोट्या छोट्या गोष्टीतून स्वकर्तृत्वाने महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् केले.
राजकारण आणि समाजकारण याचा योग्य मेळ साधत खुल्या दिलाने महाराष्ट्राला सर्वार्थाने पुढे नेणाऱ्या वसंतराव यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राला आज गरज आहे. वसंतराव नाईक यांना आदरांजली!
९८२२७६७४८९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.