
प्रा. दिनकर गुल्हाने
Dinkar Gulhane Article : ‘शेती मोडली तर लोकशाही मोडेल,’ असे स्पष्ट विचार मांडत वसंतराव नाईक यांनी केंद्रातील मंत्र्यांची नाराजीची कधीही तमा बाळगली नाही. मग शेतकऱ्यांची काळी ज्वारी खरेदी असो वा एकाधिकार कापूस खरेदी योजना, शेतकऱ्यांच्या हितासाठीच त्यांनी धोरणात्मक निर्णय राबविले.
महाराष्ट्राचा महन्मंगल कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आणला. युद्ध काळात महाराष्ट्राचा सह्याद्री जेव्हा हिमालयाच्या मदतीला धावून गेला तेव्हा महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या खांद्यावर येऊन पडली. यशवंतरावांनी जाणीवपूर्वक भटक्या जमातीतील सुसंस्कृत वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड केली.
त्यांच्याच पाठिंबाच्या बळावर साडेअकरा वर्षांच्या कालावधीत वसंतरावांनी ती सर्वार्थाने सार्थ ठरवली. पुढे त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक यांची मुख्यमंत्री पदाची अत्यल्प पण चमकदार कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासात कायम गोंदवली गेली. या तीनही मुख्यमंत्र्यांनी आपल्या वेगवेगळ्या शैलीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची पाऊलवाट भक्कम केली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा अठरा ऑगस्ट हा ४४ वा स्मृतिदिन. यवतमाळ जिल्ह्यातील डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेली छोटीशी गहुली. वसंतरावांचे जन्मगाव. रानोमाळ भटकणाऱ्या बंजारा जमातीतील आजोबा चतुरसिंग राठोड यांचा तांडा गहुलीच्या ओढ्याकाठी चांगला स्थिरावलेला.
त्यांचे वडील फुलसिंग बापू हे तांड्याचे सधन नायक. भटकंतीच्या अस्थिर आयुष्यातून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हे आयुध आहे, हा त्यांचा थोर विचार. यातूनच वसंतराव नाईक नागपूरच्या मॉरिशस कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाले. वकिलीची परीक्षा उत्तीर्ण करून काही काळ अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात वकिली केली.
गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आपली वकिलीची सनद पुसद येथे रुजू केली. कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या गोरगरिबांकडून त्यांनी वकिली फी म्हणून एकही छदाम घेतला नाही. उलट अनेकदा खर्चासाठी थोडेफार पैसे हातावर ठेवले. सेवाधर्म हा त्यांचा मूळ स्वभाव.
स्वतःचे बुद्धिकौशल्य, समाजभान, विज्ञानवादी दृष्टिकोन, धीरोदात्तपणा, संयम, परिपक्व विचार, तत्त्वनिष्ठ आचार या अंगभूत स्वभाव वैशिष्ट्यांसह त्यांचा तांड्यातील नायक ते मुख्यमंत्री असा या महानायकाचा विलक्षण प्रवास विस्मयकारक वाटतो. एका अस्थिर तांड्यातून प्रदीर्घकाळ राज्याला स्थिरता देण्याची नवलाई त्यांनी साधली. या राजकीय प्रवासात महाराष्ट्राचे नेते यशवंतराव चव्हाण कायम त्यांच्या पाठीशी होते.
शेतकरी कुटुंबातील वसंतरावांची शेती आणि शेतकऱ्यांवर मोठी श्रद्धा. कोरडवाहू शेतीतून उत्पादन मिळू शकत नाही, याची जाण असल्याने त्यांनी बांध- बंधारे, तलाव, लहान मोठी अनेक धरणे आपल्या राजवटीत बांधली व शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली. संपूर्ण महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् केले.
महाराष्ट्रात १९७२ मध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. अन्नधान्याअभावी जनता भुकेने व्याकूळ झाली होती. त्यांनी दुष्काळी भागात गावागावांत दौरे केले. लोकांचे मनोबल वाढविले. अन्नधान्याच्या उपलब्धतेसाठी त्यांनी संकरित (हायब्रीड) वाणांचा एखाद्या झपाटलेल्या शास्त्रज्ञासारखा प्रचार-प्रसार केला. स्वतःच्या सेलू येथील शेतात संकरित ज्वारीची लागवड केली. शेती तंत्रज्ञान वापरावर भर दिला. विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठांची राज्यात स्थापना केली.
साहजिकच शेती तंत्रज्ञान बांधावर पोहोचले. याद्वारे शेतीमाल उत्पादनात मोठी वाढ झाली. महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. भयंकर दुष्काळात एकही भूक बळी होऊ दिला नाही, हे त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य होय.
‘शेती मोडली तर लोकशाही मोडेल,’ असे स्पष्ट विचार मांडत त्यांनी केंद्रातील मंत्र्यांची नाराजीची कधीही तमा बाळगली नाही. मग शेतकऱ्यांची काळी ज्वारी खरेदी असो वा एकाधिकार कापूस खरेदी योजना, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी धोरणात्मक निर्णय राबविले. हरितक्रांतीचे उद्गाते ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन वसंतराव नाईक यांच्या बद्दल म्हणतात - ‘‘माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी त्या काळात ‘जय जवान जय किसान’ असा नारा देऊन देशात कृषिक्रांतीची ज्योत पेटविली होती, वसंतराव नाईक यांनी ती ज्योत सतत तेवत ठेवण्याचे काम केले.
शेतकऱ्यांमध्ये प्रकाशाची ज्योत पेटविली, निराशेच्या वाटेवर असलेल्या शेतकऱ्यांना दिशा दाखविली. त्यांच्यामधील अंधार त्यांनी दूर केला. त्यांनी नेहमी शेतकऱ्यांचेच हित पाहिले. त्या काळात त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती महाराष्ट्राला सावरू शकली.’’
वसंतराव नाईक यांनी कृषी संस्कृती टिकवली होती. शेती प्रश्नांकडे सरकारचे आज तितकेसे लक्ष नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. दिवसागणिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने गंभीरपणे उपाययोजना करायला हव्यात, असे मत अलीकडच्या काळात प्रयोगशील शेतकरी व निसर्गकवी दिवंगत ना. धों. महानोर यांनी मांडले होते. सद्यःस्थितीत शेतकरी अडचणीत असताना वसंतराव नाईक यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. वसंतराव नाईक यांच्या शेतीविषयक विचारांचा वारसा स्वीकारून त्यावर अंमलबजावणी करण्याची खरी गरज आहे. अशावेळी वसंतराव नाईक यांच्यासारखी संवेदनशीलता आजच्या राज्यकर्त्या मंडळींमध्ये नाही का, असा प्रश्न पडतो.
वसंतराव नाईक हे केवळ शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री नव्हते. त्यांनी समाजातील शेतकरी, शेतमजूर शोषित, वंचित अशा सर्वच घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी धोरण आखून काटेकोरपणे अंमलबजावणी केली. शेती सोबतच त्यांनी उद्योग, कृषी औद्योगिक विकासाला चालना दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली.
कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ यांसारख्या सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांची उभारणी करण्यात आली. सहकार क्षेत्र अधिक बळकट झाले. आज सहकार क्षेत्राची होत असलेली वाताहत पाहताना वसंतराव नाईक यांच्या सहकारातील सुवर्णकाळाची आठवण नक्कीच होते.
वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला शेती, शिक्षण, उद्योग यांसह सर्वच क्षेत्रात पुढे नेले. पंचायत राज, रोजगार हमी योजना ही त्यांची देणं आहे. त्यांचे निर्णय दूरगामी होते. दूरदृष्टी असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र होते. जनतेच्या प्रश्नांची जाण, प्रशासनावरील त्यांची पकड, योजना कार्यान्वित करण्याचा वकूब, सहकाऱ्यांमध्ये समन्वय व विरोधकांनाही सन्मान ही त्यांची कार्यशैली निश्चितच प्रशंसनीय म्हणावी लागेल.
आजच्या फोडाफोडी, आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाचा लोकांना वीट आला आहे. मूळ प्रश्न बाजूला राहून लोकांची अवहेलना होत आहे. विधानसभेतील दिग्गज विरोधक शेकापचे आमदार दिवंगत केशवराव धोंडगे वसंतराव नाईक यांच्यावर अक्षरशः तुटून पडत. परंतु त्यांचे वैयक्तिक संबंध मात्र अतिशय सलोख्याचे होते.
वसंतराव त्यांना नेहमी पांडुरंग म्हणून हाक मारायचे. केशवराव धोंडगे यांना एकदा मुलाखतीत वसंतराव नाईक यांच्या बद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी त्यांचा विधानसभेतील कट्टर राजकीय विरोधक. मात्र त्यांच्या सारखा ‘देव माणूस’ मी राजकारणात पहिला नाही. विरोधकांना सन्मान देऊन त्यांची विकास कामे अग्रक्रमाने पूर्ण करणारे वसंतराव नाईक देवदुर्लभ उदाहरण आहे.’’ वसंतराव नाईक यांना स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!
प्रा. दिनकर गुल्हाने
९८२२७६७४८९
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.