
Agriculture Advisory For Konkan Region
आंबा
आंबा पिकास नियमित फळधारणेसाठी पॅक्लोब्युट्रॉझॉल वर्षातून एकदा १५ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान पूर्ण वाढलेल्या (१० वर्षांवरील) झाडाला द्यावे. कारण वर्षाआड फळे धरण्याचा गुणधर्म १० वर्षांनंतर प्रकर्षाने दिसून येतो. तणे काढलेल्या शेतामध्ये या वाढनियंत्रकांचा वापर झाडाच्या आकारमानानुसार करावा. प्रत्येक झाडाचा पूर्व-पश्चिम व दक्षिण-उत्तर व्यास मोजून त्याची सरासरी काढावी.
सरासरीत प्रती मीटर व्यासासाठी ०.७५ ग्रॅम वाढनियंत्रक द्यावे. (उदा. एखाद्या झाडाचा व्यास पूर्व-पश्चिम ५ मीटर व दक्षिण उत्तर ७ मीटर असेल तर सरासरी व्यास ६ मीटर होईल. यासाठी प्रती मीटर ०.७५ ग्रॅम वाढनियंत्रक या नियमाने ४.५ मि.लि. वाढनियंत्रक द्यावे लागेल. ज्या वाढनियंत्रकामध्ये पॅक्लोब्युट्रॉझॉल घटकाचे प्रमाण २३ टक्के असल्यास, प्रती मीटर व्यासास ३ मि.लि. प्रमाणे १८ मि.लि. वाढनियंत्रक द्यावे लागेल.
ही मात्रा ३ ते ६ लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याभोवती द्यावी. झाडाच्या बुंध्याभोवती झाडाच्या विस्ताराच्या निम्म्या अंतरावर खणती किंवा कुदळीने १० ते १२ सें. मी. खोल असे सम अंतरावर २५ ते ३० खड्डे मारावेत किंवा कुदळीच्या साहाय्याने रिंग मारून त्यात वरील प्रमाणात तयार केलेले द्रावण समप्रमाणात ओतावे. नंतर खड्डे मातीने बुजवून टाकावेत. ही सर्व कामे पावसाची उघडीप पाहून किंवा तीव्रता कमी असतानाच करावे.
आर्द्रतापूर्ण ढगाळ वातावरण आणि ओलावा यामुळे आंब्याच्या झाडावर फांदेमर या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. या रोगामुळे प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणची साल उभी तडकल्यासारखी दिसते. त्यामध्ये पांढरट रंगाच्या बुरशीची वाढ झालेली दिसून येते. त्यातून सुरुवातीला पांढरट व नंतर तांबूस रंगाचा डिंक बाहेर येतो.
प्रादुर्भावग्रस्त फांदी शेंड्याकडून खाली वाळत येते. नवीन लागवड केलेल्या बागांमध्ये प्रादुर्भाव मुख्य खोडावर दिसून येतो. प्रादुर्भाव दिसून आल्यास रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार कॉपर ऑक्सिक्लोराइड ०.३ टक्का (३० ग्रॅम / १० लिटर पाणी) किंवा बोर्डो मिश्रण (०.१ टक्का) यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी फांद्या व्यवस्थित भिजतील अशा प्रकारे करावी.
फांदेमर रोगाने मोठ्या फांद्यांमधून डिंक येत असल्यास रोगग्रस्त साल तासून त्या ठिकाणी बोर्डो मिश्रणाची पेस्ट किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइडची पेस्ट लावावी. आंबा बागेमध्ये पावसामुळे अतिरिक्त पाणी साचले असल्यास त्याचा निचरा करावा.
खरीप भात
पुनर्लागवड / रोपावस्था
भात पिकास चिखलणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया = ८७० ग्रॅम प्रति गुंठा), ५० किलो स्फुरद (३१३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट = ३१३० ग्रॅम प्रति गुंठा) आणि ५० किलो पालाश (८४ किलो म्युरेट ऑफ पोटॅश = ८४० ग्रॅम प्रति गुंठा) द्यावे. हेक्टरी ०५ टन गिरिपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळेस दिल्यास ५०% नत्र खताची (युरिया) मात्रा कमी करून द्यावी.
काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाची तीव्रता कमी असताना भाताच्या पुनर्लागवडीची कामे पूर्ण करून घ्यावीत. १२ ते १५ सेंमी उंचीची आणि ५ ते ६ पाने फुटलेली, जातींच्या पक्वता कालावधीनुसार २१ ते २७ दिवसांची रोपे लागवडीसाठी वापरावीत.
जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी १५ × १५ किंवा २० × १५ सेंमी अंतरावर करावी. लागवड सरळ आणि उथळ २.५ ते ३.५ सेंमी खोल करावी. उथळ लागवड केल्याने फुटवे चांगले येतात. एका चुडामध्ये २ ते ३ रोपे लावावीत आणि संकरित भातासाठी एका ठिकाणी एकच रोप लावावे.
भात पुनर्लागवडीनंतर पहिल्या ३० दिवसांपर्यंत शेतात पाण्याची पातळी २.५ ते ५ सेंमी ठेवावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
डोंगर उतराजवळ नुकतीच पुनर्लागवड केलेली भात रोपे जोरदार पावसामुळे वाहून जाण्याची शक्यता असते. अशा शेत किंवा खाचरामध्ये तीव्र वेगाने येणारे पाणी इतरत्र किंवा बाजूने वळविण्याची व्यवस्था करावी.
सध्या हवामान सुरळीतील अळी या किडीच्या वाढीस पोषक असून, भात रोपांवर या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या किडीची अळी कोवळी पाने कापून त्याचे लहान तुकडे करते. त्याची सुरळी करून त्यात राहते. रात्रीच्या वेळी अळी पानातील हरितद्रव्ये खरवडून खाते, त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात.
शेत निस्तेज दिसते. सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास किडीच्या नियंत्रणासाठी भात खाचरात असलेले पाणी बांधून ठेवावे. नंतर कीडग्रस्त पिकावरून एक जाड दोर आडवा धरून ओढत न्यावा, त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतील. नंतर शेतातील पाणी एका बाजूने बाहेर काढावे, त्यामुळे सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा होतील. या जमा झालेल्या सुरळ्या नष्ट कराव्यात. त्यानंतर शेतात नवीन पाण्याची साठवण करण्याची व्यवस्था करावी.
सध्याचे हवामान भात पिकावरील निळे भुंगेरे या किडीच्या वाढीस पोषक आहे. काही ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भुंगेरे गर्द निळ्या रंगाचे असून अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते. या किडीच्या अळी व प्रौढ या दोन्ही अवस्था या दोन्ही हानिकारक आहेत. ही कीड पानाचा हिरवा भाग खरवडून खाते.
परिणामी पानांवर पांढरे डाग दिसून येतात. या किडीचा प्रादुर्भाव पाणथळ जमीन आणि नत्र खताच्या असंतुलित व अधिक वापराने होऊ शकतो. त्यासाठी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहून किंवा तीव्रता कमी असताना करावी.
बांधावरील खेकड्यांच्या नियंत्रणासाठी पावसाच्या सुरुवातीला सलग २ ते ३ रात्री बांधावरील खेकडे बत्तीच्या उजेडात पकडून त्यांची संख्या कमी करावी. त्यानंतर विषारी आमिषाचा वापर करून खेकड्यांचे नियंत्रण करण्यासाठी १ किलो शिजलेल्या भातामध्ये ५० ग्रॅम गूळ + ॲसिफेट (७५ टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी) ७५ ग्रॅम टाकून विषारी आमिष तयार करावे. या मिश्रणाच्या साधारणतः १०० गोळ्या तयार कराव्यात.
उकरलेल्या प्रत्येक छिद्राच्या तोंडाशी १ गोळी ठेवून ते बुजवून घ्यावे. दुसऱ्या दिवशी जी छिद्रे उकरली जातील, तिथे परत आमिष ठेवावे. विषारी आमिषाचा वापर शेतकऱ्यांनी सांघिकरीत्या व एकाच वेळी केल्यास खेकड्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. (लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस) किंवा १० तास भिजलेले चिंचोके बिळामध्ये ठेवून छिद्र बुजवावे.
पावसाच्या अतिरिक्त साचलेल्या पाण्याने भात रोपवाटिकेचे नुकसान होऊ शकते. ते टाळण्यासाठी रोपवाटिकेच्या चारही बाजूंनी चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.
काजू
नवीन लागवड
सध्या आर्द्र वातावरण आणि ओलाव्यामुळे काजू झाडावर फांदेमर या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगामुळे प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी साल उभी तडकल्यासारखी दिसते. त्यामध्ये पांढरट रंगाच्या बुरशी वाढलेली दिसून येते. त्यातून सुरुवातीला पांढरट व नंतर तांबूस रंगाचा डिंक बाहेर येतो. प्रादुर्भावग्रस्त फांदी शेंड्याकडून खाली वाळत येते. नवीन लागवड केलेल्या बागांमध्ये प्रादुर्भाव मुख्य खोडावर दिसून येतो.
प्रादुर्भाव दिसून आल्यास रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार कॉपर ऑक्सिक्लोराइड ०.३ टक्के (३० ग्रॅम/१० ली पाणी) किंवा बोर्डो मिश्रण (०.१ टक्के) यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी फांद्या व्यवस्थित भिजतील, अशा प्रकारे करावी. फांदेमर रोगाने मोठ्या फांद्यांमधून डिंक येत असल्यास रोगग्रस्त साल तासून त्या ठिकाणी बोर्डो मिश्रणाची पेस्ट किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइडची पेस्ट लावावी. काजू बागेमध्ये पावसामुळे अतिरिक्त पाणी साचले असल्यास त्याचा निचरा करावा.
सुपारी
आर्द्रतेतील वाढीमुळे कोळेरोग या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव फळांच्या देठावर होत असल्याने फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते. कोळेरोग या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी झाडावरील रोगग्रस्त शिंपुटे, वाळलेल्या झावळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. पानांच्या बेचक्यात १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. त्यानंतर एका महिन्याच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात. सुपारी बागेमध्ये पावसामुळे अतिरिक्त पाणी साचले असल्यास त्याचा निचरा करावा.
- डॉ. वीरेश चव्हाण (नोडल अधिकारी),
९४२२०६५३४४
(ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.