
Monsoon Farming Tips:
नारळ
माडाच्या झाडाला ५ व्या वर्षापासून ५ घमेली शेणखत, २.२२५ किलो युरिया, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व २ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. लहान माडाला त्यांच्या वयानुसार खताचे प्रमाण कमी करावे. पहिल्या वर्षी बुंध्यापासून ३० सेमी अंतरावर सभोवार खते पसरून द्यावीत. ती विळ्याने अथवा कुदळीने मातीत मिसळावी. नंतर प्रत्येक वर्षी ३० सेंमी अंतर वाढवून ५ ते ६ वर्षांनी खते माडाभोवती १.५० ते १.८० मीटर अंतरावर टाकून मातीत मिसळावे.
शेणखत व स्फुरद इतर खताबरोबर एकाच हप्त्यात द्यावेत. नत्र व पालाश ही खते जून, सप्टेंबर व फेब्रुवारी अशा ३ हप्त्यांत द्यावीत. खत व्यवस्थापनाची कामे पावसाची उघडीप पाहून करावीत. असताना खत व्यवस्थापनाची कामे हाती घेण्यात यावीत. नवीन लागवडीमध्ये पावसाचे अतिरिक्त पाणी साचणार नाही, यासाठी निचऱ्याची व्यवस्था करावी.
काजू
नवीन लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफ सफाई करून घ्यावी.
कलमांच्या लागवडीसाठी खड्ड्याची लांबी, रुंदी, खोली ०.६ × ०.६ × ०.६ मीटर असावी. हेक्टरी १५५-२०० झाडे बसतात.
खड्ड्यात दीड ते दोन घमेली चांगले कुजलेले कंपोस्ट, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळावे.
वाळवी नियंत्रणासाठी १.५ टक्के क्लोरपायरिफॉस १०० ग्रॅम भुकटी प्रति खड्ड्यात टाकावी. (लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस.)
काजू नवीन कलमांची लागवड करताना प्लॅस्टिकची पिशवी चाकू अथवा ब्लेडने कापून अलगदपणे
काढून टाकावी. कलमांची हुंडी फुटणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा, कलम दगावण्याची शक्यता असते.
कलमांच्या खुंटावर जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. कलमांच्या जोडावरील प्लॅस्टिक पट्टीही काढून टाकावी. रोपांचा वेगवान वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी कलमांना काठीचा आधार द्यावा.
काजू बागेमध्ये पावसामुळे अतिरिक्त पाणी साचू नये, यासाठी निचरा करण्याची व्यवस्था करावी.
सुपारी
नवीन लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफसफाई करून घ्यावी.
पावसाळ्यापूर्वीच २.७ × २.७ मीटर अंतरावर ०.६ × ०.६ × ०.६ मीटर आकाराचे खड्डे खणलेले असतील. त्यात चांगली माती आणि २० किलो चांगले कुजलेले शेणखत आणि अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून तयार ठेवावेत. त्यात लागवड करून घ्यावी.
पशुसंवर्धन
पावसामुळे गोठ्यात पाणी साचून, त्यातून माश्या, डास इ. प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे गोठा परिसरात पाणी साचू देऊ नये.
पावसापासून आणि थंड वाऱ्यापासून प्राण्यांचे रक्षण करावे.
जनावरांच्या गोठ्यात पाणी साचू देऊ नये. गोठ्यातील खड्डे मातीने भरावेत.
जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. विजांचा लखलखाट होत असताना जनावरे शक्यतो झाडाखाली बांधू नयेत. ती सुरक्षित ठिकाणी गोठ्यामध्ये बांधावीत.
शेळीपालन
पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या वेळी पातळ संडास होणे, खाणे कमी होणे तसेच वजन घटणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यासाठी शेळ्यांना अलबेंडाझॉल ७.५ मिलिग्रॅम प्रति किलो वजनास या प्रमाणात औषध देण्यात यावे.
आंबा
बागेमध्ये झाडाचा विस्तार नियंत्रित करणे आणि नवीन पालवी लवकर मिळविणे या दृष्टीने आवश्यक ती छाटणी करावी. या वेळी झाडावरील बांडगुळे व रोगग्रस्त वाळलेल्या फांद्या काढून बागेत स्वच्छता ठेवावी. फांद्यावर झालेल्या जखमांच्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावी. संपूर्ण झाडावर १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
आंबा फळांची काढणी पूर्ण झाल्यानंतर घन लागवड (५ × ५ मी. किंवा ६ × ४ मी.) असलेल्या आंबा बागांमध्ये नियमित छाटणी करावी. यात उंची कमी करणे, फांद्या एकमेकांमध्ये गेल्या असल्यास छाटणे आणि वाळलेल्या फांद्या काढून टाकणे या गोष्टींचा अंतर्भाव करावा. घन लागवड असलेल्या बागांमधील कलमांची उंची दोन ओळींच्या अंतराच्या ८० टक्के इतकी ठेवावी.
आंब्याच्या दहा वर्षावरील प्रत्येक झाडास ५० ते १०० किलो कुजलेले शेणखत द्यावे. या सेंद्रिय खताबरोबर नत्र १.५ किलो कुजलेले शेणखत द्यावे. या सेंद्रिय खताबरोबर नत्र (१.५ किलो), स्फुरद (०.५ किलो) व पालाश (१ किलो) द्यावे. खते कलमाच्या विस्ताराच्या थोडीशी आत सुमारे ४५ ते ६० सें. मी. रुंद आणि १५ सें. मी. खोल वर्तुळाकार चर खणून द्यावीत. त्या चरामध्ये प्रथम पालापाचोळा, शेणखत टाकून, त्यावर रासायनिक खते टाकून मातीने चर बुजवून घ्यावा. खते देण्याआधी तण काढून घेतलेले असावे. पावसाची उघडीप असताना खत व्यवस्थापनाची कामे हाती घ्यावीत.
आंबा बागेमध्ये पावसामुळे अतिरिक्त पाणी साचले असल्यास त्याचा निचरा करावा.
- डॉ. व्ही. जी. मोरे, ०९४२२३७४००१, ०२३५८ - २८२३८७
(ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.