Crop Advisory: कृषी सल्ला (मराठवाडा विभाग)
Agriculture Tips:
हवामान अंदाज
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक १४ ते १७ जुलै, २०२५ दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक १८ ते २४ जुलै २०२५ दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
सोयाबीन
बहुतांश ठिकाणी सोयाबीनची पेरणी झाली असेल. त्याची उगवण झालेली असल्यास पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. आंतरमशागतीची कामे करून पीक तणविरहित ठेवावे. मात्र कोणत्याही कारणाने अद्याप करू न शकलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मिमी) झाल्यानंतर सोयाबीन पेरणी १५ जुलैपर्यंत करून घ्यावी. त्याआधी बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.एफ. (रुंद वरंबा सरी) पद्धतीने करावी.
सोयाबीन पिकात खोड माशी व उंट अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति एकर
प्रोफेनोफॉस (५० टक्के) ४०० मिलि किंवा इथिऑन (५० टक्के) ६०० मिलि किंवा थायामेथोक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ५० मिलि किंवा प्रादुर्भाव खूप जास्त असल्यास क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के) ६० मिलि प्रति एकर यापैकी कुठलेही एक कीटकनाशक पावसाने उघाड दिल्यास फवारावे. एकरी १५० लिटर पाणी पुरेसे होते.
सोयाबीन पीक पेरणी करून २० दिवस झाले असल्यास तणांच्या व्यवस्थापनासाठी पावसाची उघडिप पाहून इमॅझोमॅक्स (३५ टक्के) अधिक इमिझिथीपायर (३५ टक्के) (संयुक्त तणनाशक) २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
सोयाबीन पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनुसार पाणी द्यावे.
ऊस
सुरू उसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करून घ्यावी. पक्की बांधणी करताना १०० किलो नत्र, ५५ किलो स्फुरद व ५५ किलो पालाश प्रति हेक्टरी रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
उस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी
जैविक नियंत्रण ः लेकॅनिसिलिअम लेकॅनी हे बुरशीजन्य कीटकनाशक ४ ग्रॅम
किंवा रासायनिक नियंत्रण ः क्लोरपायरीफॉस (२० टक्के) ३ मिलि किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के) ०.३ मिलि किंवा ॲसीफेट (७५ %) २ ग्रॅम.
* इमिडाक्लोपीड (१७.८%) कीटकनाशकासोबत युरिया २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)
ऊस पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनुसार पाणी द्यावे.
बाजरी
पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मिमी) झालेला असल्यास बाजरीची पेरणी करून घ्यावी. ही पेरणी ३० जुलैपर्यंत करता येते. या पूर्वीच पेरणी झालेल्या व उगवण झालेल्या बाजरी पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. आंतरमशागतीची कामे करून पीक तण विरहित ठेवावे.
भाजीपाला
पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला (वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टोकावे. भाजीपाल्याचे बी टोकलेल्या गादीवाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे. आवश्यकतेनुसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. भाजीपाला पिकांच्या रोपे ४५ दिवसांची झाल्यानंतर पुनर्लागवडीची तयारी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पुनर्लागवड करावी. तसेच बियांद्वारे लागवड करावयाची पिके उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका इ. लावून घ्यावीत.
भाजीपाला पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझीम ॲनोसोप्ली बुरशीजन्य कीटकनाशकाचा ४ किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास १० किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. (ॲग्रेस्को शिफारस)
हळद
हळदीमध्ये आंतरपिके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल, अशी आंतरपिके निवडावीत. यामध्ये पालेभाज्यासारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.
संत्रा / मोसंबी
संत्रा नवीन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा, किन्नो तर मोसंबी नवीन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इ. जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी. आंबे बहर संत्रा/मोसंबी बागेत पीक संरक्षणावर भर द्यावा. संत्रा/मोसंबी बागेत मृग बहरासाठी खत मात्रा दिली नसल्यास मोसंबीसाठी ४००:४००:४०० व संत्र्यासाठी ५००:५००:५०० ग्रॅम प्रति झाड नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी.
डाळिंब
नवीन बाग लागवडीसाठी डाळिंबाच्या भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता, इ. जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी. डाळिंब बागेत मृग बहरासाठी खत मात्रा दिली नसल्यास डाळिंबासाठी ३००:२५०:२५० ग्राम प्रति झाड नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी.
- डॉ. कैलास डाखोरे, ९४०९५४८२०२
- प्रा. डी. डी. पटाईत, ७५८८०८२०४०
ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.