Will Certificate Awareness: मृत्युपत्राचा दस्त हा वारसांवर बंधनकारक

Estate Planning: सक्षम व्यक्तीने तयार केलेले मृत्युपत्र हे कायदेशीररीत्या वारसांसाठी बंधनकारक असून, मृत्यूनंतर मालमत्तेचे वितरण त्याच्या इच्छेनुसार सुनिश्चित करते.
Legal Awareness
Legal AwarenessAgrowon
Published on
Updated on

भीमाशंकर बेरुळे

Property Rights: सक्षम व्यक्तीने तयार करून ठेवलेल्या मृत्युपत्राचा दस्त हा कायदेशीररीत्या वारसांवर बंधनकारक दस्तऐवज आहे. मृत्युपत्राचा दस्त तयार करून ठेवणारा हयात नसताना त्याच्या मालमत्ता किंवा मालमत्तेबाबत त्याची इच्छा किंवा मालमत्ता वितरण हेतू अचूकपणे पूर्ण केले जातील याची खात्री हा दस्ते देतो.भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५ नुसार मृत्युपत्र तयार करता येते. मृत्युपत्र हाताने किंवा टंकलिखित केले जाऊ शकते.

मृत्युपत्र म्हणजे अनिश्चित भविष्यासाठी नियोजन करणे आणि सर्वात महत्त्वाची अनिश्चितता म्हणजे मृत्यू होय. म्हणूनच, तुमच्याकडे मालमत्ता असल्यास, तुमच्या निधनानंतर तुमची मालमत्ता कोणास मिळावी, किंवा कोणास मिळू नये अशी तुमची इच्छा असते, किंवा मालमत्ता ही सरस-निरस प्रमाणात वारसामध्ये वितरित व्हावी अशी इच्छा असेल तर अशा परिस्थितीमध्ये मृत्युपत्र बनवणे आवश्यक बनते.

मृत्युपत्र ज्याला काही भागांमध्ये इच्छापत्र म्हणून देखील संबोधले जातात. सक्षम व्यक्तीने तयार करून ठेवलेल्या मृत्युपत्राचा दस्त हा कायदेशीररीत्या वारसांवर बंधनकारक दस्तऐवज आहे, जे मृत्युपत्राचा दस्त तयार करून ठेवणारा हयात नसताना त्याच्या मालमत्ता किंवा मालमत्तेबाबत त्याची इच्छा किंवा मालमत्ता वितरण हेतू अचूकपणे पूर्ण केले जातील याची खात्री देते. भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५ नुसार मृत्युपत्र तयार करता येते. मृत्युपत्र हाताने किंवा टंकलिखित केले जाऊ शकते.

मृत्युपत्र कसे आणि कोणी तयार करून ठेवावे?

सुदृढ मानसिक आरोग्य असलेली व ज्या मिळकतीच्या बाबतीत मृत्युपत्र तयार करावयाचे आहे, त्यावर निर्विवाद मालकी असलेली कोणतीही व्यक्ती मृत्युपत्र तयार करू शकते. जबरदस्तीने किंवा खोट्या प्रभावाने प्राप्त केलेले मृत्युपत्र कायद्याने वैध मानले जात नाही. केवळ मृत्युपत्रकर्त्याच्या स्वतंत्र इच्छेने तयार केलेले मृत्युपत्र कायद्याने वैध मानले जाते. एखादा त्याच्या हयातीत कितीही वेळा मृत्युपत्र करू शकते, याचे कोणतेही बंधन नाही, परंतु सर्वांत शेवटचे सक्षम मृत्युपत्र हे ग्राह्य धरण्यात येईल.

मृत्युपत्र का बनवावे?

कोणत्याही वैयक्तिक मालकीच्या मालमत्ताधारकाने त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या मिळकतीच्या विना वाद वितरणासाठी मृत्युपत्र तयार केले पाहिजे. मृत्युपत्राचा उद्देश मालमत्तेच्या मालकाला त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या मिळकतीच्या वितरणावर नियंत्रण देणे हा आहे. मृत्युपत्राने मालमत्तेचे हस्तांतर सोपे होते. मृत्युपत्रकर्त्याला अल्पवयीन मुले असल्यास, तो किंवा ती मृत्युपत्रात मुलांच्या संगोपनासाठी नाव नमूद करू शकते.

Legal Awareness
Ancestral Property: वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी कायदेशीर हक्क

मालमत्ता मिळविण्यासाठी कुटुंबातील सदस्य किंवा मृत व्यक्तीच्या नातेवाइकांमधील संघर्ष सामान्य आहे. मृत्युपत्राने असे संघर्ष टाळता येतात. मृत्युपत्र करणाऱ्याला त्याची इच्छा असल्यास त्याची मालमत्ता, त्याच्या वारसांना न देता धर्मादाय संस्थेला देखील दानही करता येईल, त्यास वारसांना आक्षेप घेण्याचा अधिकार पोचत नाही.

मृत्युपत्र कसे लिहावे?

मृत्युपत्राचे कोणतेही विहित स्वरूप नसले तरी, तुम्ही काही कायदेशीरदृष्ट्या आवश्यक घटक मृत्युपत्रात समाविष्ट केले पाहिजेत, जेणेकरून नंतर कोणीही ती प्रश्नांकित करू शकणार नाही. येथे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही मृत्युपत्र तयार करतेवेळी मुख्यतः खालील बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

मृत्युपत्र तयार करून ठेवणारा शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे.

मृत्युपत्रावरील भविष्यातील न्यायालयीन वाद टाळण्यासाठी मृत्युपत्र तयार करून ठेवणाऱ्याचे मृत्युपत्र करून ठेवते वेळचे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे मृत्युपत्र तयार करून ठेवणारा शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.जर पहिले मृत्युपत्र तयार करून ठेवले असेल आणि त्यात बदल करीत असाल तर सुरुवातीला नमूद करा की पूर्वीचे मृत्युपत्र रद्द केले आहे.

मृत्युपत्रामध्ये जंगम व स्थावर मालमत्ता,म्युच्युअल फंड,तुमच्या बचत खात्यातील पैसे, मुदत ठेवी इत्यादींसह तुमच्या सर्व मालमत्तेची यादी करा, तुमचे काहीही चुकणार नाही याची खात्री करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. तुमच्या मृत्युपश्चात तुमची मालमत्ता कोणास मिळावी अशी तुमची इच्छा आहे हे स्पष्ट नमूद करावे. तुमची मालमत्ता पारदर्शकपणे विभाजित करावी, शंका दूर करण्यासाठी, जर तुम्ही एखाद्या अल्पवयीन व्यक्तीला काही मालमत्ता देत असाल, तर त्याचा संरक्षक कोण असेल याचा देखील उल्लेख करावा. तुमचा विश्वास असलेली एखादी व्यक्ती निवडावी.

वरील सर्व मुख्य व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर, दोन साक्षीदारांसह मृत्युपत्रावर स्वाक्षरी करावी. तुम्ही त्यांच्या उपस्थितीत मृत्युपत्रावर स्वाक्षरी केली आहे हे प्रमाणित करण्यासाठी त्यांनाही साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करावी लागते. मृत्युपत्रावर सही करण्याची तारीख आणि ठिकाण आणि तुमच्या साक्षीदारांचे संपूर्ण पत्ते आणि नावे लिहावेत. तुमच्या साक्षीदारांना तुमच्या मृत्युपत्रातील मजकूर माहिती असणे आवश्यक आहे.

मृत्युपत्राच्या प्रत्येक पृष्ठावर तुम्ही आणि तुमचे साक्षीदार स्वाक्षरी करत असल्याची खात्री करावी. मृत्युपत्रातील मजकूर दुरुस्त केल्यास, तुम्ही आणि तुमच्या साक्षीदारांनी त्यावर प्रतिस्वाक्षरी केली पाहिजे.मृत्युपत्र सुरक्षितपणे ठेवण्याचे लक्षात ठेवा. लक्षात घ्या की तुम्ही मृत्युपत्र कोणत्याही भाषेत लिहू शकता आणि त्यासाठी कायदेशीर भाषा वापरण्याची गरज नाही.

परंतु, मृत्युपत्रातील भाषा स्पष्ट असावी म्हणजे तुमच्या हेतूबद्दल शंका उद्भवणार नाही.भारतीय नोंदणी कायद्यातून मृत्युपत्रास मुद्रांक शुल्कातून व नोंदणी पासून सूट देण्यात आली आहे, म्हणजेच मृत्युपत्रास नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक नाही.मृत्युपत्र तयार करताना वैयक्तिक माहिती द्यावी.मृत्युपत्र करणाऱ्याचे पूर्ण नाव, वय, संपूर्ण पत्ता, जन्मतारीख इ लिहावे.

Legal Awareness
Indian Inheritance Law: हिंदू, मुस्लिम आणि पारसी धर्मीयांचे मिळकतीसंदर्भात वारसा नियमन

मृत्युपत्र तयार करण्याच्या तारखेचा स्पष्ट उल्लेख करणे अत्यावश्यक आहे.

मृत्युपत्र तयार करताना तुम्ही ते स्वेच्छेने करत आहात आणि कोणत्याही व्यक्तीच्या प्रभावाखाली किंवा दबावाखाली करीत नाहीत हे नमूद असणे आवश्यक आहे. मृत्युपत्र तयार करून ठेवणारा, त्याच्या पश्चात त्याची मालमत्ता कोणास मिळावी अशी इच्छा असेल त्याचा (लाभार्थीचा) तपशील नमूद असणे आवश्यक आहे. जसे की,नाव, वय, पत्ता, त्याच्याशी असलेले नाते, इत्यादी नमूद करणे आवश्यक आहे.

मृत्युपत्र करून ठेवणाऱ्यास केवळ त्याच्या स्वकष्टार्जित मालकीच्या मालमत्तेबद्दल मृत्युपत्र तयार करून ठेवता येईल. त्याची मालमत्ता त्याच्या वारसांपैकी कोणास एकास किंवा त्याच्या इच्छेनुसार कोणासही देता येईल. परंतु जर मृत्युपत्रातील मालमत्ता ही वडिलोपार्जित असेल तर केवळ त्याच्या हिश्‍यास येणाऱ्या मालमत्तेपुरते मिळकतीचे मृत्युपत्र करून ठेवता येईल कारण वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये वारसांचे अधिकार जन्मतःच निर्माण झालेले असतात. जेव्हा एखादी व्यक्ती वैध मृत्युपत्र न करता मरण पावते, अशा व्यक्तीच्या मालमत्तेचे विभाजन हे प्रचलित वारसा कायद्यानुसार होईल.

मृत्युपत्राचा परिणाम केव्हा सुरु होते?

मृत्युपत्र तयार करून ठेवणाऱ्याचे निधन झाल्यावरच मृत्युपत्र वैध होते आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही कालमर्यादा नसते. तथापि, जर एखाद्याला इच्छापत्राला आव्हानीत करायचे असेल तर त्यांनी ते ३ वर्षांच्या आत करणे आवश्यक आहे.पुढील भागात आपण मृत्युपत्राची अंमलबजावणी, मृत्युपत्र ज्याच्या हक्कात लिहून ठेवण्यात आलेले आहे,त्याने कोणकोणते कायदेशीर बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे आणि कोणकोणत्या परिस्थितीमध्ये मृत्युपत्र रद्दबातल होईल हे पाहणार आहोत.

Legal Awareness
Property Dispute : मिळकतीची विल्हेवाट लावा चलाखीने

मृत्युपत्राची नोंदणी कशी करावी?

भारतीय नोंदणी कायद्यातून मृत्युपत्रास मुद्रांक शुल्कातून व नोंदणी करण्यापासून सूट देण्यात आली आहे, म्हणजेच मृत्युपत्रास नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक नाही. परंतु मृत्युपत्र तयार केल्यानंतर, त्याची नोंदणी करणे ही उत्तम बाब आहे, कारण तुम्हांला या प्रकारे मृत्युपत्राची कायदेशीर प्रत मिळेल.

मृत्युपत्राशी छेडछाड झाल्यास, मूळ मृत्युपत्र आणि सादर केलेल्या मृत्यूची तुलना केली जाऊ शकते. तसेच, मूळ नष्ट झाल्यास प्रत घेण्यासाठी तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात संपर्क साधू शकता. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आलेल्या मृत्युपत्र प्रश्नांकित होण्याची शक्यता कमी असते. त्यावेळी दुय्यम निबंधक अधिकारी निष्पक्ष साक्ष देण्यास बांधील असतो.

मृत्युपत्र नसेल तर काय होते?

वैध मृत्युपत्र न करता तुमचे निधन झाल्यास, तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असते. तथापि, त्या बाबतीत वारसा कायदे लागू आहेत.

आत्तापर्यंत, तुम्हांला कायदेशीररीत्या वैध मृत्युपत्र बनवण्याचे महत्त्व कळले असेल जेणेकरून तुमच्या प्रियजनांना तुमच्या निधनानंतर तुमची मालमत्ता कशी विभागली जावी हे निश्चित होईल, लक्षात ठेवा की एखाद्या अल्पवयीन व्यक्तीने तयार केलेले मृत्युपत्र, मानसिकदृष्ट्या अक्षम असलेल्या व्यक्तीने किंवा त्यांच्या संवेदनांमध्ये नसलेल्या व्यक्तीने किंवा बळजबरीने केलेले मृत्युपत्र कायद्याने वैध किंवा बंधनकारक मानले जाऊ शकत नाही.

मृत्युपत्र तयार करून ठेवण्याची इच्छा असलेला व्यक्ती वकिलाचा सहभाग न घेता देखील मृत्युपत्र करू शकतो. परंतु कायदेशीर व वैध तसेच न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर खरे उतरणारे मृत्युपत्र तयार करण्यासाठी वकिलाची मदत घेणे उत्तम असते.मृत्युपत्राच्या दस्तास मुद्रांक शुल्कातून व नोंदणी करण्यापासून सूट देण्यात आली आहे, म्हणजेच तुम्ही मृत्युपत्र साध्या कागदावर देखील बनवू शकता, परंतु असे मृत्युपत्र न्यायालयात सिद्ध करणे जिकिरीचे जाते म्हणून मृत्युपत्र हे नोंदणी केलेले उत्तम, कारण मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते.

मृत्युपत्राच्या कायदेशीर वैधतेबद्दल किंवा पवित्रतेबद्दल शंका व्यक्त करता येऊ शकते. त्यामुळे,अनोंदणीकृत मृत्युपत्रापेक्षा नोंदणीकृत मृत्यूप्रत अधिक मजबूत आहे, कारण यामुळे त्याची वैधता वाढते आणि ती रद्द होण्याची शक्यता कमी होते.

: bvberule@gmail.com

(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com