
भीमाशंकर बेरुळे
Indian Law: भारतीय उत्तराधिकार (वारसा) अधिनियम १९२५ हा कायदा एकत्र कुटुंबातील, मृत्युपत्र न करता मयत झालेल्या व्यक्ती आणि मृत्युपत्र केलेले असल्यास त्यात नमूद उत्तराधिकारी यांना लागू आहे.ब्रिटिशांना भारतात राज्य करताना कायदे आनुषंगिकरित्या चालविणे आवश्यक झाले. यात मुख्यतः हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांचा विशेष विचार करणे आवश्यक होते, कारण या दोन्ही समुदायांचे स्वतःचे वैयक्तिक कायदे त्यांच्या पवित्र ग्रंथामध्ये दिले होते.
याशिवाय अल्प लोकसंख्या असलेले पारसी, ख्रिश्चन इत्यादी इतर समुदायही होते, ज्यांची हिंदू किंवा मुस्लिम धर्मावर निष्ठा नव्हती आणि ते हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांपेक्षा भिन्न होते. या समुदायांवर हिंदू किंवा मुस्लिम धर्मीय कायदे लादणे योग्य नव्हते. या सर्वांचा विचार करून भारतीय वारसाहक्क कायदा बनविण्यात आला.
या कायद्यान्वये मृत्युपत्र न करता मयत झालेल्या हिंदू, मुसलमान व पारसी वगळता इतर धर्मीय व्यक्तींचे वारस ठरविण्यासाठी प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत.
कायद्यातील तरतुदी
कलम ३२
मृत्युपत्र न करता मृत्यू पावलेल्या व्यक्तीची मिळकत प्रथम त्या व्यक्तीची पत्नी किंवा पती अथवा अपत्ये व जवळचे नातेवाईक यांना पुढे दिलेल्या नियमांप्रमाणे वारसाने मिळते.
स्पष्टीकरण : जर विवाहापूर्वीच विशिष्ट अधिकृत कराराने एखाद्या स्त्रीला तिच्या पतीच्या मिळकतीतील हिस्सा वारसाने मिळणार नाही असे ठरले असेल तर पतीच्या निधनानंतर त्याची विधवा म्हणून तिला कोणताही हक्क प्राप्त होणार नाही.
कलम ३३
जेव्हा मृत्युपत्र न करता मयत झालेल्या व्यक्तीच्या मागे त्याची
(अ) विधवा आणि वंशपरंपरागत वंशज किंवा
(ब) विधवा आणि जन्माने जोडले गेलेले नातेवाईक अपत्ये असतील किंवा फक्त
(क) विधवा असेल तर उपरोक्त (अ) प्रमाणे असेल तर मयताच्या मिळकतीतील १/३ (एक त्रितीअंश) भाग त्या विधवेला दिला जाईल व उर्वरित २/३ (दोन त्रितीअंश) हिश्शाची विभागणी नियमाप्रमाणे केली जाईल. उपरोक्त (ब) प्रमाणे असेल तर मयताच्या मिळकतीतील १/२ (अर्धा हिस्सा) विधवेला मिळेल. उर्वरित १/२ (उपरोक्त (ब) प्रमाणे असेल तर मयताच्या मिळकतीतील १/२ (अर्धा हिस्सा) विधवेला मिळेल आणि उर्वरित १/२ (अर्धा हिस्सा) जन्माने जोडले गेलेल्या नातेवाईक अपत्यांना मिळेल. उपरोक्त (क) प्रमाणे असेल तर मयताच्या मिळकतीतील संपूर्ण मिळकत मयताच्या विधवेला मिळेल.
कलम ३३ (अ)
जेव्हा मयतामागे अपत्य अगर जवळचे नातेवाईक नसतात आणि फक्त विधवा असते तेव्हा आणि मयत व्यक्तीच्या मिळकतीचे मूल्य रुपये पाच हजारांपेक्षा जास्त नसेल, तर संपूर्ण मिळकत त्या मयताच्या विधवेला मिळते.
रुपये पाच हजाराची केलेली तरतूद ही कलम ३३ मध्ये विधवेस दिलेल्या हक्काच्या अतिरिक्त असून त्याशिवाय उर्वरित मिळकतीची विभागणी कलम ३३ मधील तरतुदीप्रमाणे होईल.
मिळकतीचे फक्त मूल्य ठरविताना त्यावरील देणे (कर्ज), मयताच्या उत्तरक्रियेसाठी व मिळकत व्यवस्थापनासाठी झालेला खर्च एकूण मूल्यातून वजा केला जातो.
हे कलम खालील समाजघटकांना लागू पडणार नाही.
अ) भारतीय ख्रिश्चन
ब) मयताचे, त्याच्या मृत्यू समयी ख्रिश्चन असलेले नातू/नात किंवा मुले.
क) हिंदू, बौद्ध, शीख आणि विशेष विवाह नोंदणी कायदा १८७२ च्या कलम २४ च्या तरतुदी लागू असणाऱ्या व्यक्ती.
ड) मृत्युपत्र केलेल्या व्यक्ती.
कलम ३४ :
जेव्हा मयत व्यक्तीच्या मागे त्याची विधवा किंवा जन्माने जोडले गेलेल्या नातेवाईक अपत्यांपैकी कोणीही नसते, तेव्हा मयताची मिळकत त्याच्या नातेवाइकांकडे नियमाप्रमाणे जाते. जेव्हा वरील कोणीही वारस शिल्लक नसेल तेव्हा ती मिळकत सरकार जमा होते.
कलम ३५ :
विधवेला जे हक्क तिच्या पतीच्या मिळकतीत मिळतात तेच हक्क मृत्युपत्र न करता मृत झालेल्या विधूर पतीला मयत पत्नीच्या मिळकतीत मिळतात.
कलम ३६ :
मयताच्या मिळकतीची वाटणी (विधवा असल्यास, तिचा हिस्सा वजा केल्यानंतर) मयताच्या अपत्यांमध्ये विभागणी करण्याचे नियम कलम ३५ ते ४० मध्ये दिलेले आहेत.
कलम ३७ :
जेव्हा मयत व्यक्तीमागे एकच अपत्य असेल व इतर कोणीही पूर्वी मयत झालेल्या अपत्याचे अपत्य नसेल तेव्हा पूर्ण मिळकत जिवंत असणाऱ्या त्या एकट्या अपत्याच्या मालकीची होईल. एकापेक्षा जास्त अपत्ये असतील तर त्या सर्वांमध्ये ती समान हिश्शाने वाटली जाईल.
कलम ३८ :
जेव्हा मयतामागे कोणतेही अपत्य नसते, मात्र अपत्याचे अपत्य अगर अपत्ये असतात आणि इतर दूरचे मयत अपत्यामार्फतचे कोणी जिवंत नसते, तेव्हा जिवंत असणाऱ्या अपत्याचे अपत्य (नात किंवा नातू) एकच असल्यास संपूर्ण मिळकत त्याच्याकडे जाईल. अशी एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्यांच्यामध्ये समान हिश्शात विभागली जाईल.
कलम ३९ :
अशा प्रकारे मयत व्यक्तीची मिळकत वंशपरंपरेने येणाऱ्या वारसाकडे संक्रमित होते.
कलम ४० :
जेव्हा मयत व्यक्तीमागे शिल्लक असलेले वारस एकापेक्षा जास्त पिढीच्या अंतराने दूर किंवा नजीकचे असे मिश्र स्वरूपात शिल्लक राहतात, तेव्हा मयताच्या मिळकतीचे त्याचे अपत्यजन वारस व नातेवाईक विचारात घेऊन हिस्से करून सर्व कायदेशीर वारसांना हिस्से मिळतील असे वाटप होईल.
वरीलप्रमाणे असलेल्या हिश्शातील प्रत्येक हिस्सा वंशावळीनुसार अती नजीकच्या वारसास तर प्रत्येकी एक अशा मृत वारसास दिले जातात. असे हिस्से या वारसांच्या पुढील उत्तराधिकाऱ्याकडे संक्रमित होतील अशा पद्धतीने वाटप केले जाते.
कलम ४१ :
जेव्हा मृत व्यक्तीच्या मागे त्याच्या वंशावळीतील कोणीही वारस नसतो तेव्हा इतर नातेवाइकांमध्ये (विधवा जिवंत असल्यास तिचा हिस्सा वगळून) मृत व्यक्तीच्या मिळकतीचे विभाजन कलम ४२ ते कलम ४८ मध्ये दिलेल्या तरतुदी प्रमाणे केले जाते.
कलम ४२ :
जर मृत व्यक्तीचे वडील जिवंत असतील तर ते मृत व्यक्तीचे उत्तराधिकारी ठरतील.
कलम ४३ :
जेव्हा मृत व्यक्तीचे वडील जिवंत नसतात पण आई, भाऊ व बहिणी जिवंत असतात व कोणीही भाऊ किंवा बहीण मयत नसते तेव्हा व्यक्तीच्या मिळकतीचे समान हिस्से करून आई, भाऊ व बहिणी यांना दिले जातात.
कलम ४४ :
जेव्हा मृत व्यक्तीचे वडील जिवंत नसतात पण आई, भाऊ, बहिणी व मयत भाऊ व बहिणीची मुले जिवंत असतात, तेव्हा मृत व्यक्तीच्या मिळकतीचे आई, जिवंत व मयत भाऊ, बहिणीच्या संख्येइतके समान हिस्से केले जातात. प्रत्येकी एक याप्रमाणे आई, जिवंत भाऊ, बहिणी व मयत भाऊ, बहिणीचे वारस यांना दिले जातात.
कलम ४५ :
जर मृत व्यक्तीचे वडील जिवंत नाहीत पण आई जिवंत आहे आणि सर्व भाऊ-बहिणी मयत असून त्यांची मुले, मुली जिवंत आहेत असे असेल तर आई व मयत भाऊ-बहीण यांच्या संख्येइतके समान हिस्से गृहित धरून मिळकतीचे वाटप होईल. असे हिस्से संबंधित मयत भाऊ, बहिणी यांच्या वारसाकडे संक्रमित होतील.
कलम ४६ :
जेव्हा मृत व्यक्तीस त्याच्या आईशिवाय कोणीही वारस शिल्लक नसते तेव्हा अशा व्यक्तीची संपूर्ण मिळकत आईकडेच जाते.
कलम ४७ :
जेव्हा मृत व्यक्तीचे आई वडील मयत असतात तेव्हा त्याची मिळकत त्याचे जिवंत व मयत भाऊ-बहिणी यांच्यामध्ये समान हिश्शाने वाटली जाते. मयतांचे हिस्से त्यांच्या वारसांकडे संक्रमित होतात.
कलम ४८ :
जेव्हा मृत व्यक्तीस आई, वडील, भाऊ, बहिणी किंवा त्यांचे वारस असे कुणीही उत्तराधिकारी नसतात तेव्हा मृत व्यक्तीच्या नजीकच्या पिढीतील जे नातेवाईक हयात असतील त्यांना सम-समान हिश्शाने मृताची मिळकत मिळेल.
कलम ४९ :
जेव्हा मृत व्यक्तीच्या मिळकतीचे त्याच्या मुलांमध्ये किंवा वारसांमध्ये विभाजन केले जाते तेव्हा मृत व्यक्तीचे वारस हक्क मागणाऱ्या मुलाच्या मुलीच्या अगर त्यांच्या अपत्याच्या पालनपोषणासाठी व विकासासाठी केलेला खर्च मिळकतीचे अथवा हिश्शाचे मूल्यांकन करताना विचारात घेतला जात नाही.
bvberule@gmail.com
(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.