Property Dispute : एका वयोवृद्धाची अजब मागणी

A Matter of Property : कोरोनाच्या काळात अनेक लोकांना आपले आप्त व नातेवाईक गमवावे लागले. या काळात अनेक सामाजिक बदल झालेले सर्वांनी पाहिले.
Property Dispute
Property DisputeAgrowon
Published on
Updated on

Property Issue : कोरोनाच्या काळात अनेक लोकांना आपले आप्त व नातेवाईक गमवावे लागले. या काळात अनेक सामाजिक बदल झालेले सर्वांनी पाहिले. काहींनी या काळात जोरात सावकारी केली, तर मृत्युपत्रांची व मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या या काळात प्रचंड वाढली, असे देखील एक निरीक्षण आहे.

कोरोना काळातच प्रभाकर नावाचे ८० वर्षांचे एक गृहस्थ एका शहरात एकटेच राहत होते. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ते थोडे घाबरलेदेखील होते. त्यांच्या दोन मुलांपैकी एक मुलगा परदेशात शिकत होता, तर दुसरा मुलगा बंगलोरमध्ये आयटी कंपनीमध्ये होता. प्रवासाच्या निर्बंधामुळे दोघेही जण फोनवरून वडिलांची विचारपूस करीत असत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपर्यंत परिस्थिती अतिशय गंभीर झाली.

प्रभाकर यांनी समोरच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका वकिलाच्या ऑफिसमध्ये होणारी गर्दी पाहून चौकशी करण्यासाठी दोन-तीन वेळा हेलपाटे मारले. दर आठवड्याला प्रभाकर त्या वकिलांच्या ऑफिसमध्ये येऊन बसत व आलेल्या लोकांशी चर्चा करीत. वकिलांनी विचारले, की मी फक्त माहिती घेत आहे.

माझे आता कोणतेच काम नाही, असे उत्तर ते देत असत. एवढे वयस्कर आजोबा प्रत्येक वेळी नवा नवा मुद्दा घेऊन फक्त चौकशी करतात व वेगवेगळ्या मुद्यांवर सल्ला मागतात, परंतु त्यांना कोणताच दस्तऐवज करून नको आहे असे त्या वकिलाच्या निदर्शनास आले.

Property Dispute
Land Dispute : कहाणी ‘हायवे टच’ घराची!

पुढच्या महिन्यात एका संध्याकाळी प्रभाकर जेव्हा पाचव्यांदा वकिलांच्या कार्यालयात आले, तेव्हा त्यांनी मृत्युपत्राबाबत चौकशी केली. वकिलाने जेव्हा त्यांना विचारले, की तुम्हाला मृत्युपत्र करावयाचे आहे का? तेव्हा प्रभाकर म्हणाले, की तुम्ही मृत्युपत्र करता का? व कोरोनाच्या काळात तुम्ही किती मृत्युपत्रे केली आहेत, याची चौकशी करायला मी आलो आहे.

त्यावर त्या वकिलाने गेल्या दोन महिन्यांत मी १५० मृत्युपत्रे तरी केली आहेत, असे सांगितले. त्यानंतर मात्र प्रभाकर यांनी वकिलाला दिलेले उत्तर अजूनच अचंबित करणारे होते. प्रभाकर म्हणाले, ‘‘मी लहानपणापासून भांडून भांडून गावच्या जमिनी मिळवल्या आहेत. त्यासाठी मी सर्व नातेवाइकांशी वाईट वागलो. आयुष्यभराच्या नोकरीत मिळालेल्या पैशातून मागच्या इमारतीमधील एक फ्लॅट मी घेतला आहे.

Property Dispute
Land Dispute : बांध कोरण्यातील आनंद

पण माझी एक इच्छा आहे, की माझ्या प्रॉपर्टीतील कोणतीही प्रॉपर्टी माझ्या मुलांना सहजासहजी मिळू नये. निदान ही प्रॉपर्टी मिळवताना आणि टिकवताना मला जेवढा त्रास झाला, त्याच्या १० पट तरी अधिक त्रास माझ्या मुलांना झाला पाहिजे. त्यांना प्रत्येक कागदपत्र मिळविण्यासाठी १० हेलपाटे सरकारी कार्यालयात घालायला लागले पाहिजेत.

मी मेल्यानंतर मुलांना रजा काढून येऊन १०-१५ हेलपाटे मारल्यावर महापालिकेचे प्रॉपर्टी टॅक्सचे बिल, अजून १०-१२ हेलपाटे मारल्यावर जमिनीचा सातबारा, चार-पाच हेलपाटे मारल्यानंतरच जमीन नावावर करून द्यायची कागदपत्रे मिळाली पाहिजेत. मला प्रॉपर्टी मिळवताना जेवढा त्रास झाला त्याच्या दस पट त्रास त्यांना कागदपत्रे मिळवताना झाला पाहिजे. यासाठी मी ही सर्व कागदपत्रे सुरक्षितपणे कुठे ठेवू शकतो का?”

अशी विचारणा करण्यासाठी प्रभाकर वकिलाकडे आले होते. मी इतरांसारखे मृत्युपत्रही करणार नाही, अन् बक्षीसपत्र सुद्धा नाही! आपण मेल्यानंतर दोन-तीन वर्षांनी फार त्रास सहन केल्यानंतर ही कागदपत्रे मुलांना मिळण्यासाठी काही करता येईल का? बँकेच्या लॉकरमध्ये ही कागदपत्रे ठेवली तर लगेच त्यांना मिळतील. त्याऐवजी काही दुसरा पर्याय आहे का? या त्यांच्या प्रश्‍नांवर वकिलांकडे कोणतेच सयुक्तिक उत्तर नव्हते.

एकविसाव्या शतकात स्वत:च स्वतःला हरवू इच्छिणारा आणि स्वत:ची कागदपत्रे पण हरवू इच्छिणारा असा मुलखावेगळा माणूस त्या वकिलाने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता. कलियुगात आणखी काय काय पाहावे लागेल हे आजतरी सांगता येणे अवघड आहे. फसण्याची, फसवण्याची स्पर्धा सुरू असून, मानवी उत्क्रांतीमध्ये चालू काळ पुढे जाऊन नक्की कोणत्या अर्थाने प्रसिद्ध पावेल हे सांगता येणे अवघड आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com