
विनोद इंगोले
Natural Farming: सृष्टी हिरवीगार होती, त्यावेळी कोणत्याच रासायनिक खतांचा वापर होत नव्हता. अन्नाच विज्ञान हे सृष्टीतील पशू, पक्षी यांनी निर्माण केले. त्याच वेळी मानवाच्या मूलभूत गरजांची पूर्तता निर्माण करण्याचे क्षेत्र हे ‘शेती’ असल्याचे लक्षात आले. मात्र या शेतीपद्धतीचा पाया हा रसायनावर आधारीत असल्यामुळे जमीन आणि मानवी आरोग्य दोन्ही धोक्यात आले होते. त्यातूनच नैसर्गिक शेतीची प्रेरणा मिळाली, असे यवतमाळ येथील निसर्ग शेतीचे अभ्यासक सुभाष शर्मा सांगतात.
निसर्ग हेच विद्यापीठ
१९७० पासून शेती कसण्यास सुरुवात केल्यानंतर रासायनिक शेतीमुळे माती, पाण्याचा ऱ्हास होऊन पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचे लक्षात आले. अगदी सुरुवातीलाच रसायनावर आधारीत शेतीचे दुष्परिणाम जाणल्यानंतर निसर्गालाच विद्यापीठ आणि कुलगुरू करत त्यांच्याकडूनच शेती पद्धतीचे ज्ञान घेतले. त्यातील जीव, जंतू हे माझ्यासाठी शेतीतील प्राध्यापक होते जणू ! असे सुभाष शर्मा सांगतात.
जनावरांनी चारा खाल्यानंतर त्यापासून शेण मिळाले. शेणातून जीव, जंतू निर्माण झाले. या जंतूचे खाद्य वनस्पती होते. जीवजंतू मृत झाल्यावर ते मातीत मिसळले. अशाप्रकारे खत मिळत गेले. फवारणी शिवाय कीड-रोग नियंत्रण कसे होते, हा विचार पुढच्या टप्प्यात आला. त्यानुसार वातावरणातील, शेतशिवारातील किडींचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्याआधारे शिवारातील २५ टक्के शाकाहारी, तर ७५ टक्के किडी मांसाहारी असल्याचे समजले.
ढोबळ भाषेत २५ टक्के शत्रू, तर ७५ टक्के मांसाहारी कीड निसर्गातच उपलब्ध आहेत. एकाप्रकारे ही परस्परपूरकता होती असे म्हणता येईल. यातूनच कीड नियंत्रण साधता येते. कीडनियंत्रणासाठी रासायनिक फवारणी करण्याऐवजी तो अधिकार जर पाखरांना दिला, तर ते किडीला १०० टक्के खातात. त्यातून सहज कीड नियंत्रण शक्य होते, असे श्री. शर्मा सांगतात.
...असे केले मॉडेल विकसित
सुभाष शर्मा यांची एकूण १५ एकर शेती आहे. एकूण शेतीक्षेत्रापैकी, २ टक्के क्षेत्रात पशुपालन, तीन टक्के क्षेत्रात शेतातील पाणी शेतातच थांबविले, तर ३० टक्के क्षेत्रात झाडे लावली आहेत. त्यापैकी १० टक्के क्षेत्रात आंबा, फणस, बेल, जांभूळ, लिंबू, पिंपळ अशी फळबाग आहे. सोबतच २० टक्के क्षेत्रात फणस, मोसंबी यांची सलग लागवड आहे. यातून शेतात एक सूक्ष्म वातावरण निर्मिती झाल्याने अनेक फायदे अनुभवता आले. त्यासोबतच ६५ टक्के क्षेत्रावर पिकांची संरचना केली आहे. आता शेतीला एनपीकेची गरज होती.
वैज्ञानिक विश्लेषणातून माती आरोग्यावर भर देत पशुपालनाचा पर्याय अवलंबिला. झाडे असतील, तर पाखरे येतील त्यांची विष्ठा शेतशिवारात पडेल त्यातून २४ तास कार्यरत खताचा कारखाना तयार होईल, अशी जाणीव झाली. हिरवळीच्या खताशिवाय जीवजंतू उपलब्ध होणार नाहीत हे लक्षात आले. त्याकरिता दरवर्षी हिरवळीचे खताचा वापर करण्यावर भर दिला. असे झाडे, पाणी, पशुधन यांचे मॉडेल विकसित झाले.
शेतातील पाणी शेतातच
पावसाचे पाणी शेतातच कसे जिरवता येईल, यावर लक्षकेंद्रित केले. सेंद्रिय शेती कसण्यास सुरुवात केली, त्या वेळी जीव, जंतू, जिवाणू यांचे प्रमाण वाढले. त्यांच्या माध्यमातून जमीन भुसभूसीत झाल्याने पावसाचे ७० टक्के पाणी शेतात जिरविता आले. सोबतच चर खोदून उर्वरित ३० टक्के पाणी जिरविले. या उपायांतून १०० टक्के पाणी शेतात थांबविता आले.
खर्चीक बाबींमुळे मर्यादा
शेतातील पाणी शेतात जिरविण्यासाठी चर खोदावे लागतात. त्यासाठी हेक्टरी सरासरी १५ हजार रुपयांचा खर्च होतो. बांधावर २५० फुटांवर झाड लावण्याचे नियोजन होते. मात्र शासकीय योजनेत बांधावर आणि त्यातही २५० फुटांवर झाड लावण्याची तरतूद नाही. त्यामुळे अनुदान मिळत नाही. चर खोदणे हा माझ्या शेतीपद्धतीच्या मॉडेलमधील मुख्य घटक आहे. मात्र या कामासाठी पैसे लागतात.
आर्थिक गुंतवणुकीचा प्रश्न असल्याने शेतकरी याला तयार होत नाही, असा श्री. शर्मा यांचा अनुभव आहे. त्यामुळेच केव्हीके व तत्सम संस्थांच्या परिसरात मॉडेल विकसित करण्यावर भर दिला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांसोबतच यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत १२ ते १३ मॉडेल तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांपर्यंत हे विज्ञान पोहोचले आहे.
नैसर्गिक निविष्ठांची निर्मिती
अ) अलौकिक खत
हे तयार करण्यासाठी एक ट्रॉली शेणखताचा (ओलावा निघून गेलेले) ढीग करून चार किलो गुळाचे पाणी व तीस किलो गोमूत्र यांचे मिश्रण ढिगावर समप्रमाणात पसरविले जाते. त्यावर कचऱ्याचे आच्छादन केले जाते. त्यातील जीव, जंतू, जिवाणू यांना ओलावा मिळतो. जिवाणूंना ओलावा मिळण्यासाठी पुन्हा ३० दिवसांनी गूळ पाणी आणि गोकृपा अमृतम या मिश्रणाचा शिडकावा ढीगावर केला जातो. या प्रक्रियेतून ५० ते ६० दिवसांत उत्तम प्रतीचे खत तयार होते. या खताचा वापर शेतामध्ये करण्यास विलंब होणार असेल, तर दर ३० दिवसांनी पाण्याचा शिडकावा करत राहावा. जेणेकरून जिवाणूंना जिवंत राहण्यासाठी ओलावा उपलब्ध होईल. ही बाब लक्षात ठेवावी.
या माध्यमातून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि इतर १३ सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा जमिनीला होतो. याचा पुरवठा अलौकिक खताच्या माध्यमातून मृत जिवाणूंमार्फत होतो. काही घटक हे पिकांच्या अवशेषातून उपलब्ध होतात. या माध्यमातूनच सेंद्रिय कर्ब वाढविणे शक्य होते. त्याकरिता इतर काही विशेष करण्याची आवश्यकता नाही. मात्र त्याचे बेसिक हे देशी गोवंशपालनावरच आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे.
ब) गोसंजीवक खत
हे खत तयार करण्यासाठी गाईचे ताजे शेण ३० किलो, तीन लिटर गोमूत्र, एक किलो गूळ, तीन लिटर गोकृपा अमृतम या घटकांचा वापर केला जातो. या सर्व घटकांचे मिश्रण करून ते १०० लिटर क्षमतेच्या बॅरलमध्ये भरले जाते. बॅरलमध्ये
केवळ ४ इंच जागा राहील इतके पाणी भरावे. या माध्यमातून १०० लिटर द्रावण तयार होते. साधारणपणे १० दिवस ते कुजण्यास ठेवावे. कुजल्यानंतर ते चांगले ढवळून पाण्याबरोबर पूर्ण शेतात प्रवाहीत करावे. पाटपाण्याद्वारे किंवा ठिबकद्वारे हे देता येते. याचा वापर एकदाच किंवा दरवर्षी देखील करता येतो. पहिल्या वर्षी एकरी ६०० लिटर, तर दुसऱ्या वर्षापासून ३०० लिटर या मात्रेत द्यावे. याच्या वापरामुळे जमिनीला तत्काळ संजीवकांचा पुरवठा होतो. जिवाणूंची संख्या वाढीस देखील साह्यभूत ठरते.
क) गोकृपा अमृतम
हे एक जिवाणू कल्चरचे द्रावण आहे. त्याला विरजण घातल्यास अनेक वर्षे ते वापरता येते. हे तयार करण्यासाठी २ लिटर गोकृपा अमृतम, २ किलो गूळ, देशी गाईच्या दुधापासून तयार केलेले ताक २ लिटर घेऊन १०० लिटर पाण्यात मिसळावे. त्यापासून दहा दिवसांत उत्तम प्रतीचे गोकृपा अमृतम खत तयार होते. याचा वापर अलौकिक खत आणि गोकृपा खतामधून करता येतो. फवारणीद्वारे देखील वापर करता येतो.
बीजप्रक्रियेसाठी साहित्य
देशी गाईचे ताजे एक किलो शेण, जंगलातील माती एक किलो, गोमूत्र अर्धा लिटर, गूळ ३०० ग्रॅम यांचे मिश्रण करून त्यात आवश्यकतेनुसार पाणी मिसळावे. याचा वापर करून बीजप्रक्रियेसाठी करावा. दहा किलो ते ५० किलो पर्यंतच्या बियाण्यांवर या माध्यमातून प्रकिया करता येते. त्यासोबतच हे द्रावण बियाणांवर शिंपडावे.
बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळविण्यास ठेवावे. गुळाचा वापर केल्यामुळे ते बियाण्यांस चांगले चिकटते. मातीचा समावेश असल्यामुळे शेणातील जिवाणू त्वरित सक्रिय होतात. गोमूत्रामुळे बुरशीजन्य रोग टाळले जातात. या पद्धतीने बीजप्रक्रिया केल्यामुळे ८० टक्क्यांपर्यंत कीड-रोगांचे नियंत्रण शक्य होते. अशाप्रकारचे शेती उपयोगी घटकांचे उत्पादन देशी गोवंश पालनातून करता येते. त्यामुळे देशी गोवंशपालन हे स्वावलंबी शेतीचे प्रतिक ठरले आहे.
गोसंगोपन, वृक्ष लागवड महत्त्वाची
अन्न, पाणी, हवा या प्रत्येक सजीवाच्या मूलभूत गरजा ठरतात. त्याकरिता शेतात वृक्ष लागवडीचे नियोजन करावे लागेल. कारण वाढत्या तापमानाचा शेतातील उपयुक्त जिवाणूंवर अनिष्ठ परिणाम होतो. त्याकरिता २०० ते ३०० फुटांवर झाडाच्या रांगा शेतात असायला हव्यात. त्या पूर्वपश्चिम असाव्यात. तर उत्तर दक्षिण दिशेस बेल, पेरू, सीताफळ या प्रकारच्या झाडांची लागवड करावी. गोपालन आणि वृक्ष लागवडीतून तापमान नियंत्रणासोबतच सजीवांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा देखील करता येईल.
त्यामुळे गोपालन आणि नैसर्गिक संसाधन हे महत्त्वाची भूमिका बजावतात. जीव, जंतू, जिवाणूंना लागणारे खाद्यान्न देखील उपलब्ध होते. त्यांच्यासाठी आपल्याला तीन प्रकारच्या अवशेषांचा वापर करावा लागेल. पिकातील तणांचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य विकसित करावे लागेल. पिकांचे अवशेष न जाळता ते कुजवून त्यांचा वापर तसेच हिरवळीचे खत तयार करण्याचे कौशल्य आपल्यात हवे. इतक्या बायोमासचा वापर केल्यास जमिनीचा सेंद्रीय कर्ब वेगाने वाढेल. या सगळ्यांचा प्रभावी वापर केला, तर कीडनियंत्रण करण्याची आवश्यकता भासणार नाही.
कारण गोपालनामुळे झाडाची कल्पना आली, त्यापासून पक्ष्यांचा वावर शिवारात वाढला. त्या माध्यमातून ४० टक्के कीडनियंत्रणाचा उद्देश साधता येतो. या व्यतिरिक्त असंख्य जीव, जंतू तयार होतात. पावसाचे पाणी देखील जमिनीत जिरते. एवढ्या बाबी केवळ देशी गोपालनातून शक्य होतात. शेतीचे खरे विज्ञान परस्पर पूरकता, संतुलन आणि स्वावलंबन या तीन बाबींवर अवलंबून असल्याचे सुभाष शर्मा सांगतात.
- सुभाष शर्मा, ९४२२८६९६२०
(नैसर्गिक शेती अभ्यासक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.