
राज्याच्या ग्रामीण भागातील पर्यावरणपूरक कृषी तंत्रज्ञान प्रसारात आघाडीवर असलेल्या काही अग्रेसर संस्थांपैकी विदर्भातील ‘धरामित्र’ ही एक जुनी स्वयंसेवी संस्था आहे. विज्ञानावर आधारित तंत्र आणि पारंपरिक पद्धत याची अनोखी सांगड घालणाऱ्या ‘धरामित्र’चे संस्थापक अध्यक्ष असलेले डॉ. तारक काटे हे मूळात कृषी वैज्ञानिक आहे. शाश्वत शेती या संकल्पनेच्या अनुषंगाने त्यांच्याशी केलेली बातचीत.
तुम्ही उच्चविद्याविभूषित असूनही अचानक शेती क्षेत्राकडे कसे वळलात?
तसे माझे प्राथमिक शिक्षण वर्ध्यात झाले. मी मुळातच जिज्ञासूवृत्तीचा होतो. नवीन तंत्र व माहिती प्राप्तीसाठी सतत झपाटलेला असायचो. मात्र घरच्या आर्थिक हलाखीमुळे उच्च शिक्षणाचा प्रश्न होता. पण मार्ग निघत गेले. शाळेतील वर्गशिक्षकांचे माझ्यावर प्रेम होते. त्यांनीच मला केंद्र शासनाच्या भोपाळमधील शिक्षण महाविद्यालयात पाठवले. तेथे मला महिना ७५ रुपये शिष्यवृत्तीदेखील सुरू झाली. त्यातूनच माझे शिक्षण होऊ शकले.
देशातील उत्तम शिक्षक तेथे मला लाभले. मी बीएस्सी.बीएड. होताच थेट वर्ध्यात येऊन शिक्षक बनलो. परंतु मला पुढे शिकायचे होते. त्यामुळे मी पुन्हा भोपाळला गेलो व वनस्पतीशास्त्रात ‘सायटोजेनिटिक्स’ म्हणजे कोशिकानुवंशिकी विषयात एम.एस्सी. झालो. त्यानंतर मी एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो.
तरीही अध्ययनाची तहान भागत नव्हती. काही झाडांना फुले येतात; पण फळे, बिया का येत नाहीत, याचे मला सतत कुतूहल होते. त्यामुळे हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवत मी नागपूर विद्यापीठातून वनस्पतिशास्त्रात पीएच.डी. केली. त्यामुळे आता देश-विदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीत आरामात जगणे शक्य होते. परंतु मी ते सोडून ग्रामीण व कृषी क्षेत्राशी संलग्न क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.
पण मग ‘धरामित्र’ची स्थापना का करावी लागली?
मी पीएच.डी. झालो खरा; मात्र त्या काळी देशात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलनाने जोर धरला होता. जयप्रकाशजींनी स्थापन केलेल्या ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’त मी देखील ओढला गेलो. याच दशकात १९७९ मध्ये वर्ध्यात एका गांधीवाद्याने ‘ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र’ स्थापन केले. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागाच्या उन्नतीचे ध्येय त्या केंद्राने ठेवले होते. मी त्याच विचाराने झपाटलो होतो. १९८० मध्ये त्या केंद्रात वैज्ञानिक म्हणून रुजू झालो.
एव्हाना हरितक्रांतीचे दुष्परिणाम जाणवू लागले होते. घटते उत्पादन, शेतीतील वाढता खर्च, माती पाण्याचे प्रदूषण आणि अतिरेकी प्रमाणात कीडनाशके, रासायनिक खतांच्या वापरामुळे अन्नधान्यात आलेली विषाक्तता, असे ते दुष्परिणाम होते. त्याचवेळी मी जपानचे मासानोबू फुकुओका, ऑस्ट्रेलियाचे बिल मॉलिसन यांचे निसर्गशेतीविषयक तत्त्वज्ञान बारकाईने समजून घेत होतो. पर्यावरणाची हानी न करता एकात्मिक शेती करण्याचा संदेश ही मंडळी देत होती. फुकुओका-मॉलिसन परंपरेतील पहिले गुरू मला मराठी मायभूमीतच भेटले.
ते होते भास्कर सावे. ते शिक्षक होते आणि पर्यावरणपूरक शेती करीत होते. त्यांची प्रेरणा घेत ग्रामोपयोगी विज्ञान केंद्रात दीड दशक झपाटल्यासारखे काम केले. पुढे मला शास्त्रज्ञाऐवजी व्यवस्थापनाचे प्रशासकीय काम मिळाले. ते मला अजिबात आवडले नव्हते. सुदैवाने १९९४ मध्ये मला ‘अशोका फेलोशिप’ मिळाली; आणि मी ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र ही संस्था सोडली. त्यानंतर मी स्वतः एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली; तीच आताची ‘धरामित्र’ होय.
‘धरामित्र’ने नेमके काय केले?
आम्ही विज्ञानावर आधारित ग्रामविकासावर भर दिला. मी शेतकरी नव्हतो; पण शेती करुन त्यातील सुखदुःख समजून घेतली पाहिजेत असा निश्चय केला. त्यामुळे सव्वादोन एकरची शेती घेतली. तेथेच घरही बांधले. घरात प्रयोगशाळा साकारली. माझी जमीन मी ‘धरामित्र’ला कराराने दिली. तेथे मी काही तरुण वैज्ञानिकांना सोबत घेत ग्रामीण भागासाठी पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान निर्मितीचे काम सुरु केले. माझ्या ‘अशोका फेलोशिप’च्या काळात वर्धा जिल्ह्यातील सैदापूर या एका लहान गावात मी शेतकऱ्यांसाठी शाश्वत शेती विषयक प्रबोधन वर्ग सुरु केले.
त्यामुळे दोन वर्षात गावाची अर्धी शेती सेंद्रिय झाली. पुढे आम्ही विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये शाश्वत शेतीच्या प्रसाराचे काम सुरू केले. तेथील स्थानिक संस्थांच्या मदतीने आम्ही गावोगावी शेतकरी अभ्यास मंडळे स्थापन केली. जवळपास ४०० शेतकऱ्यांच्या एकूण १२०० एकर क्षेत्रात आम्ही प्रयोग केले.
शेतीमधील नफा-तोटा आम्ही सर्वप्रथम मांडत शेतकऱ्याला शेतीचा हिशेब काढायला शिकवले. त्यातून शेतकऱ्यांच्या असे लक्षात आले, की विविध कामांसाठी तो जेव्हा १०० रुपये कर्ज काढतो; तेव्हा त्यावर महिना ५ टक्के दराने वर्षाला ६० रुपये म्हणजे शेकडा ६० टक्के व्याज भरतो आहे. जास्त अडचणीत सापडलेला शेतकरी काही ठिकाणी १२० टक्केदेखील व्याज देत होता.
शेतकरी आत्महत्यांच्या मुळाशी कर्जबाजारीपणाचा मुद्दा उगाच आलेला नव्हता. रासायनिक निविष्ठांवरील भरमसाठ खर्च चिंतेचा होता. “तुमच्या कष्टाळू सदऱ्याच्या खिशाला भोकं पडली आहेत. त्या शिखात तुमचेच पैसे शोषणारा एक पंप असून तो थेट कृषी सेवा केंद्रात किंवा सावकाराच्या घरात गेला आहे,” असे दाहक सत्य मी शेतकऱ्यांना सांगत असे. त्यामुळे पर्यावरणपूरक शेतीच फायदेशीर असल्याचे आम्ही सप्रमाण सिद्ध करून देत होतो. कर्ज काढा, नशिबाने पीक आले तर कापा, बाजारात न्या, तेथे नशिबाने भाव मिळाला तर ठीक; अन्यथा व्याज फेडा आणि पुन्हा दुसऱ्या हंगामात कर्ज काढून शेती करा, अशा दुष्टचक्रात शेतकरी अडकलेला होता.
त्यामुळे आम्ही कापूस, तूर, सोयाबीन या नगदी पिकाभोवती अडकून पडलेल्या शेतकऱ्याला बहुपीक पद्धतीकडे नेले. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेला जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख झाली होती. आम्ही याच जिल्ह्यात ‘स्विस एड’ संस्थेच्या मदतीने घाटंजी भागात ७५० शेतकरी कुटुंबासाठी शाश्वत शेतीचे काम सुरू केले. सध्या काही वर्षांपासून आम्ही आर्वी (जि. वर्धा) येथील ४०० गरीब व कोरडवाहू शेतकऱ्यांबरोबर शाश्वत शेतीवर काम करीत आहोत. तेथील जवळपास ६० टक्के जमीन आता रसायनमुक्त शेतीखाली आली आहे.
आता पुढे काय ठरवले आहे?
पारंपरिक म्हणजे सर्व काही तोट्याचेच, असा चुकीचा प्रचार केला जातोय. त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकरी केवळ कापूस, सोयाबीन अशा अखाद्य नगदी पिकांभोवती केंद्रीत झाला आहे. त्याला पुन्हा पारंपरिक बहुविध पीकपद्धतीकडे नेताना आम्ही ज्वारी पिकावर काम करण्याचे ठरवले आहे. ज्वारीमुळे धान्य व चारा असे दुहेरी पारंपरिक लाभ शेतकऱ्यांना मिळतील.
त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आधीच्या पिढ्या ज्वारी हेच मुख्य पीक मानून शेती करीत होत्या. आता तरुणांनी शेती हातात घ्यावी, असा आमचा प्रयत्न आहे. संकरित, रासायनिक निविष्ठांच्या वापरातून झटपट जास्त उत्पादनाची स्वप्नं या तरुण शेतकरी पिढीला दाखवली जात आहेत. परंतु ते खरे नाही. अशी शेती करणे म्हणजे अधिक धोक्याच्या मार्गाने जाण्यासारखे आहे. शेतीत बहुहंगामी वार्षिक पिके घेण्यासोबतच, बहुवार्षिक झाडांची लागवड, शेतीपूरक जोडधंदा, स्थानिक भौगोलिक स्थितीशी जुळलेल्या जातींचे पशुपालन या संकल्पनांवर आमचा भर आहे.
मधल्या काळात तुम्ही विदेशात शेती शिकवायला गेलात हे खरे आहे का?
दक्षिण आफ्रिकेत स्टेलेनबॉश विद्यापीठातील ‘सस्टेनेबल इन्स्टिट्यूट’मध्ये २००३ ते २०१२ या काळात मी दरवर्षी ‘अतिथी प्राध्यापक’ म्हणून शिकवायला जात होतो. तेथे जगातील कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर ‘शाश्वत विकास नियोजन’ या विषयावर पदव्युत्तर तसेच संशोधनपर शिक्षण घेऊ शकतो. तेथे मला जगभरातील विद्यार्थ्यांना ‘जैवविविधता व शाश्वत शेती’ हा विषय शिकवताना अतिशय आनंद मिळत असे. सतत शिकायचे आणि शिकलेले शिकवत राहायचे; पण विदर्भाला विसरायचे नाही, हाच माझा मूलमंत्र आहे.
पण मग भारतीय शेतीमधील समस्येवर उपाय काय?
एक सांगतो, की एकाच पिकाभोवती गुरफटून राहाल; तर त्याचा फास होऊन कधीही गळा आवळला जाऊ शकतो. तुम्हाला कोंबड्या, बकऱ्या, गाईगुरे असलेल्या शेती व्यवस्थेकडे यावेच लागेल. आधुनिक व्यवस्थेत शेतातील झाडे कापून टाकल्याने ‘मायक्रो क्लायमेट’ नाहीसे झाले. गाईगुरे गेल्याने सेंद्रिय शेतीचा आधार गेला. पशुपक्षी गेल्याने मित्रकीडी गेल्या. शेतीत काडीकचरा नसल्याने सूक्ष्मजीवाणूंची निर्मिती थांबून माती मृतप्राय झाली आहे.
त्यामुळे आपल्याला केवळ शाश्वत शेतीच तारु शकेल. थोडी जिरायती, थोडी बागायती, थोडी जोडधंदा असलेली, थोडी आधुनिक आणि थोडी पारंपरिक अशी सर्व सरमिसळ असलेली एकात्मिक शेती पद्धत आपल्याला स्वीकारावी लागेल. तुमच्या शेतात पिके, झाडे, गायी, पशुपक्षी असलेच पाहिजे. शासनालाही पुढे याच धोरणांच्या आधारे शेतीला शाश्वत व्यवस्थेकडे न्यावे लागेल; अन्यथा सध्याचे दुष्टचक्र थांबणे अवघड आहे.
- डॉ. तारक काटे, ९८५०३४१११२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.