Symbiosis University: पुणेकरांच्या साक्षीने ज्ञानयोग्याचा सन्मान

Vasudhaiva Kutumbakam: ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना शिक्षणातूनच साकार होते, असा विश्वास व्यक्त करत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ‘सिंबायोसिस’च्या संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांचा ९० वा जन्मदिवस पुण्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
Symbiosis University
Symbiosis UniversityAgrowon
Published on
Updated on

Pune News : आयुष्यभर ज्ञानाची साधना अंगीकारत शिक्षणातून ‘वसुधैव कुटुंबकम्‌’ ही भावना रुजविणारे, परदेशी आणि भारतीय विद्यार्थ्यांमधील ऋणानुबंध अधिक खोल रुजविण्यासाठी अहोरात्र झटणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि ‘सिंबायोसिस’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ‘सकाळ’च्या वतीने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

नव्वदी पार केलेल्या वयातही अगदी अधिकारवाणीने ‘युद्धाशिवाय जग हवे असेल, तर भारतीय संस्कृतीतील ‘वसुधैव कुटुंबकम्‌’ ही संकल्पनाच जगात रुजवायला हवी,’ अशा ज्ञानी ते ज्ञानयोगी होण्याचा प्रवास केलेल्या डॉ. मुजुमदार यांच्या सन्मान सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा योग पुणेकरांनी बुधवारी ‘याचि देही, याचि डोळा’ साधला. निमित्त होते, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने डॉ. मुजुमदार यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे.

‘‘संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, अर्थात ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना केवळ शिक्षणातून साध्य होऊ शकते. डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाद्वारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक सुहृदयी उपक्रम सुरू केला. आज त्याचे चैतन्यशील, बहुविद्याशाखीय शैक्षणिक परिसंस्थेत रूपांतर झाले आहे,’’ असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

Symbiosis University
Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि ‘सिंबायोसिस’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या ९० व्या जन्मदिवसानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राज्यपालांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ‘सकाळ’च्या वतीने ‘ज्ञानपर्व’ विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (कोल्हापूर), संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या मानद संचालक संजीवनी मुजुमदार, ‘एपी ग्लोबाले’चे संस्थापक अध्यक्ष व ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस उपस्थित होते.

श्री. राधाकृष्णन म्हणाले, ‘‘तुम्ही एखादे ध्येय ठरविता आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी त्या दिशेने प्रवास सुरू करता, अशावेळी तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. अगदीच हेच डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्याबाबत झाले आहे. ‘सिंबायोसिस’ ही संस्था भारत आणि परदेशातील हजारो तरुण मनांना सक्षम बनवत आहे. गेल्या पाच दशकांमध्ये, संस्थेने प्रतिष्ठा मिळविली आहे. डॉ. मुजुमदार आणि संजीवनी मुजुमदार यांनी शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या जगातील ८५ हून अधिक देशांमधील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या रूपाने एक घर निर्माण केले आहे. त्यांनी महाराष्ट्राला आणि विशेषतः पुण्याला देशातील उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून ओळख मिळवून दिली आहे.’’

‘‘शिक्षण हे आपले चारित्र्य निर्माण करते, त्याला चांगला आकार देते. मनुष्याला यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे. तुम्ही तुमच्यातील प्रतिभेचा शोध घेतला पाहिजे. तुमची प्रतिभा तुमच्यासाठी, समाजासाठी, जगासाठी उपयुक्त असली पाहिजे आणि त्याप्रमाणे तिचा वापर केला पाहिजे. संपूर्ण जग आज खुले असून अनेक लक्ष विचलित करणाऱ्या बाबी आहेत. परंतु त्यातून काय निवडायचे आणि पुढे जायचे हे आपल्यावर अवलंबून आहे,’’ असेही श्री. राधाकृष्णन यांनी सुचविले.

राधाकृष्णन म्हणाले, ‘‘प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे. मात्र, इतरांच्या भाषेचाही द्वेष होऊ नये. प्रत्येक विद्यापीठात इंग्रजीव्यतिरिक्त इतर कोणत्याही एका विदेशी भाषेचे शिक्षण दिले जावे, अशी सर्व विद्यापीठांचा कुलपती म्हणून आपली भूमिका आहे.’’

Symbiosis University
Agriculture Irrigation : शेती सिंचनासाठी विशेष अभियान

‘‘डॉ. मुजुमदार यांनी ‘सिंबायोसिस’सारख्या बीजाची मुळे खोलवर रुजवित आणि झाड वटवृक्षाप्रमाणे विस्तारावे,’’ असेही राधाकृष्णन यांनी या वेळी सांगितले. या सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक फडणीस यांनी केले. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. ‘सकाळ’चे मल्टिमीडिया संपादक अंकित काणे यांनी आभार मानले.

‘‘ना सत्ता, ना संपत्ती हजारो वर्षे टिकली. टिकली आहेत, ती केवळ मंदिरे. लोकांच्या मनात भक्तिभाव असल्यामुळेच मंदिरे टिकली. डॉ. शां. ब. मुजुमदार ऊर्फ दादा यांनी स्थापन केलेली सिंबायोसिस संस्था पुढची हजार वर्षे टिकवायची असेल, तर सिंबायोसिस विश्वभवनाचे विश्वमंदिर केले पाहिजे,’’ अशी भावना ‘एपी ग्लोबाले’चे संस्थापक अध्यक्ष आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी व्यक्त केली.

‘‘दादा केवळ ज्ञानी नव्हेत, तर ज्ञानयोगी आहेत. भक्ती मार्गानेच ज्ञानी व्यक्तीचा ज्ञानयोगी होतो. दादांनी हा ज्ञानयोगी होण्याचा प्रवास केला आहे. त्यामुळेच त्यांनी स्थापन केलेले विद्यापीठ ज्ञानाचे मंदिर झाले पाहिजे. एका विद्यार्थ्याला वेदना झाल्या आणि त्याचा परिणाम ‘दादां’वर झाला. समाजात दैनंदिन जीवनात आपल्या डोळ्यासमोर अनेक प्रसंग घडतात, ज्यामुळे वेदना होतात. येथे ‘माउलीं’ची आठवण होते.

रेड्याला चार फटके बसतात अन्‌ त्याचा त्रास माउलींना झाला. माउलींनी समाजाला मार्ग दाखविला, त्याप्रमाणे दादा आजच्या काळातील माउलीच आहेत. दैवी इच्छेच्या मार्गावर चालत असल्यामुळेच दादांमध्ये ‘वसुधैव कुटुंबकम्’ची भावना निर्माण झाली. परदेशी विद्यार्थ्यांच्या वेदना पाहिल्यानंतर ‘सिंबायोसिस’सारख्या संस्थेची निर्मिती करण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे, असेही पवार म्हणाले.’’

उपनिषदांचा संदर्भ देत पवार म्हणाले, ‘‘भौतिक, आध्यात्मिक आणि संतुलित जीवन कसे जगायचे, हे खऱ्या अर्थाने दादांकडे पाहून शिकायला मिळते. भौतिक आणि आध्यात्मिकता एकत्र येऊन जीवन यशस्वी करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. मुजुमदार आहेत.’’

‘वसुधैव कुटुंबकम्’ संकल्पना रुजवायला हवी : डॉ. मुजुमदार

‘‘एका परदेशी विद्यार्थ्याच्या अश्रूंनी ‘मी कोण आहे’ हे मला कळाले. त्यातूनच माझ्या आयुष्याचे प्रयोजन उमगले. म्हणूनच प्राध्यापक आणि विद्यापीठाच्या विविध समित्यांवर असतानाही ते सोडून मी परदेशी विद्यार्थी आणि भारतीय विद्यार्थी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आणि सलोखा वाढावा, यासाठी कामाला सुरुवात केली. आयुष्यात एक क्षण असा येतो, की त्या वेळी तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.

त्या पद्धतीने हा क्षण आला आणि आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. आता, ‘सिंबायोसिस’मध्येच नव्हे, तर पुण्यात आणि भारतात ८५ देशांचे हजारो विद्याथी उच्चशिक्षणासाठी येत आहेत. जगभरातील आजची परिस्थिती पाहता ‘युद्धाशिवाय जग हवे असेल, तसेच ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना रुजवायला हवी,’’ अशा शब्दांत डॉ. मुजुमदार‌ यांनी भावूक होऊन सन्मान सोहळ्याला उत्तर दिले.

डॉ. मुजुमदार हे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक असल्याने त्यांना ‘सिंबायोसिस’चा अर्थ चांगल्या पद्धतीने माहीत आहे. शिक्षण हा प्रत्येक विकासाचा पाया आहे, हे राजर्षी शाहू महाराज यांचे विचार डॉ. मुजुमदार यांनी घेतले. जगभरातील बहुजन समाजाला शिकवायला हवे, ही गरज त्यांनी ओळखली. जगभरातील विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी शिकत आहेत. सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारी शिक्षण संस्था म्हणून ‘सिंबायोसिस’कडे पाहायला हवे.
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com