
Agriculture Development: नागपूर- सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटानजीक वसलेले आमळी हे आदिवासीबहुल गाव. हा डोंगराळ, माळरानाचा भाग आहे. सहा पाडे मिळून आमळीची एक समूह किंवा ग्रुप ग्रामपंचायत स्थापन झाली आहे. निसर्गरम्य परिसर असल्याने पर्यटकही या भागात येतात. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. पाऊसमान अधिक असून, भात व नाचणी ही मुख्य पिके घेतली जातात. १२५० हेक्टर एवढे क्षेत्र या गावाचे आहे. त्यापैकी बागायती किंवा बारमाही बागायती शेतीचे क्षेत्र केवळ १० टक्के इतके आहे.
तीव्र उताराचे डोंगर आहेत. शेतीदेखील तीव्र उताराची, खडकाळ, मुरमाड, मध्यम प्रकारची आहे. त्यामुळे पाऊस चांगला होतो, पावसाचे पाणी वाहून जाते. अशा स्थितीत वाहते पाणी बसते, जिरते करण्याची नितांत गरज होती. कारण विहिरी, कूपनलिकांनाही पुरेसे जलसाठे उपलब्ध होत नव्हते. हे चित्र बदलण्यासाठी गावातील शेतकरी, युवक सरसावले. त्यात भीमराव बारकू बोरसे यांचाही समावेश होता. त्यातून कन्हैयालाल समिती स्थापन करण्यात आली. भीमराव यांनी पुढाकार घेतला.
...अशी झाली संस्थेची स्थापना
कन्हैयालाल समितीने शेतीसाठी काम सुरू केले. यात १५-१५ शेतकऱ्यांचे मिळून १९ शेतकरी गट स्थापन करण्यात आले. एकत्र आल्याने बळ मिळाले. मजूरटंचाई दूर करण्याचा मुद्दा अग्रणी होता. त्यासाठी समितीने इर्जिक पद्धतीवर भर दिला. त्यानुसार गटातील सदस्य एकमेकांकडे काम करू लागले. मजुरी खर्चात १०० टक्के बचत झाली. एकीचे बळ लक्षात आले. दरम्यानच्या काळात तालुका, जिल्ह्यातील कृषी यंत्रणा, तज्ज्ञ, विविध संस्थांशी संपर्क आला. यातून पुढे कन्हैयालाल पाणलोट ग्रामविकास संस्थेची २०१६ मध्ये स्थापना झाली. या संस्थेने अभ्यास दौरे केले. गुजरात, पालघर आदी भागात प्रशिक्षण घेतले. यात भात शेतीतील आधुनिक तंत्र, जैविक शेती यासंबंधी माहिती घेतली. त्याचे महत्त्व गटांतील शेतकऱ्यांना पटले.
पाणलोटसाठी जागर
सेंद्रिय शेतीसह पाणलोटामध्येही गावात काम झाले. कन्हैयालाल पाणलोट ग्रामविकास संस्थेसह छत्रपती संभाजीनगरातील संजीवनी या संस्थेने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेवर काम केले. पाच वर्षे सतत हे काम झाले. वाहून जाणारे पाणी, जिरते कसे करायचे यासाठी ग्रामस्थ एकवटले. यात बांधबंदिस्ती, मातीचे बंधारे, सिमेंट बंधारे, सीसीटी चर, वृक्ष लागवड आदी कामे करण्यात आली.
गावातील ६० एकर माळरानात मोठी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. त्यात फळझाडांसह अन्य पर्वतीय वृक्षांची लागवड करण्यात आली. या कामात ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी श्रमदान केले. गावातील प्रत्येक कुटुंबाने या कामात हातभार लावल्याने सिमेंटचे तीन, मातीचे चार बंधारे तयार करण्यात आले. या माध्यमातून गावच्या संपूर्ण १२५० हेक्टर क्षेत्रात बांधबंदिस्ती करून मातीची धूप थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पाणलोटच्या कामांमुळे अल्प क्षेत्रात पूर्वी असलेली बागायती शेती काहीशी वाढली. विहिरी, कूपनलिकांचे जलस्रोत बळकट झाले. पूर्वी डिसेंबरमध्येच विहिरींचे जलस्रोत कमी व्हायचे. परंतु पाणलोटच्या कामामुळे फेब्रुवारीपर्यंत जलस्रोत टिकण्यास मदत झाली. यामुळे परिसरात मका व सोयाबीन शेतीस पाणी उपलब्ध होऊ शकले.
महत्त्वाच्या बाबी
राज्यातला पहिला सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार आमळीमधील भीमराव बोरसे यांना २०१३-१४ मध्ये प्राप्त.
भात व नागली उत्पादनासाठी कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर न करणारे गाव म्हणून आमळी प्रसिद्ध.
गावातील शेतकऱ्यांकडून पारंपरिक तांदूळ, नागली वाणांचे संवर्धन व प्रसार. त्यात इंद्रायणी, गावरान भवाड्या, सोना मसुरी आदी तांदळाचे वैशिष्ट्यपूर्ण वाणांचा समावेश.
संस्थेला धुळ्यातील कृषी विभागासह शबरी महामंडळाचे वित्तीय व अन्य मदत, सहकार्य.
गावात आंब्याच्या झाडांची संख्या अधिक. उत्तम चवीच्या आंब्यापासून बचत महिलाद्वारे लोणचे निर्मिती, विक्री.
गावातील १५ महिला बचत गट शेतीमालावर आधारित उत्पादने निर्मित, विक्रीमध्ये अग्रेसर.
शेतकरी कंपनीला सुरुवात
कन्हैयालाल पाणलोट ग्रामविकास संस्थेने शाश्वत शेतीसाठी काम करीत असतानाच गावातील शेतीमालावर प्रक्रिया व विक्री यावर काम करायला सुरुवात केली. संस्थेतील सदस्यांनी २०१६ मध्ये शेतकरी कंपनी स्थापन केली. ‘कन्हैयालाल फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ अंतर्गत शेतीचा जागर सुरू केला. कंपनीत १० जण कार्यरत असून, धुळ्यातील पश्चिम पट्ट्यात कंपनीने चांगली कामगिरी नोंदविली आहे.
शेतीमालावर गावातच प्रक्रिया
कन्हैयालाल फार्मर प्रोड्यूसर कंपनीद्वारे गावातील उत्पादित धान्यावर गावातच प्रक्रिया केले जाते. नागलीपासून पापड, लाडू, बर्फी, चिप्स, कुकीज असे विविध उपपदार्थ तयार केले जातात. तसेच भाताची स्वच्छता, प्रतवारी करून त्याची पॅकिंग केली जाते. आंब्यापासून लोणचे निर्मिती केली जाते. तयार उपपदार्थ, उत्पादित धान्याची राज्यभर विक्री केली जाते.
सेंद्रिय शेतीमध्ये सुधारणा
आमळीमधील शेतकरी आधीपासून शेतीमध्ये कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करत नव्हते. परंतु सेंद्रिय शेतीत सुधारणा, नवे तंत्रही हवे होते. यासाठी गावातील युवक, शेतकऱ्यांसाठी संस्थेच्या मदतीने प्रशिक्षण, पाहणी दौरे आयोजित करण्यात आले. जिवामृताचा उपयोग, ताग, धैंचा या हिरवळीच्या पिकांचा वापर, पालापाचोळा, शेणखत, कंपोस्ट खत यांचा कार्यक्षम उपयोग याची माहिती घेण्यात आली. हे तंत्र गावातील १०० टक्के भात शेतीत उपयोगात आणण्यात आले. जैविक, नैसर्गिक शेतीसह मजूरटंचाईवर हळूहळू मात झाल्याने शेतकऱ्यांचा नफाही वाढू लागला.
सेंद्रिय भातास मागणी
आमळीचा भात हा सेंद्रिय, रसायन अवशेष मुक्त असल्याने खानदेशात प्रसिद्ध आहे. त्याचा मोठा बाजार गावात असून मुंबई, पुणे यासह शहरी भागातून मोठी मागणी असते. तसेच नागलीलाही मोठा उठाव असतो. आमळी हे पर्यटन केंद्र देखील आहे. आलालदरी हा प्रसिद्ध धबधबादेखील याच भागात आहे. यामुळे या भागांत ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत पर्यटकांची मोठी गर्दी होते. पर्यटकांकडून येथील उत्पादित तांदळास मोठी मागणी असते. धुळे, जळगाव, नंदुरबार भागांतही या भातास मागणी आहे.
आमळीचा परिसर लाल मातीतला व १०० टक्के सेंद्रिय असल्याने येथील उत्पादित भाताला विशिष्ट चव आहे. हा तांदूळ याच भागात उपलब्ध होतो. उत्पादित तांदूळ व नागलीची विक्री स्थानिक बाजारपेठेतच बऱ्यापैकी होत असल्याने त्यास बाजार समितीत पाठवण्याची गरज भासत नाही. त्यामुळे मध्यस्थांना कुठलेही कमिशन देणे, वाहतूक खर्च, लूट आदी कटकट नाही. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. शिवाय सेंद्रिय घटकांमुळे जादा दरही मिळतो. यातून वित्तीय स्रोत गावातच तयार झाल्याने स्थलांतर व अन्य समस्या दूर होण्यास मदत झाली आहे.
- भीमराव बोरसे ९९२२७२१७०७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.