
Ahilyanagar News: नोकरीनिमित्त सतत बाहेरगावी राहावे लागल्याने घरची आठ एकर शेती पडीक राहण्याची स्थिती निर्माण झाली. अशा वेळी करंजी (ता. पाथर्डी) येथील गयाबाई सदाशिव वामन या केवळ कंबर कसून कणखरपणे उभ्या राहिल्या नाही, तर स्वतः राबत, आवश्यक तिथे मजुरांना सोबत घेत संत्री, डाळिंब बागांसह अन्य पिकांचेही यशस्वी उत्पादन घेत आहेत. उत्पादन वाढीसाठी प्रयोगशीलता दाखविणाऱ्या गयाबाईंना पंचक्रोशीमध्ये प्रगतिशील शेतकरी म्हणूनच ओळखले जाते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी आणि परिसरातील दहा ते पंधरा गावांना शाश्वत पाणी उपलब्धता नाही. कमी पाण्यामध्ये फळबागांच्या साह्याने बहुतेकांनी यशाकडे वाटचाल केलेली आहे. करंजी येथील गयाबाई सदाशिव वामन यांना आठ एकर शेती. पती सदाशिवराव नाशिकला नोकरीला होते. त्यामुळे सातवी शिकलेल्या गयाबाई यांच्यावर पंचवीस वर्षांपासून गावच्या शेतीची सर्व जबाबदारी येऊन पडली.
या भागात त्या काळी केवळ बाजरी, ज्वारी, गहू, हुलगे, मटकी यांसारखी पिके होत. पण काळाच्या ओघात पंधरा वर्षांपूर्वी अन्य शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड सुरू केली. नवीन शेती आपल्याला जमेल याचा अंदाज घेतघेत आठ वर्षांपूर्वी गयाबाई यांनी १ एकरावर डाळिंबाची, तर २ एकरांवर संत्र्याची लागवड केली. ही संत्रा लागवड पंधरा बाय पंधरा फूट अंतरावर होती.
मात्र चार वर्षांपूर्वी संत्रा क्षेत्रात आणखी १ एकराची भर घालताना त्यांना तेरा बाय तेरा फूट अंतरावर संत्रा लागवड केली आहे. खर्च कमी करतानाच योग्य नियोजनातून या बागा त्यांनी चांगल्या जोपासल्या. मात्र डाळिंबामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सतत नुकसान सोसण्यापेक्षा यंदा एक एकरावरील डाळिंब बाग काढण्याचा कटू निर्णय घ्यावा लागला. आता त्यांच्याकडे ३ एकरांवर संत्रा फळबाग असून, फळपिकांत आंबिया बहाराच्या फळांना अधिक दर मिळत असल्याने त्या प्रामुख्याने आंबिया बहार घेतात. तसेच तीन एकरांवर तुरीची लागवड केली होती. त्यातून पंचवीस क्विंटल तूर उत्पादन मिळाले. याशिवाय प्रत्येकी एक एकरावर कांदा आणि गहू लावलेला आहे.
कुटुंबीयांची मोलाची मदत
संत्र्यासह अन्य भुसार पिकांचे उत्पादन घेताना त्याच्या व्यवस्थापनात गयाबाई तरबेज आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून पिकांचे यशस्वी उत्पादन घेत त्यात वाढ करण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, फळबागांच्या खताचे, सिंचनाचे व्यवस्थापन, कीड-रोग ओळखून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक फवारणीचे नियोजन अशी कामे गयाबाई स्वतः करतात. उर्वरित भुसार पिकांची पेरणी, खुरपणी, काढणीची कामे यासाठी त्यांना शकुंतलाबाई (सवत) यांची मदत होते. त्यांचे पती सदाशिव यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले.
मुलगा नोकरीनिमित्त नाशिकला असतो. त्यामुळे अवजड व यांत्रिक कामांसाठी गरजेनुसार पुतण्या जालिंदर व अन्य मजुरांची मदत घेतली जाते. आज वयाची साठी ओलांडली असली, तरी कणखरपणे आठ एकर शेतीची जबाबदारी सांभाळणाऱ्या गयाबाई यांच्या शेतीची परिसरात चर्चा असते. गत वर्षी त्यांनी १३ टन संत्रा उत्पादन मिळवले होते. यंदा वातावरण चांगले असून शेणखतासह आवश्यकतेनुसार कीड-रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणी व सिंचनाचे नियोजन केल्यामुळे या वर्षी २८ टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. यंदा संत्र्याला ५० रुपये प्रति किलो सरासरी दर मिळाला.
दुष्काळावर पाणी बचतीतून मात
गेल्या पंधरा वर्षांत साधारणतः तीन ते चार वेळा मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. त्याचा सर्वाधिक फटका फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना बसला. करंजी परिसरातही इतर शेतकऱ्यांप्रमाणेच गयाबाई वामन यांच्या शेतीलाही नुकसान सोसावे लागले. मात्र गयाबाई यांनी पाण्याचे मोल जाणून दहा वर्षांपूर्वीच शेतीत ठिबक सिंचनाचा वापर सुरू केला. पाण्यासाठी त्यांच्याकडे दोन विहिरी असून, त्यातून उपलब्ध पाण्याचे नियोजन करत दुष्काळावर मात केली. उन्हाळ्यात पाण्याचा काटकसरीने वापर करून फळबाग यशस्वी केली आहे.
जालिंदर वामन ७३५०७३४८८४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.