
Modern Agriculture: सुधारित, व्यावसायिक पीक पद्धती, यांत्रिकीकरण, कृषी विभागाच्या योजना, तंत्रज्ञान आदी बाबींचा अंगीकार तामशी (जि. अकोला) गावाने केला. युवकांचा यामध्ये विशेष सहभाग राहिला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून प्रगतिशील गाव अशी ओळख तामशीने तयार केली आहे. शेतकऱ्यांच्या बरोबर गावाचे अर्थकारण उंचाविण्यासही त्यातून मदत झाली आहे.
अकोला जिल्ह्यातील तामशी गावची (ता. बाळापूर) लोकसंख्या २७०० पर्यंत आहे. जिल्हा मुख्यालयापासून ३५ किलोमीटरवरील या गावचे क्षेत्रफळ १०८७ एकर असून पैकी बागायती क्षेत्र ७०० एकर तर कोरडवाहू क्षेत्र ३८७ एकर आहे. पूर्वी पारंपरिक शेतीवर गाव अवलंबून होते. पावसावर आधारित शेती, मर्यादित साधने, आर्थिक अडचणी आणि बाजारपेठांचा अभाव या अडचणींचा सामना गावकऱ्यांना करावा लागे.
मात्र समस्यांचा बाऊ करीत न बसता प्रयोगशील व सुधारित पीकपद्धतीच्या माध्यमातून गावाने विकासाला मार्ग शोधला. विशेष म्हणजे शेतीची संपूर्ण धुरा तरुण पिढीने हातात घेतली. युवा शेतकरी गणेश जगन्नाथ काळे, सुधाकर केणेकर, गोपाल लाहुलकर, बंडू काळे, अक्षय बहुरूपी, मिथुन काळे, श्रीधर काळे, गणेश काळे, प्रल्हाद काळे, राम काळे, श्याम काळे, श्रीधर काळे, अमोल काळे, विठ्ठल काळे, वैभव तामस्कर, गोपाल काळे, प्रकाश काळे, चेतन काळे, पवन काळे, गजानन ढोरे, गजानन गिल्ले, तुकाराम काळे, सोपान काळे, प्रमोद काळे, अजय काळे, शुभम काळे, प्रसाद काळे अशी तरुणांची लांबलचक यादी आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे गाव जिल्ह्यातील प्रगतिशील शेतीचे उत्तम उदाहरण बनले आहे.
गावातील सुधारित शेती पद्धती
तामशीतील शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता फळबागा, हंगामी पीक पद्धतीला अधिक प्राधान्य दिले. सुमारे १०० एकरांच्या दरम्यान कलिंगड, खरबूज, ७० एकर केळी, ३० एकर कांदा, दीडशे- दोनशे एकरांच्या आसपास उन्हाळी तीळ अशी विविधता गावशिवारात दिसते. सोबतीला पाच-दहा एकरांत लसूण, ४० ते ५० एकरांपर्यंत भाजीपाला घेण्यात येतो.
उर्वरित पिकांमध्ये हरभरा, गहू, कांदा बीजोत्पादन आदींचा समावेश आहे. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी वर्षभरातील तीनही हंगामात पिके घेतात. शेतकऱ्यांनी मजूरसस्येवर मात करण्याच्या दृष्टीने यांत्रिकीकरणाची ताकद वेळीच ओळखली. ट्रॅक्टर, पॉवर विडर, मल्चिंग पेपर, ठिबक, मायक्रो- मिनी स्प्रिंकलर, शेडनेट आदी साधनांचा वापर सुरू केला. त्यातून कमी वेळेत, अधिक क्षेत्रात कामे पार पडू लागली. बहुविध पीक पद्धतीतून बाजारपेठांतील दरांची जोखीम कमी झाली.
तंत्रज्ञानाचा प्रसार
काही शेतकरी शेतीला पूरक असे शेळीपालन, कुक्कुटपालन, दूध व्यवसाय करू लागले आहेत. नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या शेतीत मेहनत करून चिकाटीने चांगल्या पद्धतीने पैसा कमावत आहेत. फळे, भाजीपालावर्गीय पिकांची थेट आठवडी बाजारात तसेच मालावर प्रक्रिया करून थेट ग्राहकांना विक्री करण्याकडे युवकांचा कल आहे. कृषी विभाग- आत्माच्या पुढाकाराने व मार्गदर्शनातून शेतीशाळांचे आयोजन होते. त्याद्वारे आधुनिक तंत्रज्ञान, पीकवाणांचा प्रसार केला जात आहे.
गावाने उन्हाळी तीळ, मूग आदींच्या लागवडीला प्राधान्य देत आर्थिक उन्नतीचा मार्ग धरला आहे. गावात शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाली आहे. शेतीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षण घेऊन त्यात कुशल होण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. शासकीय योजनांचा लाभ थेट बांधापर्यंत मिळत आहे. पाणलोट योजनांच्या माध्यमातून भूजल पातळी वाढविण्यात यश आले आहे. बाळापूर येथे काही वर्षांपूर्वी झालेल्या प्रकल्पामुळे विहिरींची पातळी वाढली. आता सर्व क्षेत्र विहिरींद्वारेच ओलित होते.
सर्वांगीण प्रगती
शेतशिवारात झालेले बदल गावाच्या सर्वांगीण विकासाला साह्यभूत ठरले. गावातील महिलांचे बचत गट तयार झाले. त्याद्वारे महिला महिन्याला विशिष्ट रक्कम बँक खात्यात जमा करतात. शेतीपूरक, प्रक्रिया उद्योगातही महिला पुढे येत आहेत. गावातील शैक्षणिक स्तर उंचावत आहे. पोलिस, अभियांत्रिकी, वैद्यकीय, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये गावातील व्यक्ती सेवा बजावत आहेत.
गावात जिल्हा परिषदेची शाळा असून तेथे नर्सरी ते सातवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. तर विद्यालयात आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेता येते. पुढील शिक्षणासाठी वाडेगाव, अकोला व अन्य ठिकाणी विद्यार्थी जातात. गावांमध्ये झालेल्या विकासाचे चित्र शाळा, अंतर्गत रस्ते, घरे, वाहने यांतून दिसून येते. वाडेगाव ते तामशी हा रस्ता सुस्थितीत व चकचकीत झाला आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे.
ग्रामस्वच्छतेला महत्त्व देण्यात आले आहे. बहुतांश घरे सिमेंट काँक्रीटची आहेत. काही घरांवर आता सौर ऊर्जेचाही वापर होऊ लागला आहे. घरोघरी दुचाकी आहेत. शेतीकामांसाठी २५ ट्रॅक्टर, ३५ चार चाकी तसेच २० पर्यंत मालवाहू वाहने दिसून येतात. पूर्वी सिंचनाची फारशी सोय नव्हती.
मागील सात ते आठ वर्षांमध्ये सिंचन क्षेत्र झपाट्याने वाढले. त्यामुळे खरीप, रब्बीसह उन्हाळी हंगाम शेतकरी हमखास घेताना दिसत आहेत. एकीकडे तामशी गाव अशा प्रकारे प्रगती करीत असतानाच शेतकऱ्यांना शेतरस्त्यांची दुरवस्था झाल्याचा त्रास झेलावा लागतो. गावातील प्रमुख शेतरस्ते जोडले गेल्यास असंख्य अडचणी दूर होतील. फळबागांचे क्षेत्र वाढेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मागील काही वर्षांपासून दरवर्षी चार ते पाच एकरांत उन्हाळी तिळाचे पीक घेतो. एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन येते. संपूर्ण तिळाची विक्री प्रदर्शनांमधून करतो. बाजारात त्यास १०० ते १५० रुपये प्रति किलो दर मिळतो. मात्र थेट विक्रीतून हाच दर १७५ ते २०० रुपये मिळतो. आता ग्राहकांचे नेटवर्कही तयार केले आहे. विक्रीतील अडथळे दूर झाले आहेत. माझ्याप्रमाणे अन्य शेतकरीही अशा विक्री व्यवस्थेसाठी पुढे आले आहेत.
गणेश काळे, तामशी ९५२७१५६७४७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.