डॉ. सुमंत पांडे
पाणी किंवा नदीच्या (River Management ) कामांमध्ये त्यांच्या समस्यांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचाही असतो. नेमका आणि काटेकोरपणे अभ्यास झाल्यानंतर त्यांच्या समस्यांच्या कारणांचा अदमास घेता येतो. त्यानंतर त्यावर उपाययोजना आणि कृती कार्यक्रम ठरवता येऊ शकतो.
अभ्यास करत असताना त्यातील तांत्रिक आणि वैज्ञानिक बूज सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे, कारण प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे आणि त्यासाठी पूरक तंत्रज्ञानदेखील उपलब्ध आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केल्यास त्याचा नेमका उपयोग होऊ शकतो. स्थानिक रहिवासी, नागरिक, ग्रामस्थ यांचाही सहयोग यामध्ये अत्यंत मोलाचा ठरतो, किंबहुना तो अपरिहार्य आहे. कारण परिस्थितीशी सामना करत अनेक कालावधीपासून ते वास्तव्य करून असतात. त्यामुळे त्यांच्याकडून पूर्वीची स्थिती जाणून घेणे गरजेचे ठरते.
अभ्यासाचे दिशादर्शन :
१) प्रथम त्या नदीचा नकाशा प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. हा नकाशा जलसंपदा विभागाकडे प्राप्त होतो. यामध्ये पूररेषा दर्शविलेल्या असतात.
२) नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामधील सूक्ष्म पाणलोट नकाशा आणि त्यांचा अभ्यास गरजेचा आहे. हा नकाशा वरिष्ठ भू वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांच्याकडे उपलब्ध होतो.
३) पूर्वतयारी झाल्यानंतर प्रत्यक्ष नदीशी संवाद साधून पाणलोट्यामधून शिवार फेरी करून त्याच्या नोंदी कराव्यात.
४) ग्रामस्थ, नागरिक यांच्याशी संवाद साधून समस्यांच्या कारणांचा अभ्यास करता येऊ शकतो.
उपलब्ध तंत्रज्ञान :
१) यापूर्वीच्या काही लेखांमधून आपण चर्चा केलेली आहे. भारत सरकारने भुवन नावाचे संकेतस्थळ विकसित केले आहे(bhuvan.nrsc.gov.in). यामध्ये भारतीय उपग्रहावरून प्राप्त नकाशे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहेत. त्याशिवाय गुगलवर गुगल अर्थ प्रो (google.com/Earth Versions – Google Earth) नावाचे एक ॲप्लिकेशन आहे जे गुगलवर आधारित आहे. त्याचा उपयोग करून आपण नकाशे, तेथील प्रवाह, उतार,अंतर इ पाहू शकतो. त्यावर आपल्याला अहवालदेखील तयार करता येतो.
२) अशा प्रकारचा तयार झालेला नकाशा आणि त्यावरील अहवाल घेऊन प्रत्यक्ष नदी आणि पाणलोटक्षेत्रात भेट देऊन प्रत्यक्ष माहिती संकलित करता येऊ शकते. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, की केवळ नकाशावर अवलंबून राहून चालणार नाही. स्थानिकांच्या सहकार्याने तिथे शिवार फेरी अथवा नदीची भेटी करणे अपरिहार्य आहे. यामधून प्रत्यक्ष स्थिती लक्षात येते, कारणे समजतात.
३) प्रदूषणाची गहनता त्याचे गांभीर्य हे संकेतस्थळावरून लक्षात येऊ शकणार नाहीत, त्यासाठी प्रत्यक्ष भेट देणे गरजेचे असते. तसेच पाणलोट क्षेत्रात उपचार केलेल्या बाबी उदाहरणार्थ माती नाला बांध, लघू सिंचन तलाव, पाझर तलाव, साठवण तलाव इत्यादींची सद्यःस्थिती लक्षात येते. त्यामध्ये झालेली पडझड, तूटफूट,पाण्याची गळती इत्यादी नोंदविता येते. प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्याच्या नोंदी तिथेच करणे गरजेचे आहे. हा अहवाल तेथील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, शासकीय घटक यांच्याशी चर्चा करून दिशा ठरवता येऊ शकते.
कुंडलिका आणि सीना नदीचे पुनरुज्जीवन ः
आज आपण चर्चा करत आहोत ती जालना जिल्ह्यातील कुंडलिका आणि सीना नदीच्या पुनरुज्जीवनामध्ये लोकसहभागाची. या नद्या पुनर्प्रवाहित झाल्या आणि त्या नद्यांना पूर्वीचे स्वरूप प्राप्त झाले.
“गावकरी ते राव न करी” ही म्हण येथे चपखलपणे बसते. कुंडलिका आणि सीना या दोन नद्या जालना शहरातून जातात. त्या दुधना नदीच्या उपनद्या आहेत. देशातील इतर नागरी नद्यांच्या आक्रोश आहे तोच कुंडलिकेचा देखील आक्रोश आहे. हे ओळखून त्यावर समाज एकत्रित येऊन काम केल्याने काय बदल घडले हे आपल्याला समजू शकते.
नागरिकांची मानसिकता, मला काय त्याचे? सरकार पाहिलं, नगरपालिकेचे ते काम आहे, या भावनेने वागल्यामुळे नद्यांची भयाण अवस्था झाली आहे; तथापि तोच समाज एकत्र आल्यास आणि सकारात्मक दिशेने गेल्यास काय चमत्कार घडतो, नद्या कशा पुनर्प्रवाही होऊ शकतात हे पाहणार आहोत.
नदीची परिस्थिती ः
जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी ही जालना शहराच्या बारा किलोमीटरवर असलेल्या राजूरच्या डोंगरावरून उगम पावते. सुमारे ११ जलग्रहण क्षेत्रातून या नदीला पाणी मिळते आणि ती प्रवाहित होते. कुंडलिका नदीवर आणि तिच्या पुनरुज्जीवनावर चर्चा करत असताना तेथील घाणेवाडी तलावाचा अभ्यास आणि माहिती घेणे गरजेचे ठरते. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील राजूरच्या डोंगररांगातून तपोवन भागातून ही नदी उगम पावते.
याच नदीवर १८३१-३४ मध्ये बांधलेला घाणेवाडी तलाव आहे. तलावात सुमारे ११ जलग्रहण क्षेत्रातून पाणी येते.या तलावातून जालना शहराला गुरुत्व बलाने पाणी येते. या तलावात खूप गाळ साचला होता. त्यामुळे २०१२ च्या दुष्काळात पाण्याचा प्रचंड दुष्काळ होता. सुमारे एक दशकाच्या कालावधीमध्ये घाणेवाडी तलावावर मोठे काम करण्यात आले. आणि तेथील जलसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
तथापि २०१९ पासून कुंडलिका नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करण्यात आले. सर्वप्रथम या स्थितीबाबत आपण समजून घेऊयात. कुंडलिका नदी जेव्हा शहरात प्रवेश करती होते, तेव्हापासून तिची वाताहात सुरू झाली. तिच्या दोन्ही तीरावर कचरा टाकणे, इमारतीचे विटा राडारोडा, दगड गोटे कचरा प्लॅस्टिक घाण, चपला, प्लॅस्टिकचे वेस्ट, मुलांचे डायपर इत्यादी ज्याला आपण कचरा म्हणून त्या सर्व गोष्टी या नदीमध्ये लोक टाकत असत.
हे कमी की काय म्हणून तेथे काही नदीच्या हितशत्रूंनी प्रत्यक्ष प्रवाहातच कच्चे तंबू ठोकून, गुरे बांधून आपला व्यवसाय, व्यापार सुरू केला यामध्ये म्हशींचा गोठा असो, अथवा तेथे विंधन विहीर घेऊन त्यातील पाणी विकण्याचा व्यवसाय असो, असे अनेक अवैध व्यवसाय तिथे भरभराटीस आले. नदीचे पात्र मात्र अगदी उथळ एक ते दोन मीटर खोल आणि तीन ते चार मीटर रुंद झाले याचे पर्यवसान पुरात झाले. पावसाळ्यामध्ये नदीचे पाणी वस्तीमध्ये शिरायचे. लोकांना सवय झालेली होती, हे असेच चालायची ही भावना मनात ठेवून ते जगत असतात.
कामाची पद्धती आणि लोकसहभाग ः
येथील प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी, तसेच काही समाविचारी आणि पूर्वी घाणेवाडी तलावावर काम करणारी स्थानिक मंडळी नदीची ही अवस्था पाहून व्यथित झाली. हीच का आपली कुंडलिका माई?
असाही त्यांना प्रश्न पडू लागला. एव्हाना नदीचा उकिरडा झाला होता. त्याच्यावर काम करण्याचे निश्चित झाले. या कामांमध्ये स्थानिक व्यक्तींमध्ये ज्यांचे आवर्जून नाव घ्यावे लागेल. विशेषतः रमेश भाई पटेल, सुनील रायथाथा, दीपक केसापूरकर, शिवरतन मुंदडा, सुनील बारवाले (महिको कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि विश्वस्त) तसेच उदय शिंदे या मंडळींनी कामाची दिशा ठरवली.
त्यापूर्वी नदीचा अभ्यास केला. सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या नदीवर काही ठिकाणी बांध घातले आणि असलेल्या बंधाऱ्यातील गाळ काढला.
प्रत्यक्ष अनुमान केल्याप्रमाणे हजारो हायवा ट्रक गाळ निघणार हे गृहीत होते. तथापि प्रत्यक्ष काम झाल्यानंतर आज त्याचे गणित मांडले तर असे लक्षात येते, की त्या वेळेस सुमारे ५० हजार हायवा (एक हायवा म्हणजे सुमारे २०० घमी म्हणजे सुमारे २०००० लिटर जलसाठा) एवढा गाळ त्यातून निघाला. त्या गाळाची विगतवारी केली असता वरचा थर यात प्लॅस्टिक चपला इत्यादी होते आणि त्यानंतर काळी माती निघाली.
गाळाचा वापर ः
१) नदीतील काढलेला गाळ हा कचऱ्याच्या स्वरूपामध्ये होता. तो नगरपालिकेने पुनर्वापरासाठी वापरला. त्यामध्ये आलेली माती शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टाकली.
२) २ जुलै २०१९ रोजी मोठा पाऊस झाला. गाळ काढल्यामुळे पाणीसाठ्याला जागा झाली. पुरेशी रुंदी केल्यामुळे नदीची वहनक्षमता वाढली. पर्यायाने ज्या ठिकाणी गाळ होता तिथे पाणी साठले. हळूहळू त्या पाण्याचे भूजलात रूपांतर झाले आणि बंधारे वाहू लागले. यातील काही गाळ हा नदीच्या काठावरच थोडासा पसरून टाकण्यात आला तो गाळ बांध म्हणून उपयोगी आला आणि काठ संरक्षित झाले.
शासनाचे सहकार्य ः
या सर्व बाबींमध्ये लोकसहभागासोबत शासन आणि प्रशासनाचा सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. जलसंपदा विभाग, जालना नगरपरिषद, त्याशिवाय जिल्हाधिकारी यांची वेळोवेळी मदत झाली. बऱ्याच वेळेस स्थानिक पोलिस यंत्रणा देखील उपयुक्त ठरली.
कारण काही ठिकाणी कायद्याचा आणि बळाचा वापर करून अतिक्रमणे काढावी लागली. आपण यापूर्वीच्या लेखातून नदीवर होणारे आघातांची तीन स्वरूपात विगतवारी केलेली आहे. त्यामध्ये अतिक्रमण, नदीचे प्रदूषण आणि जलधरातून भूजलाचे शोषण; हे तीनही या ठिकाणी एकत्रितपणे आढळून आले.
निधीची उभारणी :
१) कामासाठी निधी तर आवश्यक होता. सुरवातीचे दोन बंधारे लोकसहभागातून बांधण्यात आले. त्यातील गाळ काढण्यात आला. तथापि उर्वरित सहा बंधाऱ्याचे काम सिद्धिविनायक ट्रस्ट, मुंबई यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निधीतून करण्यात आले.
२) समस्त महाजन ट्रस्टच्या श्रीमती नूतन देसाई यांचे यामध्ये योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून यंत्रे मोफत पुरविली. त्यासाठी लागणाऱ्या इंधनाची व्यवस्था काही अंशी समस्त महाजन परिवाराने केली आणि काही अंशी शासनाने केली.
३) संत, समाज, शासन, महाजन हे सद्विचार असणारी समाजातील मंडळी एकत्र आल्यामुळे ही नदी आज पुनर्प्रवाहित झाले हे खात्रीने सांगता येऊ शकेल. लोकसहभागातून नागरी क्षेत्रातील पुनर्प्रवाहित झालेली ही राज्यातील एकमेव नदी आहे.
संपर्क ः सुरेश केसापूरकर, उदय शिंदे, ९४२३७३१४८०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.