
नाशिक ः अतिवृष्टीच्या तडाख्यात रब्बी हंगाम (Rabi Season) उन्हाळ कांदा रोपांना (Onion Seedling) मोठा फटाका बसला आहे. रोपवाटिकेत सातत्याने पाणी साचल्याने रोपांची मर झाली आहे. तर काही ठिकाणी बियाणे व उतरलेली कोवळी रोपे वाहून गेली.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार, तर काहींना तिबार रोपे तयार करण्याची वेळ आली. आता थोडीफार रोपे उपलब्ध होत असल्याने तुरळक लागवडी सुरू झाल्या आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात रोपांची अल्प उपलब्धता व मजुर टंचाईमुळे हंगाम लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत.
दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने उन्हाळा कांदा लागवडीला गती येते. त्यामध्ये काही शेतकरी आघाप लागवडी करतात. यंदा हे प्रमाण अत्यल्प असल्याने अतिवृष्टीचा परिणाम दिसून येत आहे. मागील वर्षी उत्तर महाराष्ट्रात नाशिक व धुळे जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर तर जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांत लागवडीखालील क्षेत्र वाढल्याचे दिसून आले.
यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत शेतकऱ्यांवर रोपवाटिका तयार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रोपे तयार केल्यानंतरही किती प्रमाणात कांदा रोपे तयार होऊन लागवडीयोग्य होतील, यावर यंदा लागवडीची स्थिती अवलंबून असेल.
यंदा मोठ्या प्रमाणावर रोपवाटिका तयार करूनही रोपांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना प्रस्तावित लागवडी पूर्ण करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागेल. तर अनेक शेतकऱ्यांच्या रोपांचे १०० टक्के नुकसान झाल्याने बियाणे खरेदी करण्यासह दुबार रोपवाटिका तयार करताना दुसऱ्यांदा मेहनत करावी लागत आहे.
गादीवाफ्यावर रोपवाटिका निर्मिती, बीजप्रक्रिया, निचरा होणाऱ्या जमिनीची निवड अशा विविध शिफारशी तज्ज्ञ व शास्त्रज्ञ अनेकदा शिफारशी करतात. मात्र शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीचा फटाका आहेच; मात्र शास्त्रीय पद्धतींचा अवलंब न केल्याने कांदा रोपवाटिकांचे नुकसान वाढल्याची एकंदरीत स्थिती आहे.
अतिवृष्टीमुळे उन्हाळा कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले. अजूनही लागवडी सुरू झालेल्या नाहीत. रोपवाटिका गादीवाफ्यावर केल्याने रोपांची मरतुक कमी झाली आहे. त्यामुळे सुधारित पद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे.
- रोहिदास जाधव, कांदा उत्पादक अंतापूर, ता. सटाणा
सप्टेंबर महिन्यात रोपवाटिका तयार केल्या. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदा पाऊस अधिक राहिला. परिसरातील इतरांचे नुकसान ७० टक्के आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान असल्याने लागवडी लांबणीवर जातील.
- शिवाजी ढाकणे,
कांदा उत्पादक, चास, ता. सिन्नर
यंदा लागवड हंगाम लांबणीवर गेला आहे. नोव्हेंबरमध्ये लागवड सुरू होते. मात्र यंदा डिसेंबर महिन्यात रोपे तयार झाल्यावर लागवड सुरू होईल.
- राकेश काकुस्ते,
कांदा उत्पादक, शेणपूर, ता. साक्री, जि. धुळे
उत्तर महाराष्ट्रातील कांदा लागवडीची स्थिती (हेक्टर)
जिल्हा २०२०-२१ २०२१-२२ लागवडीतील वाढ
नाशिक १,६६,५०४ २,१६,६७४ ५०,१७०
धुळे १५,०२४ ३०,७३१ १५,७०७
जळगाव ३,०७६ ४,३५७ १,२८१
नंदुरबार ७,३३४ १३,९८२ ६,६४८
एकूण १,९१,९३९ २,६५,७४५ ७३,८०६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.