Agriculture Ecosystem : शेती परिसंस्था हीच शाश्‍वत उत्पादनाची दिशा

Sustainable Agriculture : पीक व्यवस्थापन करताना शेती भोवतालची परिसंस्था महत्त्वाची आहे. आजच्या काळात ही रचना मोडकळीस आली आहे. पुन्हा एकदा नव्याने शेती परिसरातील परिसंस्था तयार करण्यामध्ये शाश्वत शेतीचे बीज दडलेले आहे.
Sustainable Agriculture
Sustainable AgricultureAgrowon
Published on
Updated on

पीक व्यवस्थापन करताना शेती भोवतालची परिसंस्था महत्त्वाची आहे. आजच्या काळात ही रचना मोडकळीस आली आहे. पुन्हा एकदा नव्याने शेती परिसरातील परिसंस्था तयार करण्यामध्ये शाश्वत शेतीचे बीज दडलेले आहे. याबाबत बेंडशिळ (ता.अंबरनाथ,जि.ठाणे) येथील सेंद्रिय कृषिभूषण शेतकरी राजेंद्र भट यांच्याशी साधलेला संवाद...

गेल्या काही वर्षांत शेतीमधील प्रश्न वाढले आहेत, याबाबत आपला अभ्यास काय सांगतो ?

देशात आज तरी ५० टक्यांहून जास्त लोकसंख्या शेती आणि पूरक उद्योगावर अवलंबून आहे. साधारणपणे ८० वर्षांपूर्वी आपले पूर्वज स्वतःच्या शेतातून जळण, अन्न, औषधे, खते, बियाणे यासाठी स्वयंपूर्ण होते किंवा काही वेळा आठवडे बाजार, जत्रा यामधून गरजा पूर्ण करत होते. किमान ९० टक्के स्वयंपूर्ण होते.

आज शेतकरीसुद्धा स्वतःच्या गरजा शेतातून भागवत नाही. दहा टक्यांपेक्षा कमीच शेतकरी स्वतःच्या शेतातून वरील गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. खरे म्हणजे हे दहा टक्के सुद्धा मी धाडसाने म्हणतो. पूर्वी जेथे ज्वारी, बाजरी होती तिथे आज सोयाबीन आहे. पण सोयाबीन घरात वापरण्याचे प्रमाण किती आहे?

औद्योगिक क्रांती ते हरितक्रांती या टप्प्यात आत्मनिर्भरतेपासून परावलंबित्वाकडे आपला प्रवास चालू आहे. आपण काय खावे, कधी खावे, किती खावे हे पूर्वजांचे ज्ञान आपण विसरलो आहोत. आयुर्वेद सांगतो की, स्थानिक, ऋतूनुसार तयार झालेले आणि रसायनांच्या मदतीविना तयार झालेले अन्न खावे. पीक तयार करण्यासाठी, पोषणासाठी, संरक्षणासाठी जर बाहेरून काही द्यावे लागत असेल तर असे अन्न आपले पोषण कसे करणार?

शाश्वततेचा विचार अनेक अंगांनी करणे आवश्यक आहे. असा प्रयत्न मी गेली ३४ वर्षे करत आहे. काही प्रमाणात यशही मिळत आहे. यशाची टक्केवारी अत्यंत धीम्या गतीने वाढत आहे. कारण जल, वायू परिवर्तनाचा वेग जास्त आहे आणि वैयक्तिक पातळीवर मर्यादा येतात. सामूहिक पातळीवर यश जास्त मिळते. उत्तम हवा, उत्तम पाणी आणि त्यांच्या मदतीने तयार झालेले उत्तम अन्न असते. या घटकांसाठी आपल्यालाच काम करावे लागेल.

शाश्वत शेतीसाठी शिवारातील परिसंस्था कशी महत्त्वाची आहे ?

जगभरातील हजारो वर्षांच्या परंपरा, इतिहासाचा अभ्यास केला तर शाश्वतता ही जल, जंगल आणि जमीन यावर अवलंबून आहे, हे लक्षात येते. हे तिन्ही घटक ज्या साम्राज्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला, तेथे समृद्धी निर्माण झाली. बरीचशी साम्राज्ये हव्यास आणि पर्यावरणाच्या बदलाने संपली. भारताची आद्य संस्कृती सरस्वती नदीच्या काठावर विकसित झाली होती. सरस्वती लुप्त होण्यामुळे ती नाश पावली असावी, असा अभ्यासकांचा दावा आहे. सप्तसिंधू, गंगा, यमुना, सरस्वती खोऱ्यात आणि जगातील बहुतेक पर्वतराजीत प्रगल्भ संस्कृती होत्या. सातत्याने आक्रमणांच्या इतिहासात याकडे दुर्लक्ष

झाले. विनिमय चलन औद्योगिक क्रांतीनंतर बदलत गेले. दोन्ही महायुद्धांतून जगाची रचना आणि जीवनपद्धती बदलत गेली. परंतु अजूनही व्यक्ती, समूह, देशाची शाश्वतता, आत्मनिर्भरता ही शेतीवरच अवलंबून आहे. आयटी क्षेत्रात आपण आज कुठल्या कुठे गेलो आहोत. पण जीवनावश्यक गोष्टी उदा. खनिज तेल (८० टक्के), खाद्य तेल (७० टक्के), तूर डाळ (७० टक्के), कडधान्ये (३० ते ४० टक्के) आपण आयात करतोय. यावर सखोल विचार होणे गरजेचे आहे.

शेतकऱ्याची आत्मनिर्भरता घरातील गरजा आणि बियाण्यांची आहे. शेतीशास्त्राच्या अभ्यासात महत्त्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे मातीची भौतिक, रासायनिक व जैविक गुणवत्ता आणि तेवढेच महत्त्वाचे म्हणजे परिसंस्था (इकोसिस्टीम). आजच्या काळात ही रचना मोडकळीस आली आहे. यालाच आपण जागतिक तापमान वाढ म्हणतो. जर आपणास जगण्याची, शेतीची आणि परिसंस्थेची शाश्वतता तसेच गुणवत्ता टिकवायची असेल तर जगणे आणि शेती पद्धतीत बदल करावे लागतील. यासाठी प्रत्येकाने स्वतःचा कार्बन फुटप्रिंट आणि वॉटर फुटप्रिंट तपासावेत. ते कमी कसे करता येईल ते अभ्यासावे. कृषी आराखडा तयार करून कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी उपाययोजना करावी.

शेती फक्त आपल्यासाठी नाही तर या परिसंस्थेत असंख्य सजीव आहेत, जे ही परिसंस्था टिकवून ठेवतात, त्याचबरोबरीने तिच्या क्षमतांचा विकास करत असतात. अशा सूक्ष्मांपासून दिसणाऱ्या घटकांसाठी काम करणे, निदान त्याचे काय काम आहे हे ओळखून त्यात आपली मदत त्यांच्या संवर्धनासाठी कशी होईल, याचा विचार करून कृती आराखडा तयार करावा लागेल. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या भागातील हवामान, जमिनीची परिस्थिती, पीक पद्धती आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन आपल्या शेती पद्धतीच्या नियोजनाचा विचार करणे आवश्‍यक आहे.

Sustainable Agriculture
Sustainable Agriculture: एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन : शाश्‍वत शेतीचा पाया

बफर झोन, कोअर झाेन संकल्पना कशी आहे ?

प्रांतानुसार (कृषी हवामान विभाग) पिके बदलतील. या रचनेत कमीत कमी मशागत, शेताचे दोन प्रमुख भाग बनवून त्यामध्ये लागवड, शेताच्या चारीही बाजूने बफर झोन आणि आत कोअर झोन तयार करावा. बफर झोन म्हणजे शेतीपूरक घटकांच्या वाढीसाठी उपयुक्त रचना. वनस्पतीची लागवड शेताच्या आकारानुसार ५ ते २० फुटांवर करता येते.

वनस्पती तापमान आणि आद्रता नियंत्रण करतात. धूळ, वारा, वादळ यापासून संरक्षण, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, सुंदर फुले येणाऱ्या वनस्पती, हिरवळीचे खत, चारा, जळण, इमारत लाकूड, पक्षी, कीटक आणि मधमाशीसाठी उपयुक्त, जल व मृदा संवर्धन या प्रमुख उद्दिष्टांसाठी लागवड करावी. यात वृक्ष, वेली, झुडुपे, कंद असे प्रकार महत्त्वाचे आहेत.

कोअर विभागामध्ये अन्न देणारी पिके, फळबागा, मध्यम कालावधीची फळे, हंगामी पिकांचा समावेश होतो. या सर्व पिकांची रचना बहुस्तरीय बहुपीक पद्धतीची असावी. समान आवड आणि गरज असणारी पिके एकत्र लावून जास्तीची पिके स्पर्धा न करता एकमेकांना पोषक कशी असतील हे पाहावे. उदाहरण सांगायचे झाले तर दीर्घजीवी पिकांमध्ये कोकणात आम्ही आंब्यावर काळी मिरी, आंब्याच्या दोन रांगांमध्ये अननस, हळद, सुरण लागवड करतो.

मांडवावर दुधी, घोसाळी, चवळी, काकडी तसेच रिकाम्या जागेत सिंचन प्रकारानुसार ३० दिवसांची पालेभाजी, ४५ दिवसांचा मुळा, काकडी, लेट्यूस, ७० दिवसांचा मूग, चवळी, फरसबी, राजमा आणि ७० दिवसांनी सुरू होणाऱ्या वेलवर्गीय पिकांची लागवड केली जाते. याचा उद्देश म्हणजे उत्पादनाचा कालावधी कमी करणे, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर, सर्व जागेचा वापर आणि कमी जागेतच काम करावे लागते. मुळांच्या मदतीने मातीत अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण व सेंद्रिय कर्बात वाढ, पीक फेरपालट या सर्वांतून शेतशिवारातील वनस्पती आणि पिकांची बहुविविधता तयार होते.

Sustainable Agriculture
Sustainable Agriculture Future: ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादनात शाश्‍वत शेतीचे भवितव्य

शेती विकासासाठी ‘इकॉलॉजी-इमोशन-इकॉनॉमी’ ही संकल्पना आणि नेमके स्वरूप कसे असावे?

शेती परिसंस्थेतील विभागणी आणि त्याचे यश एकमेकांवरच अवलंबून असते. उत्तम परिसंस्थेतच आपण आपले आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानी ठेवू शकू. परिसंस्थेचा विचार आणि त्याप्रमाणे जगणे, आहार आणि विहार असावा लागेल. आपल्या पूर्वजांनी सातत्याने प्रयत्नपूर्वक सुबत्ता आणि गुणवत्ता निर्माण केली. त्या तयार करण्याच्या पद्धती कृतीतून समजविल्या. आपली जबाबदारी आहे की, विज्ञानाने उलगडलेल्या निसर्गाच्या अनेक गुपितांचा खजिना वापरून नवीन रचना करणे, जुन्या परंपरांमधील विज्ञान तपासून काळाला अनुसरून नवीन रचना केली पाहिजे.

बदलत्या हवामानामुळे शाश्वत शेती आणि जीवनपद्धतीचे महत्त्व अजून वाढले आहे. शेती करत असताना उत्तम हवा, पडणारे जास्तीत जास्त पाणी मूलस्थानी जिरेल अशी रचना करावी. अकस्मात पडणाऱ्या जोरदार पावसाला तोंड देण्यासाठी, मातीत जलसंधारण आणि वाफसा एका जागी होण्यासाठी, त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी आणि तो टिकविण्यासाठी, पोषण व संरक्षण करणारी पीकरचना करावी.

गेल्या दहा वर्षांपासून मी बहुस्तरीय शेती करत आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतातील गांडुळे, दिसणारे सजीव, न दिसणारे उपयुक्त जीवाणू आणि बुरशी यांच्या उत्तम वाढीसाठी कमीत कमी मशागत करतो. एकाच वेळी वाफसा, जलसंधारण महत्त्वाचे आहे. यासाठी उंच आणि रुंद गादीवाफ्यावर लागवड केल्याने पीक उत्तम वाढते. मिश्रपीक, आंतरपीक पद्धतींचा अवलंब वाढवला तर मृदा, जलसंधारण आणि वातावरण बदलास तोंड देण्याची क्षमता तयार होते. एकाच जागी अनेक वनस्पती वेगवेगळ्या उंचीवर, वेगवेगळ्या वयाच्या वाढतात. हे पीकरचनेत आणून एकत्र बहुस्तरीय बहूपीक रचना फायदेशीर ठरते. जागा, पाणी, मनुष्यबळ, वेळ, मृदा व जलसंधारण, कमीत कमी मशागत, जास्तीत जास्त उत्पादकता व जास्त उत्पन्न या पद्धतीमुळे घेता येणे शक्य आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com