
Pune News: राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. पावसामुळे मुंबईसह कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक या भागांचे नुकसानही झाले आहे. पावसाचा फटका भाजीपाला, कांदा आणि फळपिकांना बसला आहे तर पेरण्यांची कामे खोळंबली आहेत.
मुंबई, पुणे, ठाणे आणि राज्याच्या इतर भागांत काल आणि आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे मुंबईतील वाहतुकीवर त्याचबरोबर मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम झाला आहे.
पुणे जिल्ह्यात अनेक भागात पाऊस सुरू आहे. बारामती येथे मागील काही वर्षांतील रेकॉर्डब्रेक सर्वाधिक १९४.८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तसेच पुणे जिल्ह्यातील पानशेत गावात १०० मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. या पावसामुळे पानशेत धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालीय. तसेच सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये पावसासाठीचे वारे अधिक अजूनच तीव्र होत आहेत. यामुळे पुणे शहरासाठी पुढील ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात २४ तासांत सरासरी १६.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खटाव तालुक्यातील जांब येथील शेरी शिवारात विजेच्या धक्क्याने सोमनाथ संभाजी शिंदे (वय ४०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोयना, धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या सहा प्रमुख धरणांमध्ये ३०.७६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यात भीमा आणि नीरा खोऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली. पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तसेच या जिल्ह्यातील नीरा व भीमा नदीवरील १३ बंधारे पाण्याखाली गेले असून दुसरीकडे नीरा नदीच्या पूरस्थितीमुळे माळशिरस तालुक्यातील नीरा नदीकाठच्या सात गावांतील ३७५ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम भागांत जोरदार पाऊस कोसळल्याने दोन तासांत शहरातील घरांमध्ये पाणी शिरले आणि नदी-नाल्यांना पूर आला आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे या विभागाकडे वेगाने सरकत आहेत.लातूर जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने कहर केला असून फळबागांसह भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. सोमवारी (ता. २६) गोताळा (ता. अहमदपूर) येथे वीज पडून दोघांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याला सध्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे.यात खेड-दापोली मार्गावरील पाताडी नदीला पूर आला असून, पुराचे पाणी रस्त्यावर पसरले आहे. यामुळे हा मार्ग पाण्याखाली गेल्याने दापोली आणि खेड तालुक्यांना जोडणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.