
Nashik News : सिन्नरसह तालुक्यातील दक्षिण व पश्चिम भागांत ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. दोन तासांत शहरातील घरांमध्ये, गल्लीबोळात पाणी शिरले तसेच नदी-नाल्यांना पूर आल्याने शहरासह तालुका जलमय झाला आहे.
सिन्नर येथील सरस्वती नदी, डुबेरे येथील ढोकी नदी, सरदवाडी येथील शिवनदी दुथडी भरून वाहू लागली. तर शेतांना तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. सरदवाडी रोड, विजयनगर पावसाचे रस्त्यावरुन वाहणारे पाणी घरांत घुसले होते. विजांच्या कडकडाटासह दुपारी वादळी पाऊस झाला.
काही वेळातच पाणीच पाणी झाले. शेतांना तळ्यांचे स्वरूप आले. सरदवाडी मार्गावर गुडघाभर पाणी साचले होते. अजिंक्यतारापासून ते हेमंत नाईक यांच्या सिमेंट विक्री केंद्रापर्यंत पाणी साचले होते. सरस्वती नदीला पूर आल्याने नदीकाठचे राहणारे नागरिक घरे सोडून आश्रयाला येऊन थांबले होते.
आटकवडेजवळ रस्त्याला नदीचे स्वरूप
सिन्नर ते ठाणगाव मार्गावरील आटकवडे जवळ या मार्गाला नदीचे स्वरूप आले होते. रस्त्यावरून कंबरेएवढे पाणी वाहत होते. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरा या मार्गावर वाहतूक सुरु झाली.
कॉलनीत घुसले पाणी
सरदवाडी मार्गावर पाणी साचून यशवंतनगरातील घरात घुसले. मॉडर्न कॉलनीतील काही घरात पाणी गेले. या पाण्यामुळे नागरिकांत घबराट उडाली होती. सरवाडी मार्गावरील भाजीबाजारात दाणादाण उडाली. व्यापाऱ्यांचा भाजीपाला भिजल्याने मोठे नुकसान झाले.
सरदवाडीत मुसळधार
सरदवाडी, लोणारवाडी, वडगाव-सिन्नर, आटकवडे, सोनारी, सोनांबे, हरसुले या गावांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सरदवाडी परिसरात झालेल्या पावसामुळे शिवनदीला पूर आला आहे. सरदवाडी परिसरातील शेत पिकांचे नुकसान झाले. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. वडगाव-सिन्नर येथे शेतकऱ्यांचे शेडनेटचे नुकसान झाले आहे.
डुबेरेत ढगफुटीसदृश पाऊस
डुबेरे येथे झालेल्या ढगफुटी पावसाने ढोकी नदीला पूर आला. दुपारी तीनपर्यंत कोरडीठाक असलेली नदी दोन तासांत ओसंडून वाहू लागली. शेती जमिनीचे बांध फुटून गेल्याने जमिनींचे नुकसान झाले आहे. तर टोमॅटो, कोबी, मिरची, कलिंगड आदी पिकांचे नुकसान झाले आहे. ढोकी नदीला पूर आल्यामुळे कोरडा पडलेला आटकवडे येथील बंधारा भरला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.